Dharashiv News : उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघाचा तिढा सोडवणे महायुतीला अद्याप शक्य झालेले नाही. हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाछी अडून बसले आहेत. भाजपनेही या मतदारसंघात तयारी केली आहे, काही जणांनी उमेदवारीचा दावाही केला आहे. हा मतदारसंघ भाजपलाचा सोडावा आणि उमेदवार स्थानिक द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांमधून होऊ लागली आहे.
उस्मानाबाद मतदारसंघासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्या अर्थाने या दोन्ही पक्षांनी मतदारसंघावर दावा केला आहे. तीनही पक्ष ठाम असल्यामुळे उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब लागत आहे.
मतदारसंघ कोणालाही सुटला तरी उमेदवार बाहेरचा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. उमेदवार स्थानिक असावा, अशी मागणी ते करू लागले आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी गेली 35 ते 40 वर्षे कष्ट करून या मतदारसंघात भाजपची बांधणी केली आहे. असे असताना प्रत्येकवेळी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवताना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मित्रपक्षाला संधी मिळाली आहे. त्यामुळे आता 2024 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडे अनेक सक्षम नेते आहेत. संधी न मिळाल्यामुळे या नेत्यांना त्यांचे राजकीय कौशल्य दाखवण्याची संधी मिळालेली नाही. कमळ हे चिन्ह घराघरांत पोहोचवण्यासाठी या मतदारसंघातून भाजपला संधी मिळाली पाहिजे, असे कैलास शिंदे यांनी म्हटले आहे. या मागणीमुळे महायुतीत या मदरसंघासाठीची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद मतदारसंघात भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (PravinSinh Pardeshi) यांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांनी धाराशिव जिल्ह्यासह मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. परदेशी हे 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या माध्यमातून ते बचत गटांच्या महिला, निराधार, दिव्यांगांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. त्यांनी आपल्या यंत्रणेद्वारे मतदारसंघात सर्वेक्षणही करून घेतले आहे.
या यंत्रणेने फोनवर जवळपास दीड लाख लोकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत. भाजपला देशभरातून किमान 40 ते 50 आजी-माजी आयएएस, आयपीएस अधिकारी निवडून आणायचे आहेत. त्याअंतर्गत परदेशी यांच्या नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता गंमत अशी झाली आहे की, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि राष्ट्रवादीकडूनही परदेशी यांचे नाव चर्चेत आले आहे. जागा राष्ट्रवादीला सुटली तरी उमेदवार परदेशीच असणार, अशी सोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. परदेशी यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडून आता अरविंद निलंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
अरविंद निलंगेकर हे निलंग्याचे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचे बंधू आहेत. जागा राष्ट्रवादीला सुटणार आणि उमेदवारी मलाच मिळणार, असा ठाम विश्वास प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केला आहे. भाजपही या मतदारसंघासाठी अद्याप स्पर्धेत आहे, हे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.