Raj Thackeray News : निकाली निघालेल्या मुद्यांचा प्रचारात पुन्हा खुबीने वापर

Brij Bhushan Singh News : बृजभूषण शरण सिंह यांच्यामुळे एका अर्थाने निकाली निघालेला परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारात आला आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

निवडणुकीच्या काळात लोकांच्या दैनंदिन गरजांसारखे महत्वाचे मुद्दे कोणत्याही सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे असतात. लोकांनी आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर बोलू नये, असे सर्व सत्ताधाऱ्यांना वाटत असते. त्यासाठी मग भावनिक मुद्दे, कालबाह्य झालेले मुद्दे प्रचारात आणले जातात. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतही असेच चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खूपच जिव्हाळ्याचा आहे. परप्रांतियांनी राज्यात येऊ नये, असे बंधन नाही किंवा कायदाही नाही. पोटापाण्यासाठी लोक घरदार सोडून हजारो किलोमीटर दूर जात असतात. ती मजबुरी असते, कुणी हौसेने घर सोडत नाही. असे सांगितले जाते की, मुंबईत सर्वांची स्वप्ने पूर्ण होतात. सर्वांना काम मिळते. त्यामुळे मुंबईत देशभरातून लोंढे येत असतात. ते कुणी रोखायचे, हे मनसेने सांगायला हवे, कारण ते लोंढे ज्या राज्यांतून येत आहेत, त्यापैकी बहुतांश राज्यांत भाजपची सत्ता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी या निवडणुकीत मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. केंद्रात भाजपचे ( Bjp ) सरकार आहे, राज्यातही महायुतीचे सरकार आहे. असे असताना राज ठाकरे हे मुद्दे प्रचारात आणून लोकांची दिशाभूल करत आहेत.

परराज्यांतील लोंढ्यांमुळे सार्वजनिक सेवांवर परिणाम होतो, हे खरे आहे. मात्र, सुविधा पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते. परप्रांतियांचे लोंढे थांबणार नाहीत, हे वास्तव आहे. परप्रांतीय येथे येऊन काम करतात. आपल्या कुटुंबांना आधार देतात. आपल्याला काही प्रमाणात अडचण होत असली तरी तो नाकारण्याचा अधिकार नाही. त्यांच्या राज्यांत विकास झाला असता तर परप्रांतियांना महाराष्ट्रात यायची गरज भासली नसती, असेही राज ठाकरेंचे म्हणणे असते. पण, आता करायचे काय? परप्रांतियांना रोखायचे कसे, तसा एखादा कायदाही नाही. मग राज ठाकरे यांनी हा मुद्दा प्रचारात का आणला असेल? खरेतर या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लागलेला आहे, त्यामुळे राज ठाकरे यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. समोरून आव्हाने मिळत असताना त्यांना शांत बसावे लागले आहे.

बृजभूषण शरण सिंह... हे नाव आठवते का? कुस्ती महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपचे उत्तर प्रदेशातील बाहुबली खासदार. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप त्यांच्यावर झाले होते. न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. याच बृजभूषण शरण सिंह यांनी परप्रांतियांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना जेरीस आणले होते. राज ठाकरे श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार होते. उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना पाय ठेवू देणार नाही, असे बृजभूषण यांनी वारंवार ठणकावून सांगितले होते. राज ठाकरे यांनी त्यांना एकदाही उत्तर दिले नव्हते. खरेतर त्याचवेळी राज ठाकरे यांचा परप्रांतियांचा मुद्दा निकाली निघाला होता, मात्र आता ते पुन्हा त्याची उजळणी करत आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray News : भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंकडून बुद्धीभेद

महागाई, बेरोजगारीसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरून भावनिक मुद्दे प्रचारात आणले जातात. त्याचाच एक भाग म्हणून परप्रांतियांचा मुद्दा प्रचारात आणण्यात आला आहे. भाजप थेटपणे हा मुद्दा मांडू शकत नाही. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे भाजपची याबाबतीत मोठी सोय झाली आहे. परप्रांतियांच्या मुद्द्यामुळे महागाई, बेरोजगारी असे मुद्दे बाजूला पडतील, असे महायुतीला वाटत असावे. प्रचारसभांच्या व्यासपीठांवरून परप्रांतियांविरुद्ध गर्जना करणारे राज ठाकरे बृजभूषण शरण सिंह आव्हाने देत होते, त्यावेळी शांत का बसले होते, असा प्रश्न आता लोकांना पडत असेल का? नेते कधी गंभीर होणार आहेत की नाही? की असेच प्रकार सुरू राहणार आहेत, असा प्रश्नही समाजाला पडत नाही, असे काही नेत्यांना वाटत असते. त्यात राज ठाकरेही असावेत. ध्रुवीकरण आता भूमिपुत्र आणि परप्रांति यांच्यावर येऊन थांबले आहे. काही दिवसांनी ते आणखी कशावरही येऊ शकते, म्हणजे अगदी तुमच्या पोशाखावर, तुमच्या आहारावरही...! त्यामुळे समाजाने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Raj Thackeray
Lok Sabha Election 2024: कुणीही आले तर काय... या भावनेतून तर मतदानाचा टक्का घसरत नाही ना?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com