
Operation Sindoor: India's Strategic Military Response : पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाक सैन्याने भारतावर ड्रोन, मिसाईल डागले. त्यालाही भारतीय लष्कराने नेस्तनाबूत करत पाकला अद्दल घडवली. यादरम्यान भारतातील प्रत्येक नागरिक भारतीय लष्कराच्या आणि केंद्र सरकारच्याही पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे असदुद्दीन ओवैसी.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार ओवैसी यांच्या भूमिकेचे संपूर्ण देशानं कौतुक केले. या काळात त्यांची राजकीय प्रतिमा लखलखीतपणे देशाच्या समोर आली. दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानातील नेत्यांच्या विखारी विधानानंतर, पाक सैन्याच्या हल्ल्यानंतर आणि भारताच्या सडेतोड प्रत्युत्तरानंतरच्या ओवैसी यांची विधाने पाकिस्तानला घाम फोडणारी होती. तर एकसंध भारताची कणखर बाहू अधिक बळकट करणारी ठरली.
दहशतवाद्यांनी पहलगामध्ये धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तशी विधाने करत वात पेटविण्याचा प्रयत्नही केला. पण तो यशस्वी झाला नाही. यामागे ओवैसी यांची भूमिकाही महत्वाची मानली जाते. दहशतवादी हल्ल्यानंतर ओवैसी यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हटले होते. मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत असल्याच्या पाकचा दावा खोडून काढताना त्यांनी भारतात जवळपास 20 कोटी मुस्लिम आपल्या अधिकारांसह राहत असल्याचे ठणकावून सांगितले होते.
ऑपरेशन सिंदूरचे तर ओवैसींनी तोंडभरून कौतुक केले होते. पाकबाबतीत हाच न्याय योग्य असल्याची सडेतोड भूमिका त्यांनी मांडली होती. पाकमधील नेत्यांकडून सातत्याने भारताला आण्विक हल्ल्याचा इशारा दिला जात होता. जहरी टीका केली जात होती. या नेत्यांना त्याच भाषेत ओवैसी सातत्याने प्रत्युत्तर देत होते. जणूकाही तेच भारताचा चेहरा बनून पाक नेत्यांचा प्रत्येक हल्ला परतवून लावत होते. त्यामुळेच या काळात पाकिस्तानमध्ये ओवैसींची चर्चा नसेल तरच नवल. भारतात तर या काळात त्यांची लोकप्रियता निश्चितच वाढली. सर्वात आक्रमक विधाने करत त्यांनी पाकला पाणी पाजले होते.
दहशतवादी हल्ला झाल्यापासून ते दोन्ही देशांमधील शस्रसंधीपर्यंत ओवैसी यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याची दखल घेतली. आता जगासमोर ते भारताची बाजू मांडणार आहेत. पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ अनेक देशांचा दौरा करणार आहे. या शिष्टमंडळात ओवैसींचाही समावेश करण्यात आला आहे. ते युरोपातील अनेक देशांत जाणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग असतील. एकप्रकारे मोदींनी त्यांनी या काळात केलेल्या कामाची दखलच घेतल्याची चर्चा आहे. यामागे सरकारची काही राजकीय समीकरणे असोत किंवा नसोत, पण देशवासियांच्या मनात तर हीच भावना आहे.
पाकपुरस्कृत दहशतवादाला विरोध आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी पुढे आलेला एक कणखर आवाज म्हणून ओवैसींची प्रतिमा बनली आहे. धर्मनिरपेक्ष भारतासाठी हा आवाज गरजेचाच आहे. त्याचवेळी भारतात धार्मिक तेढ निर्माण करू इच्छिणाऱ्या पाकिस्तानलाही त्यांच्याच भाषेत सुनावत आरसा दाखविण्याचे काम करत ओवैसींनी देशवासियांची मन निश्चितपणे जिंकले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.