Loksabha Election 2024 Result: भाजप, ना शिवसेना; महाराष्ट्रात काँग्रेसच ठरला मोठा भाऊ!

Congress Political News : राज्यात लोकसभेच्या 17 जागा लढवून काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवले आहे.
Nana Patole on Mahavikas Aghadi
Nana Patole on Mahavikas AghadiSarkarnama

Congress News : अनेक मातब्बर नेत्यांनी पाठ दाखवून केलेल्या पक्षांतरामुळे पक्षसंघटनेत मोठी मरगळ आली होती. नेत्यांच्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांनी विश्वास गमावला होता. काही जिल्ह्यांत तर काँग्रेसला नेतृत्वच उरले नव्हते. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवून राज्यात क्रमांक एकवर जाण्याची किमया एखादा पक्ष साधू शकतो, यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण हे घडले आहे... काँग्रेसने हे करून दाखवले आहे!

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याला महाराष्ट्रातील 17 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 13 उमेदवार विजयी झाले आहेत. उठता बसता काँग्रेसची बदनामी करणाऱ्या महायुतीतील पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एक उमेदवार विजयी झाला होता. या निवडणुकीत हा आकडा एकवरून 13 वर गेला आहे. काँग्रेसपाठोपाठ भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येकी दहा जागा मिळत आहेत. गेल्या पाच वर्षांत झालेल्या पडझडीनंतरही काँग्रेसने मिळवलेले हे यश नेत्रदीपक असेच आहे.

2014 ला केंद्रातील सत्ता गेली आणि काँग्रेसला गळती लागली. देशभरातील काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व नेत्यांनी जाताना नेतृत्वावर तोंडसुखही घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. 2014 आणि त्यानंतरच्या निवडणुकीतही काँग्रेसची दाणादाण उडाली. त्यामुळे पक्षसंघटनेला उभारी घेता आली नाही.

महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची जणू रांगच लागली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी वाढू लागल्या. नाना पटोले (Nana Patole) यांच्याविषयी नाराजी असल्यामुळेच नेते पक्ष सोडून जात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पक्षश्रेष्ठींकडे तशा तक्रारीही करण्यात आल्या.

विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हेही काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते लवकरच बाहेर पडणार, असे ते सांगू लागले. काही प्रमाणात झालेही तसेच. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी राज्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनीही पक्ष सोडला.

त्याच्या आधीच्या पंचवार्षिकमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेससाठी ही अवस्था दयनीय होती. अशोक चव्हाण दोनवेळा मुख्यमंत्री राहिले होते, खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही राहिले होते. बसवराज पाटील राज्यमंत्री होते, प्रदेश कार्याध्यक्ष होते. काँग्रेसने या सर्वांना भरभरून दिले होते.

Nana Patole on Mahavikas Aghadi
Ravindra Waikar Win : मुंबईत मोठा ट्विस्ट! रवींद्र वायकारांचं नशीब फळफळलं

दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेस(Congress) पक्ष संपला, अशा आविर्भावात असलेल्या भाजपला निकाल समोर आल्यानंतर धक्का बसला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. तेही आता काँग्रेससोबत राहण्याची शक्यता आहे. तसे झाले काँग्रेसचे 14 खासदार होतील.

काँग्रेसला या यशात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह लातूरचे अमित देशमुख, कोल्हापूरचे सतेज पाटील आणि सांगलीचे विश्वजित कदम यांची तगडी साथ मिळाली. काँग्रेसची पाळेमुळे समाजात खोलवर रुजली आहेत, फक्त नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचायला हवे, असा संदेश या निकालाने दिला आहे.

या निवडणुकीचे आणखी एक विशेष बाब म्हणजे अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. काँग्रेसने भरभरून देऊनही चव्हाण यांची पक्ष सोडण्याची कृती लोकांना आवडली नाही, हे यातून सिद्ध झाले आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या अशोक चव्हाण यांना ठिकठिकाणी मतदारांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. नांदेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी पराभव केला आहे.

भाजपमध्ये गेलेल्या बसवराज पाटील मुरुमकर यांच्या उमरगा तालुक्यातून आणि ते दोनवेळा आमदार झालेल्या औसा मतदारसंघातूनही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मोठी आघाडी मिळाली आहे. पाटील हे एकवेळा उमरग्यातूनही निवडून आले होते. पक्षांतर आवडले नसल्याचा संदेश देत मतदारांनी काँग्रेसच्या झोळीत भरभरून दान टाकले आहे. त्या बळावर काँग्रेस राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Nana Patole on Mahavikas Aghadi
Hatkanangle Elections winner : आवडे, कोरेंनी शब्द पाळला; धैर्यशील मानेंचा विजय खेचून आणला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com