सचिन देशपांडे
वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा घटक असल्याचे सांगत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी 'वंचित' चा प्रवेश महाविकास आघाडीत झाल्याचे एकतर्फी घोषित केले. यापूर्वी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील शिवसेनेसोबत आमची प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगत आम्ही इंडिया आघाडीत नसलो तरी शिवसेना आमचा वकील असल्याचे सांगितले होते. पण, इंडिया आघाडीत अद्याप वंचित ला स्थान प्राप्त नाही हे मात्र उघड आहे.
वंचितला महाराष्ट्रापुरते सिमित ठेवण्याच्या या हालचाली असून महाविकासचा घटक इतकीच काय ती वंचितच्या 'बाऊंडरी' निश्चित करण्यात येत आहे. त्याच बरोबर वंचितने मागितलेल्या १२ जागांवर तर फुल्या मारल्या गेल्या आहे. केवळ २ जागांवर वंचितची बोळवण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप कुठले ही भाष्य केले नाही. अजून ही वंचित इंडिया आघाडीच्या ‘येऊ का घरात’ या नाट्यात अग्रेसर आहे.
काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांच्या नेत्यांसोबत दिल्लीत बैठक आहे. यात राज्यातील लोकसभा निवडणूकीच्या रणनीती बरोबर जागा वाटपांची चर्चा रंगणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुकूल वासनिक यांच्या सोबत होणाऱ्या या बैठकीत नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या काँग्रेस नेत्यांबरोबर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. आज ही बैठक महत्वपुर्ण असून या बैठकीत संक्रातीच्या दिवशी दिल्लीत सोनिया गांधी, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या होणाऱ्या बैठकीची साखर पेरणी होणार आहे.
शिवसेनेने २३ जागांची मागणी केली आहे. त्याच बरोबर गेल्या निवडणुकीत इतक्या २२ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मागणी करेल. महाराष्ट्रात काँग्रेसने २६ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यामुळे ही आकडेवारी पाहिल्यावर महाविकास चा घटक असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही घटक काँग्रेसला किती जागा महाराष्ट्रात सोडतात किंवा काँग्रेस या दोन पक्षांना किती जागा सोडते हे आजच्या चर्चेत ठरेल. त्यावर संक्रांतीच्या दिवशी शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे संपुर्ण राज्याचे याकडे लक्ष राहणार आहे.
पण, आजच्या या बैठकीपूर्वी संजय राऊत यांनी सोमवारी वंचित महाविकास आघाडीचे घटक असल्याचे एकतर्फीच घोषित केले. एखाद्या आघाडीत समविष्ठ करताना तिन्ही राजकीय पक्षांची संयुक्त बैठक, प्रेस कॉन्फरन्स झाली नसल्याने महाविकास आघाडीचे एकतर्फी 'चॉकलेट' प्रकाश आंबेडकर सहजासहजी स्विकारणार नसल्याची माहिती आहे. वंचित महाविकास आघाडीचा घटक असल्याचे घोषित केल्यानंतर नेमक्या किती जागा वंचितला सोडल्या जातात आणि त्यास वंचितची मंजुरी मिळेल, काय असा प्रश्न कायम आहे. वंचित काँग्रेसला वारंवार इंडिया आघाडीत समाविष्ठ करा, अशी मागणी करत असताना काँग्रेस मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे.
महाविकास आघाडीला वंचित लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे वंचितने जर लोकसभेत १२ जागांचा मागणी केली म्हणजे विधानसभा निवडणुकीत वंचित ३६ ते ४८जागांची मागणी करु शकते. अशा वेळी वंचित लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीत समाविष्ट होताना त्यांना विधानसभेचे पण, मोठेच 'चॉकलेट' द्यावे लागले. हे 'चॉकलेट' महाविकास आघाडी देणार असेल तरच वंचित लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी सोबत असेल अन्यथा, एकला चलो रे हा पर्याय वंचित समोर खुला आहे. लोकसभेत वंचित महाविकास आघाडीचा घटक राहते की नाही यावर विधानसभा निवडणूकीचे गणित निश्चित होईल. त्यामुळे वंचितला महाविकास आघाडीचे 'चॉकलेट' देताना इंडिया आघाडीचे 'लॉलीपॉप' दाखवून होणार नाही हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.