Congress Vs Bjp : लोकसभेच्या निकालावर सांगलीत काँग्रेस-भाजप भवितव्याचा फैसला, आगामी निवडणुकीची गणितं बदलणार

Sangli Lok Sabha Constituency : सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, 2014 च्या मोदी लाटेमध्ये भाजपने हा बालेकिल्ला हस्तगत करून काँग्रेसला धक्का दिला आहे.
vishal patil sanjaykaka patil chandrahar patil
vishal patil sanjaykaka patil chandrahar patilsarkarnama

Sangli News, 1 June : यंदाची लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) राजकीय पक्षांसाठी चांगलीच प्रतिष्ठेची ठरली. महाविकास आघाडीने वसंतदादा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक विशाल पाटील ( Vishal Patil ) यांच्या अस्तित्वाची राहिली.

बंडाचा झेंडा हाती घेत विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 'वार फिरलंय'चा नारा देत सहानुभुती मिळवली. त्याचे रुपांतर यशात होईल, अशी गणितं मांडली जात आहेत. याशिवाय जिल्ह्यात महाविकास आघाडीला घरघर लागल्याचे स्पष्ट झाले.

दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) यांनी भाजपचा ( bjp ) बालेकिल्ला पुन्हा शाबूत ठेवण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. एकंदरीत लोकसभेच्या निकालावर काँग्रेस आणि भाजपच्या आगामी निवडणुकीच्या भवितव्याचा फैसला होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

निवडणूक अत्यंत चुरशीची

सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, 2014 च्या मोदी लाटेमध्ये भाजपने ( bjp ) हा बालेकिल्ला हस्तगत करून काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यानंतर पुन्हा 2019 च्या निवडणुकीत भाजपने या ठिकाणी विजय मिळवला. यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे.

विश्वासात न घेता चंद्रहार पाटलांना उमेदवारी

महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना (उबाठा) या घटक पक्षाने कोल्हापुरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली. यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कदमांनी सांगलीच्या जागेसाठी प्रयत्न केले, पण...

विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यानुसार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष म्हणून सहभागी होती. त्यांनी सांगलीची जागा घेतली, ऐनवेळी विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रामायण घडले. काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा विशाल पाटील यांना मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, यश आले नाही.

vishal patil sanjaykaka patil chandrahar patil
Vijaykumar Deshmukh : देवेंद्र फडणवीसांना दिलेला मताधिक्क्याचा शब्द विजयकुमार देशमुख खरा करून दाखवणार?

काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची निवडणूक

यंदाच्या निवडणुकीत हाच प्रयोग झाला आणि शिवसेना (उबाठा) गटाला जागा गेली. त्यामुळे ही निवडणूक आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. यावेळी तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव झाला, तर काँग्रेस या मतदारसंघातून हद्दपार होईल. शिवाय दादा घराण्याला देखील मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची राहिली. दहा वर्षे काँग्रेस लोकसभेच्या आखाड्यातून बाहेर गेली तर भविष्यात पक्ष वाढविणे अडचणीचे ठरण्याची भीती होती. त्यामुळे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांचीही विशाल यांनाच मदत झाली.

संजयकाकांना तिसऱ्यांदा उमेदवारी

दुसरीकडे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 2014 च्या मोदी लाटेत खासदार संजयकाका पाटील विजयी झाले होते. त्यांना पुन्हा 2019 ची उमेदवारी देण्यात आली. पुन्हा संजयकाका पाटील दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. 2024 च्या निवडणुकीत खासदारांना तिसर्‍यांदा उमेदवारी मिळाली आहे. भाजप पक्षाने दुसर्‍या यादीतच खा. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या प्रतिष्ठेची राहिली.

खासदारांनी अजितराव घोरपडेंनी साथ सोडली

भाजपमध्येही सर्वकाही ठिकठाक नव्हते. भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष दिसून आला. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी उमेदवारी मागितली होती. याशिवाय खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपमधील काही नेते व पदाधिकार्‍यांची होती. मात्र वरिष्ठांनी ऐकले नाही, त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदारांवर आरोप करीत त्यांच्याविरोधात प्रचार केला. गतवेळी सोबत असलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही साथ सोडली. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विरोधात काम केल्याची ऑडिओ क्लिप गाजली. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनापासून काम केले.

भाजपची ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न

काँग्रेस आणि भाजपसाठी लोकसभेचा निकाल महत्वाचा ठरणार आहे. काँग्रेसला यश आले आगामी विधानसभा निवडणुकीत बळ मिळणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणूक जोरदार लढवली जाईल, यात कोणतीही शंका नाही. जर भाजपच्या बाजुने निकाल जिल्ह्यात वाढलेली भाजपची ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. परंतु, अपयश आले तर भविष्यातील निवडणुकीमध्ये भाजपला प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल, असे चित्र आहे.

काँग्रेसचा आघाडीला विरोध

महाविकास आघाडीत काँग्रेसची ताकद असतानाही उमेदवारी नाकारण्यात आली. जिल्ह्यात सेनेची ताकद नसताना तिकीट घेवून काँग्रेसची कोंडी केली. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिली, मात्र काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम'च झाला. त्यामुळे भविष्यात काँग्रेसकडून आघाडीला विरोध राहणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारीही करण्यात येत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

vishal patil sanjaykaka patil chandrahar patil
Solapur Politics : सातपुतेंना सोलापूर शहर उत्तरमधून किती लीड मिळणार?; देशमुखांच्या आकड्याने भाजप नेत्यांची धाकधूक वाढणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com