Uddhav Thackeray : उद्धवसाहेब… सोडून गेलेल्यांना पवारसाहेबांनी धडकी भरवली, आपण कधी सक्रिय होणार?

Sharad Pawar NCP Shiv Sena Maharashtra Politics : आपल्याला असलेली सहानुभूती, सत्ताधाऱ्यांवर नाराजी या मुद्द्यांना धरून बसलेली महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना विधानसभा निवडणुकीसाठी तितकीशी सक्रिय झाल्याचे दिसत नाही.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. विरुद्ध विचारधारेचे पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले, सारख्याच विचारांचे पक्ष सत्तेसाठी वेगळे झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर झालेली पक्षांची फोडाफोडी देशभरात गाजली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष फुटले. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री बनले. अजितदादा पवारही इतकेच आमदार घेऊन भाजपसोबत गेले आणि उपमुख्यमंत्री बनले.

सोडून गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी पर्याय शोधले आहेत का? याचे उत्तर संदिग्ध असेच आहे. काही अपवाद वगळता हे 40 मतदारसंघ महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Assembly Election 2024 : वस्ताद, खेळाडू आणि 370...! 'या' तीन राज्यांत भाजपची कसोटी अन् देशभर चर्चा

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यापैकी उमरगा-लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, भूम-परंड्याचे आमदार डॉ. तानाजी सावंत हे एकनाथ शिदे यांच्यासोबत गेले. धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. उमरगा-लोहारा मतदारसंघात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासमोर उद्धव ठाकरे कोणाला मैदानात उतरवणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

उमरग्याचे दोनदा आमदार, एकदा धाराशिवचे खासदार राहिलेले प्रा. रवींद्र गायकवाड हेही शिंदे गटात दाखल झाले आहेत. आमदार चौगुले यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जाते. उमरगा-लोहारा मतदारसंघ 2009 मध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकांत आमदार चौगुले निवडून आलेले आहेत.

सलग 15 वर्षांपासून गावागावांत त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. एकंदर आमदार चौगुले हे मजबूत स्थितीत दिसतात. अर्थातच, विरोधक हे मान्य करत नाहीत. पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांमध्ये असलेली सहानुभूती आमदार चौगुले यांच्यासाठी अडचणीची ठरणार, ठाकरेंच्या शिवेसेनेचा उमेदवार विजयी होणार, असा विश्वास कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दणदणीत विजय झाला. राजेनिंबाळकर यांना उमरगा-लोहारा मतदारसंघातून त्यांना 40 हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली. शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या पाठिशी असतानाही राजेनिंबाळकर यांना मिळालेले मताधिक्य आमदार चौगुले यांची चिंता वाढवणारे ठरले. या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीत उत्साह आहे. आमदार चौगुले हे शिवसेनेचे असल्यामुळे या मतदारसंघावर ठाकरे गटाचा नैसर्गिक दावा असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसनेही मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Congress Politics : मुख्यमंत्रिपदासाठी दोन पाटलांचे गुडघ्याला बाशिंग, देशपांडेंचीही फिल्डींग

आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 'अॅक्शन मोड'वर आले आहेत. सोडून गेलेल्या आमदारांना त्यांनी पर्याय शोधले आहेत, काही ठिकाणी शोध सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मात्र अद्याप तरी शांतता दिसत आहे. उमरगा -लोहारा मतदारसंघात ठाकरे गट वरून शांत दिसत असला तरी आतून हालचाली सुरू आहेत. इच्छुकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे उमेदवार लवकर जाहीर केला तर गणिते बिघडू शकतील, अशी भीती ठाकरे गटाला आहे.

कागल (जि. कोल्हापूर) येथील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्यासोबत जाऊन मंत्री बनलेले हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शरद पवार यांच्या या चालीमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशीच भूमिका घेत उमेदवार हेरून त्यांना कामाला लावल्यास वातावरणनिर्मिती होऊ शकते.

महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात म्हणाव्या तितक्या वेगाने हालचाली सुरू नाहीत, असेही सांगितले जात आहे. राखीव मतदारसंघांत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे, तो मतदारसंघ त्याच पक्षाला सुटेल, अशीही चर्चा आहे. तसे झाले तर उमरगा-लोहारा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटणार, हे निश्चित आहे.

आमदार चौगुले यांनी गेल्या तिन्ही निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तालुक्यात पाटील यांची संस्थात्मक ताकद मोठी आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुती मजबूत स्थितीत आहे. या स्थितीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला नव्हता, मात्र विधानसभा निवडणुकीलाही तसेच होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Congress News : राजकीय आखाड्यातील बजरंग, विनेशच्या नव्या डावाने भाजप हैराण; काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

आमदार चौगुले हे तीनवेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी अँटिइन्कम्बन्सी असू शकते. असे असले तरी संघटनात्मक पातळीवर ते विरोधकांपेक्षा चांगल्या स्थितीत दिसत आहेत. सहजपणे उपलब्ध होणारा आमदार, अशी त्यांची प्रतिमा आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीला काट्याची टक्कर द्यायची असेल, हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर चौगुले यांच्या तोडीचाच उमेदवार द्यावा लागेल.

उद्धव ठाकरे यांना साहनुभूती आणि पक्षातून फुटल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरोधात नाराजी आहे, त्यामुळे आपला उमेदवार निवडून येणार, असा समज ठाकरे गटाचा झाला आहे. लोकांमधील नाराजीचा मुद्दा बऱ्याच अंशी खरा असली तरी मतदारसंघातील सर्व गावांत पोहोचलेला, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा ठाकरे गटाला शोध घ्यावा लागणार आहे. उमेदवार कोण, हे लवकर ठरत नसल्यामुळे आमदार चौगुले यांच्यासमोर कुणीही नाही, असा संदेश मतदारसंघात गेला आहे. हे नॅरेटिव्ह सेट होण्यापूर्वीच महाविकास आघाडीला ते तोडावे लागेल. अन्यथा, सहानुभूती, सताधाऱ्यांवर नाराजी हे मुद्दे असले तरी महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com