Jalna News : आगामी काळात लवकरच विधानसभा निवडणुकीची धामधूम पहावयास मिळणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाने तयारी सुरू केली आहे. सर्वच मतदारसंघात आतापासूनच उमेदवारीसाठी चढाओढ सुरु झालेली आहे. जालन्याची ओळख गेल्या 30 ते 35 वर्षांपासून भाजपचा बाल्लेकिल्ला अशीच राहिली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेल्या रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहाव्या निवडणुकीत अनपेक्षितपणे काँग्रेसच्या (Congress) कल्याण काळे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मतदारसंघातील चित्र 360 डिग्रीने पूर्णपणे बदलले आहे.
या मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव जाणवतो. मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्याचा प्रभाव नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संपूर्ण राज्यभर जाणवला. (Jalna Assembly Election)
जालना जिल्हा ओबीसी बाहुल असल्याने याठिकाणी ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. विशेषता ओबीसी समाजात लिंगायत, धनगर, माळी, बंजारा, वंजारी व राजपूत हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. मतदारसंघात ओबीसी समाज 35 टक्के असून 10 टक्के दलित समाज आहे. मराठा समाज 30 टक्के असून मुस्लिम समाज 15 टक्के तर इतर समाज 10 टक्के इतका आहे.
अस्सल ग्रामीण बोलीभाषा, कार्यकर्त्यांत मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे रावसाहेब दानवे यांचा गेल्या 40 वर्षांचा राजकीय आलेख चढताच ठरला. भल्याभल्यांना राजकारणात 'चकवा' देणारे म्हणून रावसाहेब दानवे यांची ओळख आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास हा तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्त्रोतच राहिला आहे.
मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नावानिशी आजही ओळखणारे रावसाहेब दानवे यांच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्याशी एकनिष्ठ होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गडाला काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी सुरुंग लावला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांना मराठा समाजाची नाराजी भोवली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव जाणवणार असल्याने विद्यमान आमदारात मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबतची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.
पक्षीय बलाबल :
जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. बदनापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तर परतूर मंठा मतदारसंघात भाजपचे व घनसावंगीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत. जिल्ह्यात तीन भाजपचे, एक काँग्रेस व एक शरद पवार गटाचा आमदार आहे.
मतदारसंघनिहाय आमदार व पक्ष
जालना विधानसभा : कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
बदनापूर विधानसभा : नारायण कुचे (भाजप)
भोकरदन विधानसभा : संतोष रावसाहेब दानवे (भाजप)
परतूर मंठा विधानसभा : बबनराव लोणीकर (भाजप)
घनसावंगी : राजेश टोपे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
जालना विधानसभा :
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे विद्यमान मंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव करीत विजय मिळवला. या मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सातत्याने खोतकर व गोरंट्याल यांच्यात पाठशिवणीचा खेळ पाहावयास मिळतो. एक टर्म गोरंट्याल तर दुसरी टर्म खोतकर असा येथील इतिहास आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आमदार होते तर 2014 मध्ये शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार होते. यावेळेसही काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल पुन्हा इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर उमेदवार असण्याची शक्यता आहे.
बदनापूर विधानसभा :
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नारायण कुचे दुसऱ्यांदा विजयी झाले. अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात 2014 साली प्रथमच नारायण कुचे विजयी झाले. या निवडणुकीत भाजपकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळेस हॅट्ट्रिक करणार का याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जागा कॊणाच्या वाट्याला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे. हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला तर या ठिकाणी माजी आमदार संतोष सांबरे निवडणूक रिंगणात उतरू शकतात.
भोकरदन विधानसभा :
या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष रावसाहेब दानवे सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांचा 32 हजार मताने पराभव केला होता. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आतापर्यंत त्यांचाच वरचष्मा राहिला आहे. यावेळेस महायुतीकडून पुन्हा संतोष दानवे हेच उमेदवार असणार आहेत, त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. महाविकास आघाडीकडून जागा कॊणाला सुटते याकडे सर्वांचे लसख लागले आहे. त्यांनतर उमेदवार ठरणार आहे.
परतूर मंठा विधानसभा :
या मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुरेश जेथलिया यांचा 26 हजार मताने पराभव केला होता. या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा बबनराव लोणीकर मैदानात उतरणार असून ते निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरणार आहे.
घनसावंगी विधानसभा :
हा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला आहे. 2019च्या निवडणुकीत येथून माजी मंत्री राजेश टोपे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या हिकमत उड्डाण यांचा 3400 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री होते. कोरोनाकाळात त्यांनी चांगली कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासॊबत आहेत. 1999, 2004, 2009, 2014 व 2019 या सलग पाच विधानसभा निवडणूकात ते घनसावंगी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महायुती कोणाला निवडणूक रिंगणात उतरविणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.