Siddhartha Shankar Ray: आणीबाणीची 'ती' काळी रात्र! 'हे' होते मास्टरमाइंड; इंदिरा गांधी यांचे विश्वासू

Who Was Siddhartha Shankar Ray? पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.
Who Was Siddhartha Shankar Ray?
Who Was Siddhartha Shankar Ray? Sarkarnama
Published on
Updated on

देशात 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. आणीबाणी लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी घेतला होता, मात्र त्यामागे एक सूत्रधार होते, जे इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचित होते. त्यांनीच आणीबाणीबाबत इंदिरा गांधी यांना सविस्तर माहिती दिली होती.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनसार आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असं त्यांनी इंदिरा गांधी यांना आश्वस्त केलं होतं. त्यांचं नाव सिद्धार्थ शंकर रे, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री. रे यांनी केंद्रातही मंत्रिपद भूषवलं होतं. पश्चिम बंगालचे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांचे रे हे अत्यंत निकटचे मित्र होते.

रे यांचा जन्म बंगाली वैद्य कुटुंबात 20 ऑक्टोबर 1920 रोजी झाला. त्यांचे वडील बॅरिस्टर सुधीर कुमार रे हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली करत. ते काँग्रेसचे सदस्यही होते. त्यांच्या मातुःश्रींचं नाव अपर्णा देवी. अपर्णा देवी या स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कन्या. मंजुला बोस आणि पद्मा खस्तागीर या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती. यातील मंजुला बोस या सिद्धार्थ शंकर रे यांच्या भगिनी. भारताचे पाचवे सरन्यायाधीश सुधी रंजन दास आणि बंगालचे माजी अॅटर्नी जनरल सतीश रंजन दास हे सिद्धार्थ शंकर रे यांचे नातेवाईक.

रे यांचं शिक्षण कोलकाता येथील मित्रा इन्स्टिट्यूशन, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं. कलकत्ता विद्यापाठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. साडेसहा फूट उंचीचे रे हे महाविद्यालयीन जीवनात खेळ आणि राजकारणातही सक्रिय होते. विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती.

प्रेसिडेन्सी कॉलेजच्या क्रिकेट संघाचं कर्णधारपद त्यांनी भूषवलं. 1944 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील संघ चॅम्पियन ठरला. सलग तीन हंगामांत त्यांनी तीन द्विशातकांसह 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यांना लॉन टेनिस आणि टेबल टेनिसचीही आवड होती. 1947 मध्ये त्यांना वकील म्हणून लंडनमधील इनर टेम्पलच्या प्रतिष्ठित सोसायटीतर्फे बारमध्ये बोलावण्यात आलं होतं. लंडनमधील वास्तव्यात त्यांनी इडियन जिमखाना क्लबसाठी क्रिकेट खेळलं.

Who Was Siddhartha Shankar Ray?
BSP founder Kanshi Ram: पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं...

लंडनमधून परतल्यानंतर रे यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात रामाप्रसाद मुखर्जी यांचे ज्यूनियर म्हणून काम सुरू केलं. 1954 मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. दरम्यानच्या काळात ते काँग्रेस पक्षात सक्रिय होते.1957 च्या निवडणुकीत काँग्रेसनं त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी डॉ. बिधान चंद्र रॉय हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात रे यांना संधी मिळाली. ते सर्वात तरुण मंत्री ठरले.

कालांतराने डॉ. रॉय यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी मंत्रिपदासह काँग्रेस पक्षही सोडला. 1962 मघ्ये ते भवानीपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले. 1967 ची निवडणूक येईपर्यंत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत ते चौरंगी मतदारसंघातून विजयी झाले. 1969 मध्ये काँग्रेसचे दोन गट पडले. त्यावेळी रे यांनी इंदिरा गांधी यांच्या गटात राहणं पसंत केलं. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या मंत्रिमंडळातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे सिद्धार्थ शंकर रे हे दशकभरानंतर केंद्राच्या राजकारणात गेले. त्या काळातील सर्वाधिक चर्चित नेत्यांपैकी ते एक होते. केंद्रात गेल्यानंतर ते इंदिरा गांधी यांचे विश्वासू सल्लागार बनले. प्रत्यक्षात, बालपणापासूनच रे यांचा इंदिरा गांधी यांच्याशी परिचय होता. बांग्लादेश मुक्तिलढ्यात त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केलं.

बांग्लादेश मुक्तीसाठी लढणारे आणि भारत सरकार यांच्यामधील ते प्रमुख दुआ होते. पश्चिम बंगालप्रमाणे देशाच्या राजकारणातही रे यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नक्षलवाद्यांच्या बीमोड केला. पंजाबचे राज्यपाल असताना खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. शीतयुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघात राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Who Was Siddhartha Shankar Ray?
Chandra Shekhar Political Journey: इंदिराजींनी सांगितल्यावरही मोरारजींची माफी न मागणारे निर्भीड, स्पष्टवक्ते माजी पंतप्रधान...

1962 ते 1972 या कालवधीत रे हे केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर ते राज्यात परत आले. इंदिरा गांधी यांची मर्जी असल्यामुळे 1972 मध्ये ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केला. तथापि, यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीवर मोठी टीका झाली. नक्षलवाद्यांच्या हत्येचे आरोप त्यांच्यावर झाले, मात्र ते सिद्ध झाले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. माध्यमाशी बोलताना रे यांनी आपल्या या सल्ल्याला योग्य ठरवलं होतं. त्यावेळी देशातील अनेक भागांमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं कठोर पावलं उचलणं गरजेचं झालं होतं, असं ते म्हणाले होते.

आणीबाणीचा निर्णय इंदिरा गांधी यांनी लागू केला, मात्र त्यामागचे खरे सूत्रधार हे सिद्धार्थ शंकर रे होते. 1975 ते 1977 अशी आणीबाणी लागू होती. त्याचा प्रस्ताव रे यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर ठेवला होता. राज्यघटनेच्या अधीन राहूनच आणीबाणी लागू केली जाऊ शकते, हे त्यांनी इंदिरा गांधी यांना पटवून दिलं. त्याचा मसुदाही रे यांनी तयार केला होता.

इंदिरा गांधी यांचे खासगी सचिव राहिलेले आर. के. धवन यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली होती. आणीबाणीबद्दल इंदिरा गांधी यांना पटवून द्यायच्या आधी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना ही माहिती दिली होती. नंतर इंदिरा गांधी आणि रे यांनी मिळून राष्ट्रपतींशी चर्चा केली होती.

रे हे 1972 मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांच्यासमोर गंभीर समस्या उभ्या होत्या. पूर्वी पाकिस्तानातून आलेल्या दहा लाखांपेक्षा अधिक शरणागतांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न होता. हा प्रश्न त्यांनी हाताळला. पश्चिम बंगाल पंचायत कायदा मंजूर करणं, हे रे यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्वाचं काम मानलं जातं. चारस्तरीय व्यवस्था त्रिस्तरीय करण्यात आली होती. पुढे घटनादुरुस्ती करुन ती देशपातळीवर स्वीकारण्यात आली. आपल्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी त्यांनी आयोग स्थापन केला. लाच घेणाऱ्या एका मंत्र्याला त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. त्यांच्या कार्यकाळातच कोलकाता येथे मेट्रोचं काम सुरु झालं.

डाव्या पक्षांच्या समर्थकांवर त्यांनी केलेल्या कारवाईवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. डाव्या चळवळीचे समर्थक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अत्याचार करण्यात आला, बळाचा वापर करण्यात आला. कोलकाता महापालिकेत त्यावेळी डाव्यांची सत्ता होती. रे यांनी महापालिका बरखास्त केली. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महापौरपदासाठी निवडणूक झालीच नव्हती.

पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. रे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. काँग्रेसच्या पराभवला रे यांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांच्यावर चौफेर टीका झाली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले. 1978 मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक झाली. इंदिरा गांधी यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात रे मैदानात उतरले.

हे इंदिरा गांधी यांना आवडले नव्हते. केंद्रात 1980 मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली, इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. त्यानंतर काही काळ त्यांनी रे यांना बाजूला सारलं होतं. 1982 ते 1986 कालावधीत रे पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 1991 मध्ये ते चौरंगी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. 1992 पर्यत ते विरोधी पक्षनेते होते.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर रे यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांच्याविरोधात बोलपूर मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. काँग्रेसमधील नेत्यांचा एक गट रे यांच्या विरोधात सक्रिय होता. रे यांची लोकप्रियताही घटली होती. त्यामुळे सोमनाथ चटर्जी यांच्याकडून त्यांना एक लाखापेक्षा अधिक मतांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2 एप्रिल 1986 रोजी राजीव गांधी यांनी रे यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.

पंजाबमध्ये त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. खलिस्तानवाद्यांचा, अलगाववाद्यांचा बीमोड करण्यासाठी रे यांनी महत्वाची भूमिका बजावली, मात्र येथेही त्यांच्यावर पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचे आरोप झाले. 1989 मध्ये व्ही. पी. सिंह पंतप्रधान बनले. त्यानंतर त्यांनी रे यांना राज्यपालपदावरून दूर केलं.

सोव्हिएत रशियाचे तुकडे पडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली होती. सोव्हिएत रशिया हा भारताचा मित्र होता. भारताचे अमिरेकेशी फारसे चांगले संबंध नव्हते. सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर नरसिंहराव यांनी रे यांची अमेरिकेत राजदूत म्हणून नेमणूक केली. भारत-अमेरिकेचे संबंध सुधारण्यात रे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

रे हे 1992 ते 1996 पर्यंत अमेरिकेत भारताचे राजदूत होते. याचदरम्यान 1995 मध्ये ते पश्चिम बंगालच्या राजकारणात परत येतील, असे अंदाज बांधले जात होते, मात्र ते खरे ठरले नाहीत. प्रदेश काँग्रेसधून त्यांना होणारा विरोध यासाठी कारणीभूत ठरला. 1996 मध्ये राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकीली सुरू केली होती.

काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतरही ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. रे यांनी 1999 मध्ये त्यांच्या कारकीर्दीतील शेवटची निवडणूक उत्तर पश्चिम कलकत्ता विधानसभा मतदारसंघातून लढवली. या निवणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. 6 नोव्हेंबर 2010 रोजी किडनी विकारामुळं त्यांच निधन झालं.

रे यांच्याशी संबंधित किश्श्यांची चर्चा आजही होत असते. लहानपणी एका बाहुलीसाठी त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी त्यांच भांडण झालं होतं. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या कुटुंबीयांचं वास्तव्य अलाहाबाद म्हणजेच आताच्या प्रयागराज येथे होतं. इंदिरा गांधींचे आजोबा मोतीलाल नेहरू हे स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात वकील होते. त्या आजोबांच्या लाडक्या होत्या, कायम त्यांच्यासोबत असायच्या. 1922 मधील ही गोष्ट आहे.

मोतीलाल नेहरू हे त्यांचे मित्र देशबंधू चित्तरंजन दास यांना भेटायला गेले होते. अर्थात इंदिरा गांधीही सोबत होत्या. चित्तरंजन दास त्यावेळी अलाहाबादला आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातू सिद्धार्थ शंकर रे होते. दास यांच्यासोबत मुलगा आहे की मुलगी, याची कल्पना नेहरू यांना नव्हती. त्यामुळं त्यांनी भेट म्हणून देण्यासाठी एक बाहुली घेतली होती, त्यांनी ही बाहुली रे यांना दिली. ते इंदिरा गांधी यांना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांनी रे यांच्या हातून ती बाहुली हिसकावून घेतली. काहीवेळ रे आणि इंदिरा गांधी यांच्यात भांडण झालं. या भांडणात बाहुलीचे तुकडे झाले होते.

पुढे इंदिरा गांधी पंतप्राधान बनल्या. बाहुलीवरून इंदिरा गांधींशी भांडण झाल्याच्या घटनेनंतर 33 वर्षांनी रे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. इंदिरा गांधी यांचे जे अत्यंत विश्वासू सहकारी होते, त्यात रे यांच नाव शीर्षस्थानी होतं. यातूनच आणीबाणी लागू करण्यात रे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळीचा बीमोड, खलिस्तानवाद्यांना जेरीस आणणं आणि भारत आणि अमिरेकेचे संबंध सुधारण्यात रे यांचं मोलाचं योगदान होतं. त्यामुळं त्यांना काँग्रेसचे संकटमोचक असंही म्हटलं जायचं.

रे हे ज्योती बसू यांचे मित्र होते. ते नेहमी बसू यांच्या घरी, थेट किचनमध्ये जायचे आणि खाण्यासाठी काही आहे का, हे पाहत असत. बांगलादेश युद्धाच्या आधी रे यांनी बसू यांची इंदिरा गांधी यांच्याशी भेट घडवून आणली होती. इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी तासभर ही भेट झाली. कोणालाही याची माहिती होऊ नये, यासाठी रात्री 11 वाजता रे यांनी आपल्या कारमधून त्यांना नेलं होतं. भेटीनंतर ते बाहेर पडले आणि रॉय रस्ता विसरले. त्यामुळं त्यांनी दिल्लीत त्यांना अनेक गोल चकरा माराव्या लागल्या होत्या. एखाद्या पोलिस ठाण्यात जाऊन पत्ता विचारू, असं रे म्हणाले होते, मात्र त्यामुळं आपण इंदिरा गांधी यांना भेटलो, हे बाहेर कळेल, असं ज्योती बसू यांना वाटलं होतं. त्याचवेळी रे यांना रस्ता सापडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com