Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे शिर्डीचे गणित 'सबुरी'ने अन् खुबीने सोडवणार?

Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत यंदा उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्नांची भली मोठी मालिका उभी ठाकली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagar News : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीची जागा प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी ते दोन दिवस शिर्डी दौऱ्यावर येऊन गेले. शिवसेनेतील बंडानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत यंदा ठाकरे यांच्यासमोर प्रश्नांची भली मोठी मालिका उभी ठाकली आहे. त्यांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संपूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहून 'श्रद्धा' दाखवली, पण ठाकरेंनी उमेदवार जाहीर न करता 'सबुरी' दाखवून उमेदवार कोण, याबाबत सर्व काही गुलदस्तातच ठेवणे पसंद केले आहे. (Lok Sabha Election 2024)

शिर्डी (Shirdi) मतदारसंघाबाबत काँग्रेसचा (Congress) आग्रह असून, त्यांच्याकडे डझनभर इच्छुक आहेत. ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत मोठी फिल्डिंग लावल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन तेथील उमेदवार निवडून आणण्याची शर्थ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना करावी लागणार आहे. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे हे या मतदारसंघातील 'किंगमेकर' आहेत. विखे हे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी निर्णायक 'अॅक्शन मोड'मध्ये येतात आणि निवडणुकीची गणिते हातात घेतात. त्यामुळे येथे उद्धव ठाकरे यांना निवडून येणाराच उमेदवार रिंगणात उतरावा लागणार आहे.

Uddhav Thackeray
Ajit Gopchade : रमेश कराडांसाठी आमदारकी सोडणाऱ्या गोपछडेंना मिळाले खासदारकीचे बक्षीस

शिर्डी लोकसभेचा मतदारसंघ गेली तीन टर्म हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला राहिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी (राहाता), कोपरगाव, नेवासा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात एकही शिवसेनेचा आमदार नाही. आमदार शंकरराव गडाख हे त्यांच्या शेतकरी कामगार पक्षावर निवडून आले आणि पुढे ते शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत जेवढा आव्हानात्मक ठरणारा आहेत, तेवढाच तो शिवसेना एकनाथ शिंदे गटालादेखील.

शिवसेनेतील बंडानंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे गेलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला या मतदारसंघात शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. यासाठी ठाकरेंनी मतदारसंघातील दोन दिवसांच्या दौऱ्यात सात ठिकाणी संवाद सभा घेतल्या. या सभेला प्रतिसाद चांगला मिळाला असला, तरी तो टिकवून ठेवण्याची आणि मतदानामध्ये रूपांतर होईपर्यंत त्यात सातत्य ठेवावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिर्डीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यातील एक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आहेत. उमेदवारी डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे, परंतु त्यांच्या पक्ष बदलण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्यावर शिवसैनिक विश्वास ठेवायला तयार नाहीत. ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाऊसाहेब त्यांच्याबरोबर होते, परंतु ठाकरेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे ठाकरेंच्या मनात शिर्डीबाबत काय चालले आहे, याचा अजून कोणालाच अंदाज येईना. यातच महाविकास आघाडीत काँग्रेसने शिर्डीवर दावा केला आहे. या जागेवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. त्यामुळे शिर्डीची जागा नेमकी कोणाला सुटणार इथंपासून दोन्हीकडच्या इच्छुक उमेदवारांसमोर प्रश्नच आहेत.

शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या संगतीला गेले आणि मु्ख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय गणिते बदलली आहेत. भाजपचे नेते इशारा करतील, त्याचपद्धतीने त्यांना शिर्डी लोकसभेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेलेत. मोदी लाटेत स्वार होऊन ते दोन वेळा निवडून आले आहेत. ही त्यांची दुसरी टर्म आहे. हॅट्ट्रिकसाठी ते इच्छुक आहेत. शिवसेना फुटीनंतर ते मतदासंघात एकटेच फिरत आहेत. यातच ते मिळत नसल्याचेदेखील चर्चा होत होती. शिर्डी मतदारसंघासाठी भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि काँग्रेस इच्छुक असल्याने आणि यात दोन मित्रपक्ष असल्याने खासदार लोखंडे यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गट हा या जागेसाठी अलर्ट झाले आहेत. हे ओळखून खासदार लोखंडे हे मतदारसंघात वेगाने कामाला लागल्याचे दिसते.

उद्धव ठाकरे या दोन दिवसांच्या दौऱ्यात शिर्डी मतदारसंघाशी निगडित असलेली उघड आणि गुपित गणितं बरोबर घेऊन आता मागे फिरलेत. या सर्व गणितांवर ते काय उत्तर शोधतात, याकडे आता शिर्डीतील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. तसेच विरोधकदेखील त्यानुसार पुढचे गणित मांडताना दिसतील, हे मात्र नक्की. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी (राहाता), कोपरगाव, नेवासा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात, परंतु शिवसेना फुटीनंतर या मतदारसंघात मतांचे विभाजन होणार हे स्पष्ट आहे. या विभाजनात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पारडे आज तरी जड दिसते.

Uddhav Thackeray
Rajya Sabha Election 2024: मोदी- शाह यांचं महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र; चर्चेतल्या नावांना कात्री तर 'सरप्राईज'...

अकोल्यात अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे आहे. तिथे त्यांचे विरोधक भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आहेत. संगमनेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, तो ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या ताब्यात आहे. श्रीरामपूरमध्ये लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसमध्ये अनेक विरोधक सक्रिय आहेत. त्यांची भूमिका निर्णायक ठरणारी राहते. शिर्डीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे असून, ते राज्याचे महसूलमंत्री आहेत. विखे म्हणजे, जिल्ह्याच्या राजकारणासह राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते. कोणत्याही निवडणुकीवर प्रभाव पाडेल, अशी त्यांची यंत्रणा आहे. त्यांचा फायदा थेट शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला होईल.

कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे विरोधक भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आहेत. हे दोघेही शिवसेना शिंदे गटाचेच काम करतील. पुढे नेवाशात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे शिवसेनेत आहेत. ते शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सक्रिय आहेत. विधानसभेचे हे गणित पाहिल्यावर शिर्डी लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल, अशी स्थिती असून, ती तेवढीच सर्वच नेत्यांसाठी आव्हानात्मकदेखील होईल. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये येथे लढत होणार असल्याचे चित्र असल्याने उमेदवारांनीदेखील मतदारसंघातील संपर्कावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

घोलप, औताडेंनी ठाकरेंची साथ सोडली

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप हे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटासमवेत होते. ते शिर्डीत सक्रिय होते. परंतु माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. वाकचौरे यांचा हा प्रवेश उमेदवारीसाठी आहे. वाकचौरे हे ठाकरेंबरोबर शिर्डी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. हे पाहून बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबरोबर बबनराव घोलप हे सक्रिय झाले आहेत.

घोलप यांचे लोखंडे यांच्याबरोबर सक्रिय होणे हे ठाकरे गटाची शिर्डीत डोकेदुखी वाढवणारे ठरू शकते. तसेच कोपरगावमधील ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांनी राजीनामा देत शिवसेना एकनाथ शिंदे गटात खासदार लोखंडे यांच्या उपस्थित प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेतून ठाणे येथील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी पक्ष प्रवेश केला. घोलप आणि औताडे यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. या दोघांचा शिंदे गटात प्रवेश म्हणजे ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

R

Uddhav Thackeray
Ashok Chavan Join Bjp : मराठवाड्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन, म्हणून अशोक चव्हाण झाले खासदार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com