

Hitendra Thakur News : मुंबई महापालिका एकहाती जिंकणाऱ्या भाजपला मात्र शेजारची वसई-विरार महापालिकेत पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या पराभवाच्या चर्चेपेक्षा हिंतेंद्र ठाकूरांनी विजय कसा खेचून आणला याचीच चर्चा आहे. कारण विधानसभा आणि लोकसभेला ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
विधानसभेला हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक ही ठाकूरांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. एकूण 115 जागांपैकी 71 जागांवर बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला तर भाजपला केवळ 43 जागा मिळवता आल्या.
भाजपकडून ठाकूर यांच्या पक्षातील पदाधिकारी फोडण्याचा धडाका लावला होता. मात्र, हितेंद्र ठाकूरांनी संयम ठेवत योग्य रणनीती आखत भाजपचा पराभव केला त्यासाठी आपला हुकमी एक्का बाहेर काढला तो म्हणजे 'भावनिक आवाहन आणि कार्यकर्त्यांवर विश्वास'
विजयानंतर हितेंद्र ठाकूर यांनी हा विजय कार्यकर्त्यांनाच समर्पित केला. ते म्हणाले, हा विजय कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या अथक मेहनतीमुळे हे शक्य झाले. तर, भाजपचे आमदार राजन नाईक यांनी हा पराभव स्वीकारत सांगितले की, मागील काळात आमचा फक्त इथे एक नगरसेवक होता. तेथून आम्ही 43 पर्यंत मजल मारली. आता महापालिकेत आम्ही पाहरेकरी म्हणून काम करणार आहोत.
या निवडणुकीत मतदारांनी इतर सर्व पक्षांना स्पष्ट नकार दिला. शिवसेना शिंदे गटाला केवळ एकच जागा मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाचे खातेही उघडले नाही. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. अपक्ष आणि इतर उमेदवारही पूर्णपणे नामशेष झाले. त्यामुळे वसई-विरारचे राजकारण प्रत्यक्षात दोनच पक्षांपुरते मर्यादित राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बहुजन विकास आघाडीने अनेक प्रभागांत चारही सदस्यांचे पॅनल विजयी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 6-01, 7, 8, 9, 12, 13, 14, 19, 20, 21-03, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 मध्ये बविआचा प्रभाव ठळकपणे दिसून आला. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. तर,
भाजपने प्रभाग क्रमांक 2, 5, 6-03, 10, 11, 15, 16, 17, 18, 21-01, 22 आणि 23 मध्ये विजय मिळवला असला, तरी तो अपुरा ठरला.
राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत मतदारांनी बदलापेक्षा सातत्यावर विश्वास दाखवला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि स्थानिक प्रश्नांवरील बविआची पकड या विजयामागील प्रमुख कारणे ठरली आहेत.
या निकालामुळे महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि विविध सभापती पदांवर बहुजन विकास आघाडीचाच दबदबा राहणार हे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही वसई-विरारमध्ये बविआ मजबूत स्थितीत असल्याचे राजकीय संकेत या निकालातून मिळाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.