
Kolhapur Politics News: राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवारी जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. नव्याने रचना झाल्याने कुणाच्या पथ्यावर, तर कुणासाठी नुकसानदायक अशी ही रचना ठरणार आहे. जिल्ह्यात तीन नव्या मतदारसंघांची बांधणी झाली असून, त्याचा फायदा कागल आणि करवीर मतदारसंघातील नेत्यांना होणार आहे. वास्तविक पाहता नव्या मतदारसंघांची रचना झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
जिल्ह्यातील अनेक नेत्यांना मनासारखा आणि गरजेनुसार प्रभाग मिळाल्याने ते खूश आहेत. तर काही मतदारसंघांत नाराजी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या स्थितीकडे पाहता, अनेकांच्या राजकीय सोयीसाठी नव्या प्रभागांचा फायदा होणार हे निश्चित आहे.
शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर पालिकेच्या स्थापनेमुळे जुन्या शिरोळ मतदारसंघाची पुनर्रचना करून नवीन यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील मतदारसंघांची संख्या कायम असूनही, मतदारसंघाच्या तोडफोडीमुळे अनेक गावे इतर मतदारसंघांमध्ये समाविष्ट झाली आहेत. आता ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण निश्चित झाले आहेत. २०१८ मध्ये शिरोळला नगरपरिषद स्थापन झाल्यामुळे शिरोळ पंचायत समिती गण रद्द झाला होता. मात्र, अकिवाट गण तसेचच राहिला होता. नव्या पुनर्रचनेनुसार अकिवाट व यड्राव हे दोन गट तयार झाल्याने शिरोळ तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मतदारसंघात आरक्षण हा निर्णायक घटक ठरणार आहे. शिवसेना व भाजप यांच्यात निवडणुकीपूर्वीच निकराची लढत अपेक्षित आहे.
हातकणंगले तालुक्यात किरकोळ बदल वगळता, ११ जिल्हा परिषद गट व २२ पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत. हातकणंगले नगरपंचायत झाल्यामुळे आळते जिल्हा परिषद मतदारसंघातून हातकणंगले वजा करून मजले व नेज ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. रूई हा नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ तयार होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. हुपरी नगरपंचायत झाल्यामुळे तो जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द झाला आहे. त्यातील तळंदगे व इंगळीचा समावेश पट्टणकोडोलीत केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी पुन्हा संपर्क सुरू केला असून, मतदारसंघातील अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यकर्त्यांना आर्थिक बळ पुरविण्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या देणग्यांचा मुद्दा समोर येण्याची शक्यता असल्याने इच्छुक सावध आहेत. हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर व भाजपचे महाडिक गट यांच्यात अधिक रंगत असणार आहे. त्यामुळे जागावाटप व कार्यकर्ते सांभाळणे हे महायुतीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. पुढील राजकारण आरक्षणावर अवलंबून आहे.
चंदगड तालुक्यात २०१७ ला गोठवलेल्या अडकूर मतदारसंघाचे नाव पुन्हा आले आहे. तुर्केवाडीचे नाव बदलून कुदनूर करण्यात आले असून, माणगाव व तुडये ही नावे कायम आहेत. एक मतदारसंघ गोठवून तो इतर चार मतदारसंघात समाविष्ट केल्यामुळे सर्वच मतदारसंघांची व्याप्ती वाढली आहे. चंदगड शहरातील मतदार वगळल्यामुळे गावांची अदलाबदल झाली असून, पारंपरिक वावरालाही धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक संदर्भ बदलले असून, सत्ताधारी व विरोधक यांचा प्रभाव जाणवेल. महाविकास आघाडीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. महायुती म्हणून निवडणूक लढायची झाल्यास येथील नेतृत्व ते स्वीकारते का, यावर लक्ष असेल. शक्तिपीठच्या मुद्द्यावरून महायुतीतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे एका म्यानात दोन तलवारी राहणार का, हाच प्रश्न आहे.
गडहिंग्लजमध्ये देखील ‘महायुती’समोर एकसंधतेचे आव्हान उभे आहे. यंदा प्रभाग रचनेत कोणताही बदल झालेला नाही. या निमित्ताने राजकीय जोडण्यांना वेग येणार असून महाविकास विरुद्ध महायुती अशी लढत होण्याचे संकेत असले तरी महायुतीसमोर एकसंधतेचे आव्हान असेल. महायुतीमध्ये भाजपसह अजित पवार राष्ट्रवादी असली तरी आमदारकीसाठी माजी आमदार राजेश पाटील व भाजपचे शिवाजी पाटील एकमेकांच्या विरोधात लढले. आता शक्तिपीठच्या निमित्ताने पुन्हा दोघेही विरोधात उभे ठाकले आहेत. यामुळे महायुती दुभंगण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे शिवसेना सज्ज, राष्ट्रवादी, शिंदे गटाचा कमी प्रभाव कमी असल्याने यांच्यासाठी प्रतिष्ठेचे लढाई असणार आहे.
भुदरगड तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पींची यांची प्रतिष्ठा पणाला असणार आहे. दोघेही महायुतीत असले तरी दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहे. मतदारसंघात कोणतेही बदल न झाल्याने इच्छुकांनी निश्वास सोडला. काही मतदारसंघात नाराजी उद्भवण्याची शक्यता आहे, तर इच्छुकांची संख्याही वाढणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांची व माजी आमदार के. पी. पाटील, राहुल देसाई, भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गारगोटी जि. प. मतदारसंघ सर्वच नेत्यांचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. राज्याची युती तालुक्यात होणार की गटनिहाय होणार हे अद्याप स्पष्ट नाही. आरक्षणानंतरच इच्छुकांच्या घडामोडींना वेग येईल. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडीची स्थानिक समीकरणे महत्वाची ठरणार आहे.
आजरा तालुक्यातील पुनर्रचनेत तालुक्यातील एक जिल्हा परिषद मतदारसंघ कमी झाला आहे. याबाबत राजकीय वर्तुळासह जनतेमध्ये संताप आहे. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती गण कमी झाल्याने नाराजीची भावना आहे. सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शवला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुनर्रचनेत इच्छुकांच्या आकांक्षावर विरजण पडले. काहींची जिल्हा परिषदेसाठी वारसदार मैदानात आणण्याची तयारी सुरू होती. काही मातब्बर मंडळींना जिल्हा परिषदेचे मैदान खुणावत होते. तत्पूर्वीच त्यांना तलवारी म्यान करण्याची वेळ आली. दोन जिल्हा परिषद मतदारसंघामुळे मतदारसंघाचा विस्तार वाढणार असून, प्रचारासाठी दमछाक होणार आहे.
कागल तालुक्यात मुश्रीफ आणि घाटगे यांच्या गटात खरी लढत असणार आहे. बानगे हा नवीन मतदारसंघ मिळाल्याने अनेकांची गणिते कोलमडली आहेत. पंचायत समितीच्या मतदारसंघातही फेरबदल झाले असून, काही प्रभागांचे पुनर्रचना करून नवीन गट तयार केले आहेत. बानगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पंचायत समिती गट समाविष्ट, तर बानगे हा नवीन गट तयार झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांच्या गटातच खरी लढत असणार आहे. भाजपचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यासाठी या दोन गटाच्या पुढे यश मिळवणे मोठे आव्हान असणार आहे.
करवीर तालुक्यात दोन मतदार संघ वाढल्याने मातब्बरांना बसणार फटका अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. करवीर तालुक्यातून सर्वाधिक १२ जिल्हा परिषद गट व २४ पंचायत समिती गणाची निर्मिती झाली. अनेक गणांची मोडतोड झाल्याने मातब्बरांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसला अनुकूल मतदारसंघात तोडफोड केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भौगोलिक परिस्थिती व विकासकामे केलेल्या गावांची अदलाबदल झाल्यामुळे मातब्बरांना फटका बसून, नवीन उमेदवारांना फायदा होणार आहे.
राधानगरी तालुक्यात कोणताही बदल नसल्याने समीकरणे ‘जैसे थे’ आहेत. मागील वेळी जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन आणि आबिटकर गटाचे एक सदस्य होते. पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी पाच, काँग्रेस चार आणि शिवसेना एक असे बलाबल होते. आता प्रकाश आबिटकर पालकमंत्री असल्याने आपली ताकद आणि पदाच्या अस्तित्वासाठी ते काय मोर्चे बांधणी करतात याकडे लक्ष लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस व काँग्रेसच्या गोटातील शांतता यावरील बरेचसे अवलंबून आहे. शिवाय ए वाय पाटील यांची रसद कोणाच्या पाठीमागे असणार हे देखील महत्त्वाचे आहे. निवडणूक लांबल्याने मतदारांना विसर पडल्याने राजकीय मशागत करावी लागेल. पक्षापेक्षा नेत्यांच्या अस्तित्वाला आव्हान असणार आहे.
पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात बदल झालेला नाही. यामुळे या निवडणुका स्थानिक आघाडी म्हणून असो वा महायुती म्हणून लढविल्या तरी जनसुराज्य शक्ती पक्षासमोर पूर्वीप्रमाणेच स्थिती भक्कम ठेवण्याचे आव्हान असेल. एकंदरीत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातच लढत होण्याची शक्यता आहे. पूर्वीपासूनच स्थानिक आघाडीच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकात इतर राजकीय पक्ष स्थानिक गटात समन्वय साधत निवडणुकीला सामोरे जायचे तरीही तालुक्यात जनसुराज्य पक्षाने प्राबल्य कायम ठेवले होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत फुट पडून दोन दोन गट तयार झाले असले तरीही या दोन्ही पक्षातील युतीत असलेल्या गटांचेच तालुक्यात प्राबल्य आहे. त्यामुळे जनसुराज्यची स्थिती भक्कम ठेवण्याची संधी मिळेल शक्यता आहे. त्यामुळे जनसुराज्यमध्येच उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार असले तरी आरक्षण सोडतीनंतरच चित्र स्पष्ट होईल आहे. शिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
शाहूवाडी तालुक्यात फेरबदल नसल्याने इच्छुकांत उत्साह आहे. गावांमधील फेरबदल झाला नसल्याने इच्छुकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बदललेले राजकीय संदर्भ आणि झालेल्या जुळवाजुळवीचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. सलग दोन निवडणुकीत मिळालेल्या आमदारकीच्या सत्तेतून आता जिल्हा परिषद व पंचायत समितीतही सत्ता घेण्यासाठी आमदार कोरे व कर्णसिंह गायकवाड आघाडीकडून व्युहरचना आखली जात आहे, तर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपलीच सत्ता कायम राहावी यासाठी पाटील-गायकवाड आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपने स्वतंत्र बैठका घेत उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. बदललेल्या राजकीय संदर्भानुसार गतवेळी विरोधात लढलेले काहीजण एकत्र आले आहेत, तर एकत्र लढलेले विरोधात गेलेले आहेत.
गगनबावडा तालुक्यात मतदारसंघाची फोडाफोड नसली तरी काटाजोड लढत पाहावी लागणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तिसंगी व असळज या दोन्ही गटात व पंचायत समितीच्या ४ पैकी तिसंगी, कोदे बुद्रुक व असळज या ३ गणात काँग्रेसच्या आमदार सतेज पाटील गटाने विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या निवडणुका होणार असून, प्रमुख पक्षाबरोबर गटातटाचे राजकारण ढवळून निघणार आहे. शिवाय विद्यमान आमदार शिवसेनेचे चंद्रदीप नरके असल्याने आणि राज्यात सत्ता असल्याने सत्तेचा वापर या ठिकाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.