NCP Politics After EC decision: नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहा आमदार अजित पवार गटात गेले आहेत. या आमदारांचा शरद पवार यांनी त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उभे करून त्यांच्या मतदारसंघातच बंदोबस्त केला आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरीही शरद पवारांच्या राजकारणामुळे या आमदारांची भावी वाटचाल सोपी राहिलेली नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह बंडखोर अजित पवार गटाला दिले आहे. हा राष्ट्रीय नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जातो, त्यामुळे अजित पवार गटात आनंदाचे वातावरण असले तरीही ग्राउंड लेव्हलला या पक्षाच्या नेत्यांमध्ये तेवढा आत्मविश्वास दिसून येत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे भवितव्य भाजपच्या कृपेवर अवलंबून असेल असे नाशिकचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे (देवळाली) वगळता उर्वरित पाच आमदार राजकीयदृष्ट्या अत्यंत मातब्बर आहेत. मात्र, सरळ लढतीत मतांचे गणित त्यांच्या हातातून निसटण्याची भीती आहे. गेल्या सहा महिन्यांत शरद पवार यांनी बसविलेल्या महाविकास आघाडीच्या घडीमुळे निर्माण झाली आहे. यामध्ये पक्ष कमकुवत झाला असला तरी जिल्ह्यात शरद पवार यांच्या भोवतीचे राजकीय वलय मतदारांमध्ये कायम आहे.
गेल्या काही दिवसांतील आंदोलने आणि भूमिकांमधून ते दिसून आले आहे. आगामी निवडणुकांत पवार काही ठिकाणी स्वतःऐवजी समविचारी पक्ष व नेत्यांना ताकद देतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये मातब्बर नेत्यांनादेखील मतदारसंघातच अस्तित्वासाठी झुंजावे लागेल असे दिसते.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले आहेत. मुंबईत पराभूत झाल्यावर पवार यांनी त्यांचे येवल्यात पुनर्वसन केले होते. भुजबळ यांना प्रारंभीपासून मराठा समाजाच्या एका गटाचा विरोध राहिलेला आहे, या गटाला थोपविण्याचे काम पवार यांच्या नावामुळे होत होते. सध्या मात्र कांदा निर्यात बंदी आणि मराठा आरक्षण या विषयांवरून भुजबळ यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे आणि तो रोज प्रकट होत आहे. येथे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) भुजबळ यांची पारंपरिक विरोधक आहे.
शिवाय येथे आजचे राजकीय वातावरण अतिशय तापलेले आहे. त्यामुळे शरद पवार आणि ठाकरे मिळून जो उमेदवार देतील त्यात भुजबळ यांची कोंडी होण्याची शक्यता आहे आणि त्यात शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. कदाचित जागा शरद पवार यांची आणि उमेदवार ठाकरे यांचा किंवा उमेदवार शरद पवारांचा पाठबळ ठाकरे यांचे असे चित्र असेल. येथे मुस्लिम समाजाची मते लक्षणीय आहेत हा समाज काय निर्णय घेतो, हेसुद्धा महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे राज्याचे नेते असलेले भुजबळ मतदारसंघात अडकून पडू शकतात.
आमदार नितीन पवार यांच्यासाठी कळवण सुरगाणा हा मतदारसंघ सुरक्षित असतो. मात्र, त्यात आता सुरगाणा हा डाव्यांचा बालेकिल्ला जोडला गेला आहे. येथून सात वेळा 'माकप'चे जे. पी. गावित आमदार झाले. गेल्या निवडणुकीत नितीन पवार आपल्या बालेकिल्ल्यात फक्त 12 हजार मतांनी तिहेरी लढतीत विजयी झाले होते. यंदा शरद पवार यांनी येथे गावित यांना बळ दिले आहे.
त्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे गेल्या निवडणुकीतील मतं एकत्र केल्यास आमदार नितीन पवार यांची वाट खडतर होणार, हे स्पष्ट आहे. त्यात राष्ट्रवादीचा रवींद्र देवरे हा मोठा गट नितीन पवार यांच्या विरोधात आहे. ही सर्व घडी शरद पवार यांनी बसविली आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात आमदार पवार यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही.
निफाड हा द्राक्ष आणि कांदा उत्पादकांचा मतदारसंघ आहे. निफाडच्या राजकारणावर आणि मतदारांवर शरद पवारांचा गेली अनेक वर्षे प्रभाव कायम आहे. गेल्या निवडणुकीत दिलीप बनकर हे शिवसेनेचे अनिल कदम यांच्या भाऊबंदकीच्या राजकारणात यतीन कदम या अपक्ष उमेदवाराने घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे निवडून आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांना शरद पवार यांनी जवळ केले आहे. पवार आणि कदम यांच्या सख्याची सर्वत्र चर्चा आहे.
याउलट मराठा आरक्षणासह कांदा निर्यातबंदी यावर आमदार बनकर यांचे मौन त्यांना अडचणीचे ठरणार आहे. यामध्ये शरद पवार यांनी अनिल कदम यांना बळ दिल्याने दिलीप बनकर यांचे भवितव्य पूर्णतः सध्या भाजपमध्ये असलेले यतीन कदम काय भूमिका घेतात, यावर ठरेल. यतीन कदम यांनी उमेदवारी दाखल केल्यास यंदा त्याचा फटका अनिल कदम यांच्याऐवजी दिलीप बनकर यांना जास्त बसेल. त्यात बनकर यांच्या अडचणी वाढतील.
सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे चार वेळा आमदार होते, कोकाटे जवळपास सर्वच पक्षांचे उंबरठे ओलांडून आले आहेत. यंदाही त्यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात पक्ष गौण आणि गट महत्त्वाचा असतो. सध्या आमदार कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे असे दोनच गट येथे आहेत. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वाजे सक्रिय आहेत, तुलनेत आमदार कोकाटे यांचे भाऊच त्यांच्या विरोधात गेलेले आहेत, सिन्नरच्या विविध स्थानिक निवडणुकांमधील निकाल लक्षात घेता कोकाटे यांना वाजे यांचे मोठे आव्हान आहे.
कोकाटे आणि वाजे या दोन्ही उमेदवारांची नावे लोकसभा निवडणुकीतील इच्छुक म्हणून घेतली जातात. त्यात कोकाटे लोकसभेसाठी काय भूमिका घेतात, त्यावर पुढील राजकारण ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयीची सहानुभूती वाजे यांना अनुकूल करू शकते. कोकाटे उमेदवार झाले तरी अजित पवार प्रचाराला येऊनसुद्धा सिन्नरमध्ये फारसा फरक पडणार नाही. परंतु सिन्नरमधील सामाजिक विभागणी पाहता जितेंद्र आव्हाड हे कोकाटे यांची बरीच मते वाजे यांच्याकडे वळवतील हे कोणीही नाकारू शकत नाही.
देवळाली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) माजी मंत्री बबन घोलप यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यांच्याविषयीची नाराजी आणि अँटिइन्कमबन्सी यातून गेल्या निवडणुकीत सरोज अहिरे यांना नागरिकांनी निधी जमा करून निवडून आणले होते. त्यांना भाजप शिवसेना युतीतील वादामुळे भाजप व संघाच्या लोकांची मदत झाली होती. मात्र, अहिरे यांनी बंडखोरी करून अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांची प्रतिमा पूर्वी एवढी प्रभावी राहिलेली नाही. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत वर्गणीवर विजयी झालेल्या अहिरे, सध्या आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम उमेदवार मानल्या जातात.
येथे शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी हे समीकरण व उमेदवार परफेक्ट बसल्यास सरोज आहिरे यांचे मतदार कोण? हा गंभीर प्रश्न असेल. कारण आमदार अहिरे या भाजप पुरस्कृत आघाडीत आहेत. भाजपने येथे तीन प्रबळ उमेदवार तयार ठेवले आहेत. या उमेदवारांनी केलेली तयारी, खर्च विचारात घेता ते निवडणुकीत थांबतील असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे सरोज अहिरे पूर्णतः भाजपच्या दयेवर अवलंबून असतील. या मतदारसंघातील बहुतांश संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.