Ahmednagar Politics : 'अकोले'त कोणाचा 'गेम' होणार? शरद पवारांचं बळ नेमकं कोणाला, पिचड की भांगरेंना?

Madhukarrao Pichad and Vaibhav Pichad met Sharad Pawar : शरद पवार यांच राजकारण भल्याभल्यांना समजत नाही, असं आहे. पिचड पिता-पुत्राची शरद पवार यांच्याशी झालेली भेट पुढे काय राजकीय रंग उधळेल हे आताच सांगता येणार नाही. पिचड यांच्यासमोर राजकीय अस्तित्वासाठी 'करो या मरो', अशी स्थिती आहे. राजकारणात 'अभी नही, तो कभी नहीं', असंच असतं. महायुतीत भाजपकडून कोंडी झाल्यानं पिचड मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करतील, असा अंदाज बांधला जात आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Akole News : 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वीचं चित्र आठवतंय. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचं राजकारण सैरभैर झालं होतं. भाजपच्या भगवेकरणाचा जोर वाढला होता. राज्यात भाजपच सत्ता मिळवणार, हे गृहीत होतं. त्यामुळं राज्यभरातील दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली होती.

यातच राजकीय वारसदारांना लाॅचिंग करण्याचं दिव्य नेत्यांसमोर होतं. सत्तेपासून दूर जावं लागू नये म्हणून नेत्यांनी आपल्या वारसदारांना भाजपची वाट धरायला लावली. यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून 30 पेक्षा अधिक दिग्गज मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दिग्गज नेते, मंत्री, आमदार, माजी आमदारांचा यात समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुलाच्या इच्छेखातर आपण भाजपमध्ये जात आहोत, असे सांगून मधुकरराव पिचड देखील भाजपमध्ये डेरेदाखल झाले. आता 2024 मध्ये मात्र चित्र फारच बदलेलं दाखवत आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देण्यासाठी राज्यातील दिग्गज नेते, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या संपर्कात आहे. यात दिग्गज नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनीही शरद पवार यांची घेतलेली भेट घेतल्याने नगरमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचे हे संकेत तर नाही ना अशी चर्चा जोर धरू लागले आहे. या भेटीचं टायमिंग पाहिल्यास 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात धक्क्यावर धक्के देत आहेत.

Sharad Pawar
Uddhav Thackeray : भाजप नेत्यानं शिवसेनेत प्रवेश करताच 'बाजारबुणगे' म्हणत ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकरराव पिचड यांचे सत्तेतील राजकीय प्रवास प्रदीर्घ, असा राहिलाय. माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले मधुकरराव पिचड 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

1980, 1985, 1990, 1995 या चार पंचवार्षिमध्ये सलग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. या काळात त्यांना आदिवासी, आदिवासी विकास, दुग्धविकास, प्रवास विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयात काम पाहिलं.

मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी स्थापन केली, तेव्हापासून मधुकरराव पिचड त्यांच्याबरोबर होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1999, 2004, 2009, असे सलग तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले. यानंतर त्यांनी 2014 मध्ये त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून उतरवत विजयी केलं.

याचवेळी देशात मोदी लाट होती. या लाटेचे तडाखे काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांना बसले. देशात भाजपनं मोठं सत्तांतर घडवून आणत केंद्रात सत्ता स्थापन केली. या मोदी लाटेचा प्रभाव 2019 मध्ये कायम राहिला. लोकसभेत भाजप बहुमतानं केंद्रात आली. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार होत्या. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पिचड यांचा पराभव

आमदार असलेले वैभव पिचड यांनी देखील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 'बालहट्ट' असल्याचा सांगत मुधकरराव पिचड यांनी पुत्र वैभवबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड पिता-पुत्रांनी ज्यापद्धतीने साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तो शरद पवार यांच्या जिव्हारी लागला. विधानसभेच्या तोंडावर पिचडांनी साथ सोडल्यानं, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसह सर्वांनीच अकोल्यात विधानसभा 2019 मध्ये ताकद लावली. पिचड यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार स्वतः अकोलेच्या मैदानात उतरले. एकास एक, असा उमेदवार देत अजित पवारांनी वैभव पिचड यांच्याविरोधात विरोधकांना देखील एकत्र केलं.

परिणामी वैभव पिचड यांचा पराभव झाला. किरण लहामटे यांचा विजय घडवून आणला. पिचड यांचा पराभव म्हणजे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पवारांनी लावलेला सुरुंग होता. पवारांशिवाय पर्याय नाही, असाच काहीसा मेसेज, त्यावेळी पिचडांना मिळाला. पिचड यांच्या राजकीय अस्तित्वाचा संघर्ष सुरू झाला होता. हा संघर्ष आता बराच काळ करावा लागणार असल्याचा अंदाज, पिचड पिता-पुत्राला आला आहे. त्यामुळं पिचडांसमोर योग्य वेळीची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.

Sharad Pawar
Supriya Sule: तीन आमदारांना घेऊन सुप्रियाताईंचे अजितदादांच्या विरोधात आंदोलन; नेमकं काय झालं

अजितदादांना लहामटेंची साथ

याचदरम्यान, राज्यातील राजकारणात बराच राजकीय उलथापालथी झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर शिवसेना फुटली. महाविकास आघाडी सरकार उलथावून लावलं गेलं. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ देते, त्यांना मुख्यमंत्री केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. शरद पवार यांची अजित पवारांनी साथ सोडली. शरद पवारांची अनेकांनी साथ सोडली, अजितदादांबरोबर 40 हून अधिक आमदार आले. विधान परिषदेचे सहा सदस्य होते. यात अकोले विधानसभा मतदारसंघातील आमदार किरण लहामटेंचा देखील समावेश आहे. अजितदादा पुढे सत्तेत सहभागी झाले.

राज्यात महायुती सरकार आलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. 'अबकी बार चारसौ पार'चा नारा देणाऱ्या भाजपला नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं लागलं. लोकसभेतील प्रयोग आता विधानसभा निवडणुकीत करण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. तोच कित्ता महायुतीकडून रंगवला जात आहे. त्यामुळे जागा वाटपाकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

पिचडांचे राजकीय अस्तित्व धोक्यात?

महाविकास आघाडी आणि महायुतीमुळं राज्यात जागावाटपाचा पेच कसा सुटतो, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. महायुतीत अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे जात आहे. त्यामुळं भाजपमध्ये असलेले माजी आमदार वैभव पिचड यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं आहे. शरद पवारांनीही पिचड पिता-पुत्रांची इथं आणखी कोंडी केलीय.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी अकोले इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक कार्यकारिणीचा कार्यक्रम घेतला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत. यानुसार अमित भांगरेंनी तयारी देखील सुरू केली आहे. भांगरे आणि पिचड यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. शरद पवार यांनी भांगरे यांना बळ दिल्यानं पिचड यांच्यासमोर त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात, त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाला अधिकच आव्हान मिळालं आहे.

एकप्रकारे ही राजकीय कोंडी अधिकच तीव्र झालीय. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पिचड पिता-पुत्र बरीच धडपड करत आहेत. भाजपकडून देखील त्यांना म्हणावा, तसा प्रतिसाद मिळत नाही. एकप्रकारे वैभव पिचड एकाकी पडलेले दिसत आहेत. हीच राजकीय कोंडी फोडण्यासाठी पिचड पिता-पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : नगरच्या राजकारणात मोठा भूकंप ! शरद पवारांचा फडणवीसांना पुन्हा 'दे धक्का'! पिचड पिता-पुत्राची 'घरवापसी'?

भांगरे, लहामटे 'अलर्ट'

शरद पवार यांनी पिचड पिता-पुत्रांना दिलेली भेट, अमित भांगरे यांच्या खेम्यात चलबिचल झालीय. या भेटीचा तपशील समजावून घेण्यासाठी भांगरे यांची धडपड सुरू आहे. शरद पवारांनी पिचड पिता-पुत्राची दिलेली भेट म्हणजे, अमित भांगरे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केल्यासारखं झालं आहे. त्यामुळे अमित भांगरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलीय.

याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी देखील पिचड पिता-पुत्रांनी शरद पवारांची घेतलेली भेट 'सिरिअस' घेतली आहे. शरद पवार राजकारणातील 'वस्तादांचे वस्ताद', पिचड यांची भेट ही साधी नसणार, या तिघांची अर्धा तास बंद दाराआड झालेली चर्चा, बराच राजकीय खल करून गेलेली असणार, त्यामुळे आमदार लहामटे देखील सावध झालेत. तसं पाहिलं गेल्यास किरण लहामटे यांनी मतदारसंघात गेल्या दिवसांपासून संघटनावर भर दिलेला दिसतो.

Sharad Pawar
Shiv Swarajya Yatra Ahmednagar : NCP शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन; शिवसेनेच्या जागेसह सहा मतदारसंघावर दावा

पिचडांना बळ मिळणार?

शरद पवार यांच राजकारण भल्याभल्यांना समजत नाही, असं आहे. पिचड पिता-पुत्रांची शरद पवार यांच्याशी झालेली भेट पुढे काय राजकीय रंग उधळेल हे आताच सांगता येणार नाही. पिचड यांच्यासमोर राजकीय अस्तित्वासाठी 'करो या मरो', अशी स्थिती आहे. राजकारणात 'अभी नही, तो कभी नहीं', असंच असतं.

महायुतीत भाजपकडून कोंडी झाल्यानं पिचड मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करतील, असा अंदाज बांधला जात आहे. यातून देखील शरद पवार यांच्याशी चर्चा झाली, असू शकते, असं जाणकारांचा अंदाज आहे. शरद पवार यांचं पिचडांना पूर्वीसारखं बळ मिळाले का? बळ जरी मिळालं, पिचड शरद पवारांबरोबर राहतील, की भाजपमध्ये राहतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com