New Delhi : जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकीची रंगत चांगलीच वाढू लागली आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी वगळता इतर सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला सर्व 90 जागांवर उमेदवार जाहीर करताना नाकीनऊ आले आहे. मात्र, त्यानंतरही राज्यात सत्तेत येण्याची स्वप्न भाजपला पडू लागली आहेत.
राज्यात अनेक जांगावर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स, भाजप आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी हे प्रमुख पक्ष एकमेकांना भिडतील. मात्र, आणखी एक पक्ष काश्मीरमध्ये चमत्कार घडवून आणू शकतो. भाजपची मदारही याच विरोधी पक्षावर असल्याचे सध्याचे चित्र आहे.
अवामी इत्तेहाद पार्टी असे या पक्षाचे नाव असून खासदार शेख अब्दुल रशीद हे पक्षाचे नेते आहे. टेरर फंडिंगच्या आरोपाखाली केंद्र सरकारने त्यांना काही महिन्यांपूर्वी अटक केली आहे. सध्या ते जेलमध्ये असून तिथूनच लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी तब्बल 4 लाख 72 हजार मते मिळवत माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला होता.
शेख रशीद हे इंजिनिअर रशीद म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्ष प्रामुख्याने उत्तर काश्मीर आणि मध्य काश्मीरमध्ये 35 ते 40 उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. रशीद यांचा बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ याच भाग आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाला खूप अपेक्षा आहेत.
भाजपकडून आतापर्यंत 51 उमेदवारांची घोषणा करण्यात आले असून आणकी 15 ते 20 उमेदवार दिले जाऊ शकतात. उरलेल्या 20 ते 30 जागांवर समविचारी अपक्षांना पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तर इंजिनिअर रशीद यांच जादू चालल्याने 35 ते 40 जागांवर मतविभाजन होईल. त्याचा थेट फायदा भाजपला मिळू शकतो, असे गणित आहे.
निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी आघाडी करण्यासाठी अपक्षांना सोबत घेतले जाऊ शकते. अर्थात पक्षाला जागा किती मिळणार, यावर हे गणित अवलंबून असणार आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर पुन्हा राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे रशीद निवडणुकीत किती मते खेचणार, त्याचा विरोधकांना किती फटका बसणार आणि भाजपला किती फायदा होणार, हे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.