Maharashtra Gram Panchayat Election Results : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामुळे सर्वच पक्षाकडून विजयांचे दावे-प्रतिदावे केले जात असले तरी या निवडणुका कुठल्याच पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्याने या विविध पक्षाकडून केल्या जात असलेल्या दाव्यांना काहीच महत्त्व उरले नाही. या निवडणूक निकालाचा परिणाम येत्या काळात होत असलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणूक निकालावर होणार नाही, असे म्हणत राजकीय विश्लेषकांनी विविध पक्षांच्या दाव्यातील हवाच काढली आहे.
कुठल्याच पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जात नाही. त्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायती आपणच जिंकल्याचा दावा राजकीय पक्षांकडून केला जात आहे. विशेषतः ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य आपल्याच गटाचे झाले अशा प्रकारचा दावा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ठोकला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर काही ठिकाणी त्याच ग्रामपंचायती व सरपंच आपलेच झाल्याचा प्रतिदावा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट), शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे, त्यामुळे या निकालावरून ग्रामपंचायत निवडणुकीचा कौल हा या पक्षाच्या बाजूने आहे असे म्हणता येणार नाही, असे मत एका राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, तर विधानसभा निवडणुकीला एक वर्ष ते अकरा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे आता झालेल्या या ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा परिणाम त्या निवडणुकांवर होणार नाही.
त्यामुळे सर्वच पक्षाकडून केले जात असलेले विजयांचे व जागा मिळवल्याचे दावे मात्र फोल आहेत. केवळ या निवडणुकीत जास्त उमेदवार निवडून आले असे म्हणत सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यामध्ये फारसे तथ्य नाही, असे मत एका राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
राज्यभरात गेल्या काही दिवसांत बऱ्याच घटना घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार मोठ्या प्रमाणात बॅकफूटला गेले आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून संपूर्ण राज्य पेटले होते. या आंदोलनाची झळ सर्वसामान्यासॊबतच नेते मंडळींनादेखील सहन करावी लागली. त्यामुळे काही नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याने घरात कोंडून बसण्याची नामुष्की ओढवली होती, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे याचा मोठा परिणाम येणाऱ्या काळातील निवडणुकीवर होणार आहे.
त्याशिवाय दुसरीकडे धनगर समाजानेही आरक्षणाच्या मुद्द्यांवर आंदोलन करीत सरकारला धारेवर धरले आहे, तर आता ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेत सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आता हा प्रश्न येत्या काळात कसा सोडविला जाणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. याचा मोठा परिणाम आगामी काळात होत असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर होणार असल्याचे, एका राजकीय विश्लेषकाने 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.