
BJP Politics : लोकसभेत महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपची कामगिरी विशेष चांगली नव्हती. भाजपला लोकसभेत स्वबळावर बहुमताचा आकडा देखील गाठता आला नाही.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी होणार आणि काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार असेच चित्र होते. मात्र, महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अशक्य वाटणार विजय खेचून आणला. दिल्लीमध्ये देखील 'आप' भाजपला रोखेल अरविंद केजरीवास यांची जादू चालेन, अशीच चर्चा होती. मात्र, ती देखील फोल ठरली. भाजपने दिल्ली विधानसभा देखील दिमाखात काबीज केली.
अशक्य वाटणारे विजय भाजपने कसे खेचून आणले. हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस, महाविकास आघाडीच विजयी होईल असे चित्र असताना भव्यदिव्य विजय भाजपने कसे मिळवले, याचे कोडे अजुनही काही जणांना सुटलेले नाही. मात्र, योग्य रणनीती आखली तर काय होते हेच भाजपने दाखवून दिले आहे.
नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांचे सक्रिय योगदान, बुथ पातळीवरील मजबूत संघटन, आणि प्रभावी प्रचारयंत्रणा यासह अनेक गोष्टींमुळे भाजपचा विजय सोप्पा झाल्याचे दिसते.
लोकसभेत 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या 240 जागा मिळाल्या. एनडीएतील मित्र पक्षांच्या साथीने भाजप पुन्हा सत्तेत आला. मात्र, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जादू राहिली नसल्याची टीका होण्यास सुरुवात झाली. मात्र, आपल्या विरोधकांना पुन्हा एकदा चुकीचे ठरवले.
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली या तीनही विधानसभा निवडणुकीत मोदींनी जोरदार प्रचार केला. त्यांची लोकप्रियता अजुनही टिकून आहे हे ते आपल्या सभांमधून दाखवून देत होते. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीत त्यांनी मतदारांशी संवाद साधताना त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला. आत्मनिर्भर भारत, विकास, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. भाजपचा विजयामध्ये नरेंद्र मोदींचा प्रचार हा महत्त्वाचा ठरला.
लोकसभा निवडणुकीत भाजपपासून संविधान बदलाच्या मुद्यावर दलित मतदार भाजपपासून दूर गेल्याचे दिसले. ते मतदार पुन्हा मिळवण्यासाठी लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच भाजपने तयारी केली. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील कोणतीही शक्ती संविधान बदलू शकत नाही, हे छातीठोकपणे सांगितले. त्याचा परिणाम हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसून आला. महाराष्ट्रातील नवबौद्ध हा दलित मतदार अपवाद वगळता भाजपला दलित समुहातून मोठा पाठींबा मिळाला तर, हरियाणामध्ये दलितांमधील जाटव समुदाय वगळता बाकी सर्वच दलितांचा भाजपाला मोठा पाठींबा मिळाला.
भाजपने दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये प्रभावशाली जातींच्या विरोधात ओबीसींची एकजुट घडवून आणली. महाराष्ट्रामध्ये मराठा, तर हरियाणामध्ये जाट हे प्रभावशील आहेत. त्यांच्यामुळे ओबीसींचे आरक्षण जाईल, असा अंतर्गत प्रचार करत ओबीसींची एकजुट भाजपने घडवून आणली. त्यामुळे ओबीसींचे मोठ्या प्रमाणात भाजपला पाठींबा मिळालाच तसेच प्रभावशाली जातींमधून देखील भाजपच्या मागे गेला.
आरएसएस लोकसभेला सक्रीय नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुकीत आरएसएसने भाजपला पूर्ण पाठींबा दिला. भाजपसाठी आरएसएसच्या स्वयंसेवकांनी घरोघारी जात प्रचार केला. घर ते घर संपर्क मोहिम राबवत संघ कार्यकर्ते थेट मतदारांपर्यंत पोहोचले आणि भाजपच्या धोरणांचे समर्थन केले. हिंदुत्वासाठी भाजप सरकार का आवश्यक आहे हे पटवून दिले. आरएसएसची शक्ती भाजपच्या मागे उभी राहिल्याने त्यांना ग्राऊंडवर प्रचार मोहीम राबवणे सोपे गेले. त्यामुळेच तीनही विधानसभा निवडणुकीत त्यांना भव्य विजय मिळवता आला.
भाजपने आपल्या निवडणूक प्रचार मोहिमध्ये हिंदुत्व आणि विकास या मुद्यांवर भर दिला. हिंदुत्वामुळे त्यांना वेगवेगळ्या जातींमधील मतदारांना एकवटता आले. तर, विकासाची भाषा बोलून मध्यवर्गीय मतदारांना आकर्षित केले. राम मंदिर निर्माण, कलम ३७० हटवणे या मुद्यांचा प्रचारात प्रभावी वापर भाजपकडून करण्यात आला.
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीमध्ये भाजपचा विजय हा एकाच गोष्टीवर अवलंबून नव्हता. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, आरएसएसच्या कार्यकर्त्यांची मेहनत, बुथ पातळीवरील मजबूत संघटन, हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांचे प्रभावी राजकारण, विरोधकांचा कमकुवतपणा, तसेच प्रचार तंत्राचा प्रभावी वापर या सर्व घटकांमुळे भाजपने या निवडणुकीत विजय मिळवला.
भाजपने लोकांच्या भावना समजून घेऊन त्यावर आधारित प्रचार केला, विरोधकांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला आणि प्रभावी सोशल मीडिया आणि ग्राउंड लेव्हल प्रचार यंत्रणा वापरून मोठा विजय मिळवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.