Madha Lok Sabha 2024: निंबाळकरांच्या नको त्या उठाठेवीमुळे मोहिते पाटील स्वगृही, शरद पवारांना बळ

Madha Lok Sabha 2024: खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधकांना बळ देणे सुरू केले होते. मोहिते पाटील यांच्या ताकदीकडे खासदार निंबाळकर आणि भाजपने का दुर्लक्ष केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नको त्या उठाठेवीमुळे खासदार निंबाळकर आणि भाजप अडचणीत सापडले असून, शरद पवार आणि महाविकास आघाडीला मात्र हत्तीचे बळ मिळाले आहे.
Madha Lok Sabha 2024
Madha Lok Sabha 2024Sarkarnama

काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कौतुक केले होते. खासदार निंबाळकर यांचे काम देशातील पहिल्या पाच की दहा खासदारांमध्ये आहे, असे ते म्हणाले होते. या विधानाचे टायमिंग महत्त्वाचे होते, कारण त्यावेळी तिकडे माढ्यातून लोकसभा लढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शड्डू ठाेकले होते. बावनकुळे यांच्या वक्तव्याने मोहिते पाटील यांना मिळायचा तो संदेश मिळाला होता. आज जे घडते आहे, त्याची बीजे त्यावेळीच रोवली गेली होती.

माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency 2024) विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil)आणि त्यांच्या कुटुंबीयांचा निर्विवाद प्रभाव आहे. मोहिते पाटील यांना डावलून यश मिळवणे हे आतापर्यंत कोणत्याही पक्षाला शक्य झालेले नाही. 2014 च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019 ला या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर (MP Ranjit Singh Naik Nimbalkar) विजयी झाले.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ताकदीशिवाय निंबाळकर यांना विजय मिळवणे शक्य झाले नसते. सर्वकाही सुरळीत आहे, असे वाटत असताना खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबीयांमध्ये खटके उडू लागले. याचे कारण होते खासदार निंबाळकर यांनी नको त्या ठिकाणी दाखवलेला, त्यांच्या अंगी नसलेला मुत्सद्दीपणा. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल, मात्र खासदार निंबाळकरांच्या या उठाठेवींमुळे मोहिते पाटील यांच्यासारखे मातब्बर घराणे भाजपपासून दूर झाले आहे.

Madha Lok Sabha 2024
Prakash Awade News: हातकणंगलेमध्ये ट्विस्ट; आवाडेंची समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश; आवाडे लोकसभेच्या रिंगणाबाहेर

मतदारसंघ पुनर्रचनेत माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर तालुक्यांचा काही भाग, फलटण, माण -खटाव या तालुक्यांचा समावेश होतो. 2009 च्या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील या मतदारसंघातून इच्छुक होते.

त्यांनी जोरदार तयारीही केली होती. विजयसिंह मोहिते पाटील हे त्यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांना अजितदादा पवारांकडून बळ दिले जायचे. मोहिते पाटील विरोधकांनी माढ्यातून शरद पवार यांनीच लढावे, असे वातावरण तयार केले. अखेर विजयदादांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन माढ्यातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. अशा रितीने 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही मोहिते पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

2014 मध्ये विजयदादांनीच लोकसभेची निवडणूक लढवली. मोदी लाट असतानाही ते निवडून आले. राज्यभरात याची चर्चा झाली. माढा लोकसभा मतदारसंघ आपलाच आहे, हे मोहिते पाटलांनी त्यावेळी दाखवून दिले. 2019 च्या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा इच्छुक होते, परंतु शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही. विजयदादांनीच निवडणूक लढवावी, यासाठी शरद पवार आग्रही असल्याचे सांगण्यात येत होते. या काळातच रणजितदादांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप उमेदवाराला माळशिरस तालुक्यातून मोठे मताधिक्क्य दिले. निवडून आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यात आणि माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील विरोधकांची एकजूट करायला सुरुवात केली आणि येथेच वादाची ठिणगी पडली.

अजितदादा पवार यांच्याकडून होत असलेला विरोध, हेही मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे एक कारण होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजितदादा पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले. अजितदादा पवार यांनी मोहिते पाटील विरोधकांना बळ दिले होते. त्याचे शल्य मोहिते पाटील यांना होतेच. आता खासदार निंबाळकर यांनीही तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली होती. त्यांनी मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांना बळ देऊन त्यांची जुळवाजुळव सुरू केली होती.

मोहिते पाटील यांच्या ताकदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा धोका खासदार निंबाळकर यांनी पत्करला. विजयदादा हे 2014 च्या मोदी लाटेतही माढा मतदारसंघातून विजयी झाले होते, याचा विसर खासदार निंबाळकर आणि भाजपला पडला. त्यातच अजितदादा पवार हे आता शरद पवार यांच्यासोबत नसल्याने मोहिते पाटील यांचा मार्ग सुकर झाला आणि त्यांना सक्षम असा पर्याय मिळाला. दुरावलेले जिवाभावाचे सहकारी अखेर शरद पवार यांना पुन्हा भेटले.

Madha Lok Sabha 2024
Raut Vs Rane: विनायक राऊतांचे महायुतीच्या उमेदवाराला कडवे आव्हान; रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेत....

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही. सर्व सहा आमदार महायुतीचे आहेत. त्यातच मोहिते पाटील कुटुंबीय पक्षात असल्याने भाजपची ताकद दुपटीने वाढलेली होती. आता मोहिते पाटील शरद पवारांसोबत आल्याने महाविकास आघाडीला महाराष्ट्रातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातही पाठबळ मिळाले आहे. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेशामुळे राज्यभरात एक संदेश जाईल, या शरद पवार यांच्या वक्तव्यात मोठा अर्थ दडलेला आहे.

मोहिते पाटील यांना मानणारा मतदार सर्वच समाजघटकांत आहेत. मोहिते पाटील भाजपमध्ये गेले तरी सेक्युलर विचारधारा मानणारे मतदारही त्यांच्याच पाठीशी होते, असे सांगितले जाते. मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे काही निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बेरजेचे राजकारण करण्यात पटाईत असलेले शरद पवार आता यावर कशी मात करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com