
- जयदीप पाठकजी
रुपेरी पडद्यावरील प्रतिमेचा वापर करून राजकारणामध्ये स्वतःचे अस्तित्व तयार करण्याचा कमल हसन यांचा प्रयत्न फसला आहे. कन्नड भाषेवर टीका करून चित्रपटावरील बंदीही त्यांनी ओढवून घेतली. राजकारण की सिनेमा या काठावर उभ्या असलेल्या कमल हसन यांनी हे असे उद्योग का केले असतील, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडल्याशिवाय राहत नाहीत. कमल हसन यांची राज्यसभेवर नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त...
भाषिक अस्मितेची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या तमिळनाडूमधील राजकारणाचा स्वतःचा असा एक बाज आहे. राजकारण आणि सिनेमा ही हातात हात घालून चालण्याचीच जणू क्षेत्रे आहेत, असा तिथला प्रघात आहे. एम. जी. रामचंद्रन, जयललिता, विजयकांत आदी नावे आपल्याला हेच दाखवून देतात. अर्थात या दिग्गजांइतकी राजकीय जीवनातील प्रतिष्ठा कमल हसन यांना मिळाली नाही. मात्र, ती मिळवण्यासाठी या 70 वर्षीय अभिनेत्याने वाट्टेल ते करून पाहिल्याचे ताज्या घडामोडी सांगतात. आता द्रमुकच्या पाठिंब्याने कमल हसन राज्यसभेवर गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम अर्थात ‘एमएनएम’ने द्रमुकचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर द्रमुकने ‘एमएनएम’ला राज्यसभेची जागा दिली होती. हे साटेलोटे झाल्यानंतर हसन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तमिळ, तेलगू, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमधील चित्रपटात काम केलेल्या कमल हसन यांचा आपल्याकडे महाराष्ट्रातही कोणे एके काळी विशिष्ट असा चाहतावर्ग होताच. आजही त्यांचा स्वतःचा असा चाहतावर्ग टिकून आहे. काळाशी सुसंगत राहून, कधी काळाच्या पुढचे प्रयोग करत तंत्रज्ञानाधिष्ठित सिनेमाचे त्यांनी केलेले प्रयोगही आपल्याकडे पाहिले गेले आणि त्याची चर्चा झाली. आशयाच्या दृष्टिकोनातून या सिनेमात किती वेगळेपणा होता, की दक्षिणेकडच्या ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’च्या एका विशिष्ट चक्रातच तो अडकला होता, हा चर्चेचा वेगळा विषय ठरेल. के. बालचंदर यांच्यासारख्या दिग्गजासोबत त्याने केलेले काम नावाजले गेले. ‘सदमा’, ‘सागर’, ‘पुष्पक’, ‘चाची ४२०’, ‘हे राम’ यांसारख्या सिनेमांना दक्षिणेत जसा प्रेक्षक लाभला, तसाच तो हिंदी पट्ट्यातही लाभला. मणी रत्नमचा अजरामर ‘नायकन’, व्यवस्थेविरोधात लढणारा ‘हिंदुस्थानी’ अशा अनेक चित्रपटांनी त्याच्यातील अभिनेत्याचाही कस लागलाच. कमल हसनच्या कारकिर्दीबाबतच नमनाला घडाभर तेल घालण्याचे कारण म्हणजे अभिनेता, नृत्य दिग्दर्शक, निर्माता-दिग्दर्शक अशा सर्वच भूमिकांमध्ये त्याने वेगवेगळे ‘प्रयोग’ केले आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. रजनीकांतप्रमाणे तो सुपरस्टार भलेही झाला नसेल, मात्र म्हणून एक अभिनेता म्हणून तो नक्कीच यशस्वी ठरला, हे नाकारता येणार नाही.
आयुष्याच्या एका टप्प्यावर रुपेरी पडद्यावरील यश-अपयश पचवल्यानंतर राजकारणात उतरण्याचा निर्णय त्याने घेतला आणि मग त्याच्या एकूण वक्तव्यावरून एकच वादंग झाला. रुपेरी पडद्यावर उत्तम यश मिळवल्यावर राजकारणातही स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याची सुरुवातही झाली. मात्र, त्यातून काही फारसे हाती आले नाही. कमल हसन आणि वाद असे एक समीकरणच होऊन गेले. ‘अभय’ नावाच्या चित्रपटात ‘न्यूड’ दृश्य देऊन खळबळ उडवून देणाऱ्या कमल हसनने राजकीय भूमिकांवरूनही असेच टीकेचे बाण सोडले. भाषा, प्रादेशिक अस्मिता, उजव्या विचारसरणीचे सरकार अशा अनेक मुद्द्यांवरून तो बोलत राहिला आणि कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करू लागला. काही आठवड्यापूर्वी त्याच्या ‘ठग लाइफ’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तमीळ भाषेतूनच कन्नड भाषेचा जन्म झाला आहे, असे विधान भलेही त्याने प्रसिद्धीचा स्टंट म्हणून केले असेल. मात्र, या विधानाचे दूरगामी पडसाद दक्षिणेकडील राज्यांमध्ये उमटले. कर्नाटकात त्याच्या चित्रपटावरील बंदीची घोषणा झाली. कमल हसनही या विधानावर ठाम राहिला आणि त्याने माफी मागण्यास नकार दिला.
या झाल्या चित्रपट क्षेत्रातील ताज्या घडामोडी. अर्थात हे सारे घडले असले तरीही स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केल्यापासून राजकीय आघाडीवर कमल हसन अपयशी ठरला आहे, असे आपल्याला दिसते. राजकीय आघाडीवर अद्याप तो चाचपडत असल्याचेच ताजा इतिहास सांगतो. ‘मक्कल निधी मय्यम’ अर्थात एमएनएम या पक्षाची स्थापना सन 2018 मध्ये त्याने केली. तमिळनाडूतील द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पारंपरिक पक्षापेक्षा माझा पक्ष कसा वेगळा आहे, तो तमिळनाडूला कसे उज्ज्वल भवितव्य देऊ शकतो, असे सांगायला त्याने सुरुवात केली. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणावरही त्याने टीका करण्यास सुरुवात केली. गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्याने असेच स्वतःची चाचणी करणे सुरू ठेवले. त्याच्या स्वतःच्या पक्षाची भूमिका त्याने कधीही उघडपणे जाहीर केली नाही. तमिळनाडूतील प्रादेशिक विषय त्याने कधीही लावून धरले नाहीत आणि स्थानिकांचे मुद्देही पुढे रेटले नाहीत.
गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि द्रमुकच्या राजकारणाजवळ तो जात असल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर समूहाची मानसिकता समजावून घेण्यात कमल आणि त्याच पक्ष कमी पडला हेच आपल्याला दिसते. समाजाचे भले व्हावे, यासाठी चित्रपटांपासून दूर होऊन राजकारणात पडत असल्याचे कमल हसन म्हणाला होता. आता गेल्या काही महिन्यांत त्याच्या या भूमिकेत 180 अंशांचा फरक पडला असून, पक्षाला अर्थसाह्य करण्यासाठी चित्रपटांची गरज आहे, असे तो म्हणू लागला आहे. एम. जी. आर. आणि विजयकांत या दोघांनीही आपापले पक्ष स्थापन केल्यानंतरही चित्रपटांत काम केले. राजकीय संदेश पोहोचविण्यासाठी चित्रपटांचा उपयोग केल्याचे इतिहास सांगतो. 2006 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतरही, विजयकांत यांनी त्यांचे चित्रपटांची संख्या कमी केली. मात्र, अभिनेते म्हणून ते सक्रिय होते. काही मुलाखतीमध्ये मी अर्धवेळ राजकारणी आहे, असेही कमल हसन यांनी म्हटले होते. म्हणजे याचाच अर्थ असा की राजकारण आणि चित्रपट अशा दोन्ही डगरींवर त्यांना पाय ठेवायचा आहे. द्रमुक आणि कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षात झालेल्या कराराप्रमाणे द्रमुकने हसन यांना पाठिंबा दिला आहे. राजकीय अस्तित्वासाठी सिनेमा की सिनेमातून राजकारणात ढवळाढवळ अशा विचित्र कात्रीत सध्या तो सापडला आहे.
जयललितांच्या माघारी तमिळनाडूतील सर्वच राजकारण सध्या द्रमुककेंद्रित झाल्याचे चित्र आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षालाही तेथे अजून झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. अण्णा द्रमुक भाजपसोबत आघाडी करीत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अजून एका राजकीय पक्षाचे अवकाश तमिळनाडूत खरंच शिल्लक आहे का, हा प्रश्न आहे. हा राजकीय अवकाश व्यापण्यासाठी चित्रपट क्षेत्राचा वापर करून घ्यायचा असे त्याचे सध्याचे सूत्र दिसते. काठावरचे राजकारण करीत राहण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अभिनेता म्हणून तो काठावरचा नसेलही. मात्र, त्याची सध्याची राजकीय कारकीर्द डळमळणाऱ्या ‘किनाऱ्या’वरूनच चालत असल्याचे चित्र आहे. चित्रपटसृष्टीत विविध ‘प्रयोग’ करण्यासाठी तो ओळखला जातो. मात्र, त्याच्या या काठावरच्या राजकारण ‘प्रयोगा’चे नक्की ईप्सित काय, याचे उत्तर येणारा काळच देईल. अभिनेता म्हणून यशस्वी झाल्यावर राजकारणातही यशस्वी होण्याचा अट्टाहास त्याने का धरावा, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा का, हाच खरा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.