Manoj Jarange Patil : जरांगे 'फॅक्टर' लोकसभेला चालला, विधानसभेला काय जादू करणार?

Assembly Election 2024 : मराठा आंदोलनामुळे मराठा खासदार रेकॉर्डब्रेकने वाढले, त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होणार? का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkaranama

नुकताच लोकसभेचा निकाल आला. केंद्रात 'एनडीए'चे जास्त खासदार निवडून आले. पण, महाराष्ट्रात त्यांची म्हणजे महायुतीची मोठी पिछेहाट झाली. 41 खासदारांवरून ते 17 पर्यंत खाली आले आहेत.

आता त्यासाठी ते विविध कारणे देत आहेत. त्यात मराठा आरक्षण एक असल्याचे भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सांगितले आहे. महायुतीतील मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही याच कारणामुळे राज्यात महायुतीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे.

एकूणच मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) आंदोलनाचा लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसल्याची कबुली त्यांच्याच नेत्यांनी दिली आहे. मात्र, आघाडीकडून तशी ती जाहीरपणे अद्याप देण्यात आलेली नाही. पण, हेच एक महत्वाचे कारण आघाडीला राज्यात आघाडी मिळण्यास कारणीभूत ठरल्याचे आकडेवारी सांगत आहे. महायुतीच्या दिग्गज नेत्यांचा आघाडीच्या 'जायंट किलर' उमेदवारांनी पराभव केला आहे. त्यात केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ठळक उदाहरण देता येईल.

मराठा आंदोलनामुळेच महाराष्ट्रात यावेळी प्रथमच विक्रमी संख्येने म्हणजे 26 मराठा खासदार निवडून आले आहेत. 48 मध्ये हे प्रमाण साठ टक्के आहे. दुसरीकडे या समाजाची लोकसंख्या त्यापेक्षा निम्मीही नाही. गेल्यावेळी राज्यात 21 मराठा खासदार होते. म्हणजे त्यांचे प्रमाण 43 टक्के होते. तर, त्याअगोदर 2014 मध्ये ते वीस होते. म्हणजे दर पाच वर्षांनी मराठा खासदारांची संख्या वाढत चालली आहे. गेल्यावेळी ती फक्त एकने वाढली होती. यावेळी त्यात पाचने भर पडली आहे.

Manoj Jarange Patil
Loksabha Election 2024 Result: भाजप, ना शिवसेना; महाराष्ट्रात काँग्रेसच ठरला मोठा भाऊ!

लोकसभेत प्रथमच एवढ्या मोठ्या विक्रमी संख्येने गेलेले मराठा खासदार हे निश्चितच मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे यश म्हणावे लागेल. कारण, त्यामुळेच फितूरी आणि दुहीचा शाप असलेला मराठा समाज कधी नव्हे, तो लोकसभेला एकवटल्याचे दिसला. तो तसाच राहिला, तर महाराष्ट्राच्या विधानसभेतही मराठा समाजाचे आमदार विक्रमी संख्येने निवडून जाण्याची शक्यता आहे.

जरांगेंनी लोकसभेला नाव न घेता पाडायचे त्याला पाडा, असा नेमका संदेश दिला होता. त्यातून मराठा आंदोलनाविषयी ठोस भूमिका न घेणाऱ्या महायुतीला त्यातही भाजपला फटका बसला. तसेच यामुळेच प्रथमच सर्वाधिक नवखे खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले. त्यांनी अनेकांचा लोकसभेचा सातबारा कोरा केला. त्यांची सद्दी तूर्त संपवली.

मराठवाड्यात जरांगे 'फॅक्टर' सर्वाधिक चालला. कारण, त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू तेथेच होता. म्हणून तेथे त्यांचा पूर्ण प्रभाव दिसला. त्यातूनच तेथे आठपैकी आठ खासदार मराठा झाले. महायुतीला मोठा फटका तेथेच बसला. फक्त छत्रपती संभाजीनगरची (ती ही शिवसेनेची) जागा वगळता बाकी सात जागांवर महायुतीचा दणदणीत पराभव झाला.

आंतरवली-सराटी हे मराठा आरक्षणाचे केंद्र जालना जिल्ह्यात आहे. तेथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. मराठा असूनही तेथे त्यांचा 1 लाख 32 हजार 524 मतांनी दणदणीत पराभव झाला. आघाडीचे (काँग्रेस) कल्याण काळे हे मराठाच तेथून निवडून आले. मराठवाड्यासह विदर्भ, मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही जरांगे फॅक्टर काही प्रमाणात चालला.

लोकसभेतील यशामुळे हुरूप वाढलेल्या जरांगेंनी आता चार महिन्यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेला नाव घेऊन मराठा आरक्षण विरोधकांना पाडणार असल्याची डरकाळी फोडली आहे. दरम्यान, या मुद्याचा मोठा फटका बसलेली महायुती बॅकफूटवर गेली आहे. ते यावर निश्चीत काही ठोस उपाय करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण हा केंद्राकडून रामबाण सुटणार प्रश्न असला, तरी तो राज्याशी निगडीत आहे.

Manoj Jarange Patil
BJP Politics: राणे बंधूंचे तोंड पुन्हा सुटलंय...भाजपचे नेतृत्व आतातरी आवर घालणार का?

परिणामी विधानसभेला तो लोकसभेपेक्षा अधिक प्रभावी प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. त्यावरून वातावरण लोकसभेपेक्षा जास्त फिरणार आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. कारण, लोकसभेला ओसरलेली मोदी लाट विधानसभेला त्यांना उपयोगी पडणार नाही. उलट पक्ष फोडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंविषयी लोकसभेला दिसलेली सहानुभूतीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यावर ते आणि त्यातही फडणवीस काय उतारा काढतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com