- दीपा कदम
भाजपला हरविण्याची क्षमता असणाऱ्यांच्या मागे मुस्लिम समाज उभा राहण्याची दाट शक्यता वाटते. यापूर्वी काय झाले त्यापेक्षाही मुस्लिम समाजाला त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते. मागील दहा वर्षांतील भाजपचा मुस्लिम समाजासोबतचा व्यवहार काय होता तो त्यांनी अनुभवलेला आहे. राज्यात अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ( Uddhav Thackray ) यांचा कुठेही आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा दिसलेला नव्हता. त्यामुळे मुस्लिमांना ठाकरेंच्या शिवसेनेविषयी जवळीक वाटू शकते. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्यानेही विश्वास बसू शकतो.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election ) वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Aghadi ) आणि ‘एमआयएम’ युतीने राज्यात भाजपविरोधी आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट पाडण्यात यश मिळवले होते. मात्र, मुंबईतील सर्व मतदारसंघांमध्ये या युतीचा फार प्रभाव दिसला नव्हता. छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकण्यापलीकडे या युतीचा स्कोअर राहिलेला नव्हता. मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जवळपास 20 ते 22 टक्के आहे. संपूर्ण मुस्लिम केंद्रित राजकारण करणाऱ्या ‘एमआयएम’ला मुंबईमध्ये फारसे मतदान झाले नव्हते. आता राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील तीन ते चार मतदारसंघांवर प्रभाव टाकणारा मुस्लिम मतदार यंदाच्या निवडणुकीत कुणाकडे जाणार? मुंबईतील मुस्लिम समाज पारंपरिकरित्या (1992 च्या दंगलीनंतर दोन निवडणुका वगळता) काँग्रेससोबतच राहिलेला दिसतो. 2019 मध्ये ‘महाविकास आघाडी’ तयार झाल्यानंतर राज्यात एक वेगळे समीकरण तयार झाले. पण, शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता असलेला आणि 30 वर्षे भाजपसोबत असलेला पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आल्याने मुस्लिम व्होट बँकेवर याचा परिणाम होईल का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘हो ,शिवसैनिकांनी बाबरी पाडली’ असं उद्धव ठाकरे ठणकावून सांगतात, तरीही त्यांच्या सभांना मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिती दिसते. काँग्रेससोबत असल्याचा हा परिणाम आहे की भाजपविरोधी प्रखर चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढे येत असल्याने परिघावरचा मुस्लिम समाज भगवा झेंडा हातात घेतोय, याची चाचपणी आवश्यक ठरते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबई शहरातील मुंबई (दक्षिण), मुंबई (दक्षिण-मध्य), आणि मुंबई (उत्तर-मध्य) या तीन मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. तर मुंबई (वायव्य), मुंबई (ईशान्य) आणि मुंबई (उत्तर) या मतदारसंघातही मुस्लिमांची संख्या उल्लेखनीय आहे. आघाडीत या तीनपैकी मुंबई (उत्तर-मध्य) मतदारसंघ वगळता इतर दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहेत. 2014 पासून भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेने हे दोन्ही मतदारसंघ सलग जिंकले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा प्रभाव असला तरी आता शिवसेना-भाजप युती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेला त्यांची ‘हिंदू व्होट बँक’ कायम ठेवून आघाडीतील मित्रपक्षांची मते आपल्याकडे कशी वळतील हे पाहणे आवश्यक ठरेल. ठाकरेंची शिवसेना ‘इंडिया’चा घटक पक्ष झाल्यामुळे याचा त्यांना लाभ होऊ शकतो.
राजकीय विश्लेषक नचिकेत कुलकर्णी याबाबत म्हणाले, '1992 च्या दंगलींनंतर मुंबईतील मुस्लिम व्होट बँक काही काळासाठी समाजवादी पक्षाकडे सरकली होती. कालांतराने ती पुन्हा काँग्रेसकडे आलेली आहे. ‘इंडिया’ आघाडीत उद्धव ठाकरे आल्याने काँग्रेसच्या मतांचा फायदा शिवसेनेला नक्कीच होईल. भाजपला हरवण्याची क्षमता असणाऱ्यांच्या मागे मुस्लिम समाज उभा राहण्याची दाट शक्यता वाटते. यापूर्वी काय झाले त्यापेक्षाही मुस्लिम समाजाला त्यांच्या पुढच्या भविष्याची चिंता वाटते. परिघावरच्या समाजाला कायम भक्कम सामाजिक आधार लागतो, जो मुस्लिम समाजाला काँग्रेससोबत वाटतो. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेसोबतही वाटू शकताे.’
मुंबईतील तीन मतदारसंघासाठी आघाडीला मुस्लिम मतांची बेगमी आवश्यक असली तरी ती शिवसेनेच्या उमेदवाराला पडतील का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नव्याने शाखांची बांधणी सुरू केली तेव्हा त्यांनी मुस्लिमबहुल मोहम्मद अली रोडवर मेमनवाडामध्ये शिवसेनेची शाखा सुरू केली. या शाखेचे प्रमुखे मुख्तार पोपेरे अभिमानाने सांगतात, ‘मी शिवसेनेचा पहिला मुस्लिम शाखाप्रमुख आहे. ठाकरे यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले त्याचा राग आम्हा शिवसैनिकांमध्ये आहे. मुस्लिम समाजात गद्दारीला स्थान नाही. त्यामुळेच शिवसेनेसोबत मुस्लिम समाज राहील.’
‘इंडिया’ आघाडीचा भाग झाल्याने महाराष्ट्रात शिवसेनेकडे मुस्लिम मते वळतील, अशी शक्यता काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. ते म्हणतात, ‘भाजप सत्तेवर येऊ नये अशी तीव्र भावना मुस्लिम समाजाची आहे. भाजपने त्यांच्याच लोकांना हाताशी धरून शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर उभे केलेले आव्हान वाखाणण्याजोगे आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपने मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका केली आहे.’
दरम्यान, काँग्रेसवरील टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेळोवेळी मुस्लिम लीगसोबत हातमिळवणी केली होती, अशी टीका केली होती. काँग्रेस व शिवसेना एकत्र आल्याने दोन्ही पक्षांना त्याचा निवडणुकांमध्ये फायदा होईल. माझ्या दृष्टीने मुस्लिम समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि निवाऱ्याच्या प्रश्नांकडे शिवसेना कसे पाहते, हे महत्त्वाचे आहे. मुंबईत शहरात राहणारा 80 टक्के मुस्लिम समाज हा झोपडपट्टीमध्ये राहतो. केवळ 20 टक्के मुस्लिम हा उच्चवर्गीय आहे, त्यांना मुस्लिम समाजाच्या प्रश्नांविषयी काहीही पडलेले नाही. 75 टक्के मुस्लिम विद्यार्थी दहावीच्या पुढे शिक्षण घेत नाहीत. काँग्रेसच्या राजवटीत मुस्लिमांच्या या समस्यांकडे गांभिर्याने पाहिले जात होते. त्यामुळेच महाविकास आघाडी शिवसेनेसह बळकट असण्याची आवश्यकता दलवाई यांनी व्यक्त केली.
मत मिळविणे कौशल्याचे काम
आधीची ‘हिंदू व्होट बँक’ सांभाळत मुस्लिमांचीही मते मिळवण्याचं काम हे ठाकरे यांच्यासाठी कौशल्याचे असणार आहे. गेल्या काही वर्षांत ठाकरे यांनी ‘शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’ असं स्पष्ट करत भाजपच्या हिंदुत्वाच्या विचारधारेपासून स्वत:ला अलगद बाजूला काढले आहे. ठाकरे यांच्या या भूमिकांमुळे मुस्लिम समाजाचा शिवसेनेबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होऊ शकते.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.