पक्ष, निष्ठा बदलण्याचे पीक किती मोठ्या प्रमाणात फोफावले आहे, हे राज्याने गेल्या पाच वर्षांत पाहिले आहे. आज एका पक्षात असलेला नेता काही दिवसांनी त्या पक्षात राहील की नाही, असे चित्र सातत्याने दिसले. लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) निकाल लागला की पुन्हा पक्ष, निष्ठा बदलण्याचे पीक फोफावू शकते. नेते फक्त स्वतःची सोय पाहतात, हे लोकांना कळून चुकले आहे. पक्ष, निष्ठा, विचार बदलण्यावरून राज्यात पुन्हा एक वाद सुरू झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांच्यात हा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे अनेक शिलेदार त्यांच्यापासून दूर झाले. उद्धव ठाकरे एकटे पडले होते. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आधी त्या चळवळीत कार्यरत होत्या. त्या पट्टीच्या वक्त्या आहेत. त्यांचा अभ्यास दांडगा आहे, वाचनही मोठे आहे. उद्धव ठाकरे एकटे पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज्यभर सभा घेतल्या आणि त्या गाजवल्याही. त्या सभांमधून त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना लक्ष्य केले. त्यामुळे वातावरण तापले होते. वातावरण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होण्यासाठी त्यांच्या सभांचा फायदा झाला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविद्यालयात एकदा वादविवाद स्पर्धेत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. त्याबाबत नुकताच त्यांनी खुलासाही केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनीही आता सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात, की माझे वडील चोरले आणि वडिलांबद्दल नको ते बोलणाऱ्या अंधारे यांना त्यांनी पक्षाचे प्रवक्तेपद, उपनेतेपद कसे दिले,' असा प्रश्न राज ठाकरे यांनी महायुतीसाठी आयोजित एका प्रचारसभेत उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केलेल्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे कसे बसले, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांचे हे प्रश्न समोर मोठ्या संख्येने उपस्थित लोकांच्या टाळ्या मिळवून गेले.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही. बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे ते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. त्यात परप्रांतीय, मुस्लिमांवर निशाणा साधत आहेत. 2019 च्या निवडणुकीतही राज ठाकरे यांचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यावेळी 'लाव रे तो व्हिडीओ' हा त्यांचा प्रयोग अत्यंत गाजला होता. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने राज्यातील 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या, हे विशेष. म्हणजे राज ठाकरे यांच्या सभांचा काहीएक परिणाम झाला नव्हता, असे म्हणता येईल.
गेल्या पाच वर्षांत राज ठाकरे यांचे मत 90 अंशांत बदलले. त्यांनी स्पष्ट 'यू टर्न' घेतला. त्यावेळी मोदी, शाह हे त्यांना देशावरील संकट वाटत होते. आता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. 'ईडी'च्या एका नोटिशीमुळे राज ठाकरे यांच्यात मोठे परिवर्तन झाले, अशी टीका विरोधक करत असतात. पाच वर्षांच्या आत राज ठाकरे यांचे मत बदलू शकते, मग गेल्या अनेक वर्षांत सुषमा अंधारे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे मतही बदलू शकते, याचा विचार राज ठाकरे यांनी केलेला दिसत नाही. एकेकाळी राज्याच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' मांडणारे राज ठाकरे पाच वर्षांपूर्वी मोदींच्या विरोधात बोलत होते आणि या निवडणुकीत मोदींचे समर्थन करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. सुषमा अंधारे यांनी 27 वर्षांपूर्वी वादविवाद स्पर्धेत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ते विधान केले होते. वादविवाद स्पर्धेत एक बाजू निवडली की ती रेटून न्यावी लागते. राज ठाकरे यांना वाटते की अंधारे यांनी तसे बोलायला नको होते, मात्र त्यांना चूक उमगली असेल तर?
बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. मध्यंतरीच्या काळात मनसेला बऱ्यापैकी यश मिळाले, मात्र नंतर यश मिळाले नाही. राज्यातील दिग्गज नेत्यांनी याबाबत त्यांना टोमणे मारले, त्यांच्यावर कडवट टीका केली. त्यांच्या लवकर न उठण्यावरूनही टीका झाली होती. आता महायुतीत असलेल्या काही नेत्यांनी तर जिव्हारी लागेल अशी टीका त्यांच्यावर केली होती. तरीही राज ठाकरे आता आपले उमेदवार नसताना त्यांच्या उमेदवारांसाठी सभा घेतच आहेत की. मग सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याला राज ठाकरे यांचा आक्षेप का असावा? छगन भुजबळ यांच्याबाबतही राज ठाकरे यांनी लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला आहे.
छगन भुजबळ यांनी मंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच भुजबळांसबोत उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात कसे बसले, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे ज्या महायुतीसाठी सभा घेताहेत, त्या महायुतीचा छगन भुजबळ हे महत्वाचा भाग आहेत, हे ते विसरून जातात. बाळासाहेबांच्या अटकेच्या प्रयत्नानंतर छगन भुजबळ यांनी 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी तो विषय संपला होता. तरीही राज ठाकरे लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरे 2019 मध्ये जेव्हा मोदींवर टीका करत होते, त्यावेळी राज्यातील भाजप नेत्यांनी 'ठेवणी'तले शब्द वापरून त्यांची खिल्ली उडवली होती. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही, अशी टीका केली होती. ते व्हिडीओ लावण्याचे संकेत सुषमा अंधारे यांनी दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.