- संजय परब
मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण आहे. विशेषतः मराठवाड्यात भाजपची एकही जागा येण्याची शक्यता नव्हती. भाजपकडून याचा सर्व्हे सुद्धा झाला होता. यामुळे खडबडून जागे झालेल्या भाजप पक्षश्रेष्ठींनी मिशन लोकसभेचे अस्त्र तातडीने बाहेर काढले. आधी ठरल्याप्रमाणे लोकसभेच्या अगदी तोंडावर येणाऱ्या काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना तातडीने भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. तसेच, 24 तासांच्या आत राज्यसभेची उमेदवारी देत त्यांचे खासदारपद निश्चित केले. आतापर्यंत भारतीय राजकारणाच्या इतिहासात इतक्या जलदगतीने दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला प्रवेश देत कोणी खासदार केले नव्हते.
जरांगेंच्या तीव्र आंदोलनामुळे गेले काही महिने भाजपच्या ( Bjp ) विरोधात मराठा समाज एकवटला आहे. मराठा आरक्षणाला भाजपमुळे विलंब होत आहे, अशी तीव्र भावना मराठा समाजात निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे. मुख्य म्हणजे मराठवाड्यात तर सर्व जागांवर भाजप उमेदवार निवडून येतील की नाही, अशी शंका होती. भाजपच्या सर्व्हेत तसे स्पष्ट दिसत होते. त्यातच जरांगेंच्या उपोषणामुळे तर आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची प्रकृती खूप खालावल्यामुळे तर मराठा समाज संतप्त झाला होता. यादरम्यान म्हणजे गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रमुख नेते आणि गृहमंत्री अमित शहा अकोला, जळगावनंतर मराठवाड्यात येणार असल्याने तणावचे वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांचा तसा अहवाल सुद्धा आला होता. शेवटी वातावरण अधिक बिघडू नये म्हणून शहा यांना हा दौरा सुद्धा रद्द करावा लागला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जरांगेंच्या आक्रमणाला तोंड द्यायचे असल्यास तेवढ्याच ताकदीचा मराठा नेता भाजपला हवा होता. अशोक चव्हाणांना ( Ashok Chavan ) लोकसभेच्या तोंडावर पक्षात घेत जरांगेंशी मुकाबला करण्याची तयारी भाजपने केली होती. पण, आताच इतके वातावरण बिघडले होते की पुढचा सर्व निवडणुकीचा खेळच बिघडला असता. महाराष्ट्रात भाजपने मिशन लोकसभा अंतर्गत 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याला मराठवाड्यात सुरुंग लागणार होता. मात्र, भडका उडण्याच्या आधी चव्हाणांसारखा मोहरा हाती घेत भाजपने लोकसभेसाठी पुढचे सावध पाऊल टाकले.
खरंतर चव्हाण हे दोन एक दिवसांपूर्वी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर होते. त्यांच्या बद्दल काँग्रेसला शंका होती. पण, ते लगेच दुसऱ्या दिवशी नॉट रिचेबल होऊन नंतर काही तासांत भाजप प्रवेश करतील, अशी अजिबात शंका नव्हती. दिल्लीवरून सूत्रे फिरली आणि तातडीने त्यांना प्रवेश देत त्यांचे खासदारपद सुद्धा निश्चित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.