Hasan Mushrif : सावध झालेल्या मुश्रीफांनी 'वस्तादा'वर टाकलेला प्रतिडाव उलटण्याचा धोका

Hasan Mushrif On Sharad Pawar : कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेशामुळे मंत्री हसन मुश्रीफ सावध झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शरद पवार यांच्यावर प्रतिडाव टाकला आहे, मात्र त्याच्या उपयुक्ततेबद्दल साशंकताच आहे.
sharad pawar | hasan mushrif.jpg
sharad pawar | hasan mushrif.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली, त्यामागे शरद पवार यांचे डावपेच हे एक प्रमुख कारण होते. आपल्याला मुस्लिम, दलित समाजाची मते मिळाली नाही, मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजही दूर गेला, असा निष्कर्ष महायुतीतील तीनही पक्षांनी काढला. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार हे एकेक अस्त्र बाहेर काढत आहेत.

आपण शरद पवार यांना दैवत मानतो, असे कागल (जि. कोल्हापूर) येथील आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे सांगत असतात. आजही ते तसेच म्हणाले आहेत. कागल मतदारसंघात शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी टाकलेल्या डावामुळे मुश्रीफ सावध झाले आहेत.

एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले मुश्रीफ हे अजितदादा पवार यांच्या गटात गेले आहेत. वस्ताद नेहमी एक डाव शिल्लक ठेवत असतो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून सतत करत आहेत. असे बोलताना त्यांचा रोख मुश्रीफ यांच्याकडेही असतो.

sharad pawar | hasan mushrif.jpg
Eknath Khadse : एकेकाळी भाजपमध्ये वजन असलेले खडसे त्याच पक्षातल्या विरोधकांमुळे बेजार

मुश्रीफ अजितदादांसोबत गेल्यामुळे कागल येथील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. घाटगे हे मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात, हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतच सिद्ध झाले. त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या घाटगे यांना 88,303 मते मिळाली होती. मुश्रीफ यांना 1,16,436 तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना 55,657 मते मिळाली होती. एकास एक लढत झाली असती, तर मुश्रीफांवर संकट ओढवण्याचा धोका होता. अपक्ष म्हणून 88 हजार मते मिळवलेले समरजितसिंह घाटगे आता शरद पवार यांच्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे मुश्रीफ सावध झाले असून, आपण अल्पसंख्याक असल्याची आठवण त्यांना आता आली आहे. एका अर्थाने हा मुश्रीफ यांनी शरद पवारांवर टाकलेला प्रतिडाव आहे, मात्र तो उपयुक्त सिद्ध होईल का, याबाबत साशंकताच आहे.

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर कागल मतदारसंघातून 1999 पासून सलग निवडून आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत तिरंगी लढत झाल्याचा त्यांना फायदा झाला आहे. असे असतानाही त्यांना आता आपण अल्पसंख्याक असल्याची आठवण येणे, याला महत्व आले आहे. कागल मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 20 हजारांच्या घरात आहे. मुश्रीफ यांचा पक्ष आता भाजपसोबत महायुतीत आहे. त्यामुळे आपल्याला मुस्लिम मते मिळतील किंवा नाही, अशी शंका त्यांना असू शकते. शिवाय, बंडखोरी करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांवर लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटते आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाच उमेदवार उभे केले होते. त्यापैकी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकटेच निवडून आले. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या काही नेत्यांनी राज्यघटना बदलण्याची भाषा केली होती. त्यामुळे महायुतीपासून दलित आणि मुस्लिम मते दुरावली आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा अधिक प्रभाव असलेल्या मराठवाड्यात महायुतीला आठपैकी केवळ एकच जागा जिंकता आली. अन्य मतदारसंघांतही मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीच्या उमेदवारांना सहन करावा लागला.

sharad pawar | hasan mushrif.jpg
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतयं' 'हे' नेते कारणीभूत

या सर्व घटना-घडामोडींत मुश्रीफ यांना आपण अल्पसंख्याक आहोत, हे जाणवण्याचे रहस्य दडलेले आहे. मुस्लिम मतदार अजितदादांपासून दूर गेला आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली आहे. 'पवारसाहेब माझे दैवत आहेत, ते माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागले आहेत, कळत नाही,' असे विधान मुश्रीफ यांनी केले आहे. याद्वारे मतदारसंघातील मुस्लिम मतदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेल्या राज्यभरातील मतदारांना साद घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. मुश्रीफ यांचा पक्ष भाजपसोबत आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार त्यांची साद ऐकतील, याची शक्यता वाटत नाही.

बंडखोरी करणाऱ्या पक्षांतील नेत्यांना मतदारांच्या नाराजीचा फटका सहन करावा लागला आहे. 'ईडी'च्या भीतीमुळे मुश्रीफ हे अजितदादांसोबत गेले, हे जगजाहीर आहे. शरद पवारांची साथ सोडल्याची किंमत येत्या निवडणुकीत आपल्याला मोजावी लागेल, असेही त्यांना कदाचित वाटत असेल. समरजितसिंह घाटगे हे शरद पवार यांच्यासोबत गेल्यामुळे नाही म्हटले तरी मुश्रीफांच्या मनात चलबिचल सुरू झाल्याचे दिसत आहे. शरद पवारांच्या डावपेचांची महिती मुश्रीफ यांना असणारच आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या अल्पसंख्याक असल्याचा मुद्दा समोर आणला आहे. एका अर्थाने हा त्यांनी शरद पवारांवर टाकलेला प्रतिडाव आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अशा प्रकारचे सर्व मुद्दे धुडकावून लावले होते. त्यामुळे मुश्रीफांचा हा प्रतिडाव निष्प्रभ ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com