Dharashiv Lok Sabha 2024 News: प्रा. रवींद्र गायकवाड उमेदवारी दाखल करणार, हा शिंदे गटाचा उद्रेक तर नाही?

Political News : उस्मानाबादचे (धाराशिव) माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसून, जर उमेदवारी दाखल केली तर ती परत घेतली जाणार नाही, अशी विश्वसनीय माहिती आहे.
Ravindra Gaikwad
Ravindra GaikwadSarkarnama

Political News : लोकसभेच्या निवडणुकीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. याला ना महायुती अपवाद आहे ना महाविकास आघाडी. महायुतीतील काही जागा आणि उमेदवारांचा पेच अद्यापही कायम आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झाला, मात्र त्यानंतरही महायुतीसमोरील संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपचे (Bjp) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ऱाष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आणि त्यांना धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्या आता महायुतीकडून घड्याळ चिन्हावर लढत आहेत. अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत नाराज झाले होते. त्यांनी समर्थकांसह मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कदाचित त्यांची समजूत काढली असावी, कारण त्यानंतर धनंजय सावंत शांत असल्याचे दिसत आहेत. हे प्रकरण शमते न शमते तोच महायुतीसाठी पुन्हा एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. (Dharashiv Lok Sabha 2024 News)

Ravindra Gaikwad
Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये ठाणे, पालघर, नाशिक कुणाला ? सात जागांवरील तिढा काही सुटेना

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यापूर्वी या मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीबापू कांबळे, कल्पना नरहिरे, प्रा. रवींद्र गायकवाड हे खासदार राहिले आहेत. प्रा. गायकवाड यांनी 2009 आणि 2014 ची निवडणूक या मतदारसंघातून लढवली. 2009 मध्ये डॉ. पद्सिंह पाटील यांनी प्रा. गायकवाड यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत मात्र प्रा. गायकवाड यांनी डॉ. पाटील यांचा पराभव केला.

विद्यमान खासदार असतानाही शिवसेनेने प्रा. गायकवाड यांना डावलून 2019 मध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे प्रा. गायकवाड नाराज झाले. त्यानंतर ते राजकारणातून थोडेसे अलिप्त झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र काही महिन्यांनी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तत्पूर्वी, ते दोन वेळा उमरगा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

शिंदे गटात प्रवेश करताना प्रा. गायकवाड यांना धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असा शब्द देण्यात आला होता, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांची आहे. मात्र उस्मानाबाद मतदारसंघ शिंदे गटाला मिळाला नाही. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी जोर लावला होता. मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याच्या आधीपर्यंत प्रा. गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पक्षाच्या वरिष्ठांनी तशी कल्पना त्यांना दिली होती. मात्र, घडले वेगळेच. मुंबईत तळ ठोकलेले प्रा. गायकवाड त्यामुळे उमरग्याला परतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वीच उमरगा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले. प्रा. गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विचार सुरू आहे, मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. अर्ज दाखल केला तर मग मात्र तो परत घेणार नाही, अशी प्रा. गायकवाड यांची भूमिका असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली.

जागावाटपाची प्रक्रिया सुरू असताना मुख्यमत्री शिंदे एके दिवशी काही तास नॉटरिचेबल झाले होते. हिंगोली मतदारसंघातून शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती, मात्र भाजपच्या दबावामुळे पाटील यांची उमेदवारी त्यांना रद्द करावी लागली. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांचे तिकीटही भाजपच्या दबावामुळे शिंदे यांना कापावे लागले. गवळी या पाच वेळा त्या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

नाशिकचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीलाही भाजपकडून विरोध केला जात आहे. या सर्व प्रकारांमुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्याचा उद्रेक तर होणार नाही ना, अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे. लोकसभेला भाजपइतके जेरीस आणत असेल तर विधानसभेला आपली काय अवस्था होईल, अशी चिंता कदाचित शिंदे गटाला लागली असावी.

Ravindra Gaikwad
Aniket Deshmukh News: माढ्यात आघाडीच्या नेत्याचं वाढलं टेन्शन; डॉ. अनिकेत देशमुख अपक्ष लढणार

शिवसेना सोडणाऱ्या बहुतांश राजकीय नेत्यांचे राजकारण संपले आहे. काही जणांचे राजकारण नाही संपले तरी मतदारांनी संबंधित नेत्यांना किमान एकदा का होईन धडा शिकवलेला आहे. हा सर्व इतिहास असताना लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे होत असलेले हाल हे ठाकरे गटाच्या पथ्थ्यावर पडत आहेत. त्यामुळे उद्रेक होणार, हे निश्चित, मात्र तो कधी होणार याबाबत नेमके सांगता येणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आपण काहीही केले तरी शिंदे गट ते सर्व सहन करणार, असे भाजपला वाटले असेल. सुरुवातीला तसे दिसतही होते, मात्र आता परिस्थिती बदलत आहे का, शिंदे गट आता दबाव सहन करणार नाही का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. प्रा. गायकवाड यांनी अर्ज दाखल केला तर ते परत घेणार नाहीत, ही भूमिका उद्रेकाची सुरुवात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Ravindra Gaikwad
Dharashiv Loksabha Big Update : ...तर ओमराजे अन् अर्चना पाटलांचे उमेदवारी अर्ज बाद होणार!

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com