Latur Politics: देशमुख काका-पुतण्यांची खेळी भाजपची डोकेदुखी वाढवणार?

Latur Lok Sabha Election 2024: लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजी काळगे यांना त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली आहे. गेली दोन टर्म काँग्रेसचे उमेदवार येथे पराभूत झाले आहेत. त्यामुळे डॉ. काळगे यांच्या विजयासाठी देशमुख काका -पुतण्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत.
Latur Lok Sabha Election 2024
Latur Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

लातूरचे आमदार, माजी मंत्री अमित देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा मागे सुरू होत्या. त्याचदरम्यानच काही दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील निवळी येथील विकास साखर कारखान्यावर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्या कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी तडाखेबाज तितकेच भावनिक भाषण करून बंधू, आमदार अमित देशमुख यांना पुढाकार घेण्याची साद घातली होती.

अमित देशमुख यांनी रितेश यांच्या हाकेला प्रतिसाद दिल्याचे त्यानंतरच्या घटनाक्रमांवरून दिसून येत आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातून (Latur Lok Sabha Election 2024) डॉ. शिवाजी काळगे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देऊन देशमुखांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तो दगड निशाण्यावर लागावा, यासाठी त्यांनाच मेहनत घ्यावी लागणार आहे.

लातूर हा तसा पाहिला तर काँग्रेसचा बालेकिल्ला. विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले. 2014 ला नरेंद्र मोदी यांची लाट होती. या दोन्ही कारणांमुळे गेल्या दोन टर्मपासून लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे जयवंत आवळे विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत डॉ. गायकवाड विजयी झाले. 2019 मध्ये भाजपने उमेदवार बदलला आणि सुधाकर श्रृंगारे यांना रिंगणात उतरवले. त्यांचाही विजय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दोन्ही निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवारांना पावणेचार लाखांच्या आतच मते मिळाली. भाजपच्या उमेदवारांना मात्र सहा लाखांच्यावर मते मिळाली. त्यापूर्वीच्या निवडणुकीत आवळे हे जेमतेम आठ हजार मतांनी विजयी झाले होते. मोदी लाट तर होतीच, मात्र मतदान करून घेण्यासाठी भाजपने मोठी यंत्रणा लावली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती, हे त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवरून दिसून येते. आता डॉ. काळगे आणि भाजपचे श्रृंगारे यांच्यात लढत होणार आहे.

याउलट एकेकाळी बालोकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. देशमुखांबाबत उलटसुलट चर्चा पसरू लागल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये अमित देशमुख कॅबिनेट मंत्री होते, मात्र लोकांना त्यांच्याशी संपर्क करण्यात अ़डचणी यायच्या, असे सांगितले जाऊ लागले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. वर्षानुवर्षे सत्तेत राहण्याची सवय असल्याने काँग्रेसचे दिग्गज नेते अस्वस्थ झाले. शिवाय तपासयंत्रणांचाही ससेमिरा अनेकांच्या मागे लागला होता. अशा अस्वस्थतेतूनच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. अमित देशमुख हेही भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली होती.

पुढाकार घेण्याची, सक्रिय होण्याची वेळ आली आहे, महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय, अशी साद रितेश देशमुख यांनी अमित देशमुख यांना घातली होती. त्यानंतर अमित देशमुख सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कदाचित हा योगायोगही असावा. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अमित देशमुख आणि त्यांचे काका दिलीप देशमुख यांच्या मागणीनुसार डॉ. काळगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता देशमुखांवर येऊन पडली आहे. डॉ. काळगे हे उच्चशिक्षित आहेत. कोणत्याही वादात त्यांचे नाव आलेले नाही. असे असले तरी त्यांच्या विजयासाठी देशमुख काका, पुतण्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. लातूर जिल्हा भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नाही. अंतर्गत गटबाजी आहे. ही बाबही काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी आहे. डॉ. काळगे विजयी झाले तर अमित देशमुख यांना त्याचा विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

Latur Lok Sabha Election 2024
BJP News: मोदींसह हे चाळीस नेते लोकसभा प्रचाराचा उडविणार महाराष्ट्रात धुरळा

डॉ. काळगे उमरग्याचे जावई, इकडेही फायदा होणार

मूळचे राणीअंकुलगा (ता. शिरूरअनंतपाळ, जि. लातूर) येथील रहिवासी असलेले डॉ. शिवाजी काळगे हे उमरगा (जि. धाराशिव) येथील दिवंगत नागय्या स्वामी यांचे जावई आहेत. काळगे यांच्या सासूबाई दोन वेळा उमरग्याच्या नगरसेविका होत्या. धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. यासह बसवराज पाटील यांच्या रूपाने काँग्रेसने लिंगायत समाजातही मोठे स्थान आणि मान असलेले नेतृत्व गमावले आहे. डॉ. शिवाजी काळगे हे जंगम आहेत. जंगम यांना लिंगायत समाजात गुरूंचे स्थान असते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॉ. काळगे यांना उमेदवारी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो दगड निशाणा साधाणार का, हे पाहण्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे,

बीजेपी लूझिंग लातूर... ट्विटरवर झाले ट्रेंड-

लातूरमधून काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी बीजेपी लूझिंग लातूर हे ट्विटरवर ट्रेन्ड झाले. अशा प्रकारच्या २८६९ पोस्ट ट्विटरवर पडल्या होत्या. काळगे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर ट्रेन्ड झाले. बहुतांश यूझर्सनी काळगे यांना पाठिंबा देत भाजपवर टीका केली होती. काही स्थानिक वाहिन्यांनी नागरिकांशी बोलून केलेले व्हिडिओही याअंतर्गत ट्विटरवरून प्रसारित झाले होते.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com