Maharashtra Assembly Election 2024 : ऐतिहासिक! महाराष्ट्राला श्वास रोखायला लावणाऱ्यांचे भवितव्य ठरवणारी निवडणूक

Political Drama in Maharashtra: युतीची ताटातूट, महाविकास आघाडीची स्थापना, पहाटेचा शपथविधी, पक्षांची फोडाफोडी, नेत्यांची पळवापळवी, पहाटेचा शपथविधी अशा श्वास रोखून धरायला लावणाऱ्या राजकीय घडामोडी गेल्या पाच वर्षांत घडल्या. त्यासाठी जबाबदार सर्व नेत्यांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभेची आज जाहीर झालेली निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याने पाहिलेल्या राजकीय घडामोडी थक्क करणाऱ्या, काही नेत्यांमुळे महाराष्ट्राच्या सुस्ंकृत राजकारणाला डाग लावणाऱ्या ठरल्या आहेत.

सर्वकाही संपल्यानंतर पुन्हा कसे उभे राहायचे, हेही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिले. विधानसभेच्या या निवडणुकीतून राज्यातील सर्वच पक्षांचे आणि प्रमुख नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.

गेल्या पाच वर्षांत काय घडले, याऐवजी काय घडले नाही? असा प्रश्न चपखल बसणारा आहे. मुळात 2019 ची विधानसभा निवडणूक भविष्यातील घडामोडींचे संकेत देणारी ठरली. शिवसेना-भाजपने युती म्हणून ही निवडणूक लढवली, मात्र अनेक मतदारसंघांत त्यांच्यात बेदिली झाल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मोठी गळती लागली. शरद पवार यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. शरद पवार यांनी एकहाती किल्ला लढवून पक्षाला जिवंत ठेवले. तरुण फळीने काँग्रेसलाही जिवंत ठेवले. शरद पवार यांनी पावसात भिजत केलेले भाषण ऐतिहासिक ठरले.

Maharashtra Assembly Election 2024
Bypolls Election Dates : नांदेडची पोटनिवडणूक जाहीर; वायनाड लोकसभेसह 48 विधानसभा मतदारसंघांमध्येही रणसंग्राम; असे आहे वेळापत्रक...

निकाल जाहीर झाला आणि राजकारणाला नाट्यमय वळण लागले. मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली. अमित शाह यांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेल्या बैठकीत तसा शब्द दिला होता, असे ठाकरे सांगू लागले.

भाजपकडून याचा अखेरपर्यंत इन्कार करण्यात आला. या मुद्यावरून शिवसेना - भाजपची 25 वर्षांची युती तुटली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेनेने कायम काँग्रेसला विरोध केला होता, मात्र राजकीय सोय म्हणून ते एकत्र आले.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि एका भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र त्यावेळी झोपेतून जागाही झालेला नव्हताय. ही बातमी धडकली आणि महाराष्ट्राला धक्का बसला. शरद पवार यांनी मुत्सद्दीपणाच्या जोरावर फडणवीस आणि अजितदादांची ही खेळ यशस्वी होऊ दिली नाही.

अजितदादांसोबत जाऊ शकणारे बहुतांश आमदार शरद पवारांकडे परत आले. या शपथविधीने एक झाले, ते म्हणजे राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली होती आणि महाविकास आघाडीचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्राने श्वास रोखून धरला होता.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचा शंखनाद, 20 नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी लागणार 'युती की आघाडी'चा निकाल

ठाकरे कुटुंबीय निवडणुकांपासून दूर राहिले होते. निवडणूक लढवणारे या कुटुंबातील आदित्य ठाकरे हे पहिलेच ठरले. यापूर्वीही युतीची सत्ता आली होती, मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी, नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले होते.

सत्तेचा रिमोट मात्र बाळासाहेबांच्या हातीच होता. 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. या पदावर बसण्याची त्यांची इच्छा नव्हती, मात्र अन्य कुणी मुख्यमंत्री झाला तर त्याच्या हाताखाली काम कसे करणार, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी घेतली होती, असे सांगितले गेले.

सर्वाधिक 105 आमदार असलेल्या भाजपवर विरोधी बाकांवर बसण्याची नामुष्की ओढवली. शिवसेनेचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. महाविकास आघाडीचा प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी मोठा धक्का होता.

विरोधक एकजूट राहिले तर मोदी आणि शाह यांना मात देता येऊ शकते, हा संदेश शरद पवार यांनी देशभरातील विरोधकांना दिला होता. त्यामुळे हे सरकार पाडण्यासाठी भाजपने अगदी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू केला होते. यासाठी तपासयंत्रणांचा उगडपणे वापर करण्यात आला, हे देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. यातूनच भाजपकडून एकापाठोपाठ चुका होत गेल्या.

भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित 100 कोटी वसुलीच्या प्रकरणात कारागृहात जावे लागले. त्यांना जामीन देताना न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे तपासयंत्रणा आणि भाजपच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य एक तत्कालीन मंत्री नवाब मलीक, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही विविध आरोपांखाली कारागृहात जावे लागले होते. आमच्याकडे या अथवा कारागृहात जा, असा स्पष्ट इशाराच जणू भाजपने महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना दिला होता.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 : "लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही..." निवडणूक तारखा जाहीर होताच जरांगे कडाडले, मराठ्यांना केलं मोठं आवाहन

याचा परिपाक म्हणून अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्याला कारण ठरले एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 40 आमदार. एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे कॅबिनेटमंत्री होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रससोबत जाऊन हिंदुत्व सोडले याची प्रचीती त्यांना अडीच वर्षांनंतर आली. ते 40 आमदारांसह सूरतमार्गे गुवाहाटीला गेले. ही सगळी सोय भाजपने केली होती, हे लपून राहिले नाही. शिंदे एकदाचे मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. सर्वांनाच वाटत होते की फडणवीस मुख्यमंत्री बनतील, मात्र मोदी, शहा यांनी धक्कातंत्राचा अवलंब केला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि नंतर शिंदे गट-भाजप युतीचे सरकार स्थान झाल्यानंतर नेत्यांनी एकमेकांसाठी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला डाग लावणारी ठरली. रोज उठून मर्यादा सोडून एकमेकांवर केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे लोकांचे कान किट्ट होऊन गेले होते.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर हात घातला आणि अजितदादा पवार यांच्यासह 40 आमदारांना सोबत घेतले. तिकडे, दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही भाजपची वाट धरली.

अजितदादांच्या प्रवेशामुळे महायुतीत शीतयुद्ध सुरू झाले. शिंदे गटात नाराजी पसरली, कारण त्यांच्या वाट्याला येऊ घातलेली मंत्रिपदे अजितदादांना मिळाली. या शीतयुद्धासह महायुती लोकसभा निवडणुकीला सामोरी गेली. निकाल धक्कादायक लागले.

भाजपची झोप उडाली. यापूर्वीच्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या सोबतीने कमाल करून दाखवली. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या.

सर्वकाही संपलेले असताना मैदानात पाय घट्ट रोवून कसे उभे राहायचे, हे 84 वर्षीय शरद पवार यांनी दाखवून दिले. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही असाच संदेश दिला. मरणासन्न अवस्थेतील काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी इंगा दाखवल्यामुळे लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. तिकडे, बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली असंवेदनशीलता सरकारला मान खाली घालायला लावणारी ठरली. त्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला, मात्र तो मूळ आरोपींना वाचवण्यासाठीचा प्रयत्न होता, हा विरोधकांचा आरोप खालपर्यंत झिरपला.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रसेचे (अजितदादा पवार गट) नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. गेली पाच वर्षे महाराष्ट्राला श्वास रोखायला लावणाऱ्या, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला मातीत मिसळणाऱ्या, विचारसरणीशी राजकीय तडजोड करणाऱ्या आणि पक्षांची फोडाफोडी करणाऱ्या, फोडाफोडीला बळी ठरणाऱ्या राजकीय नेत्यांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे.

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखली, त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास उंचावला. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इनकमिंग काही थांबलेली नाही. विरोधक संपले, अशी हाकाटी महायुतीच्या नेत्यांनी पिटली होती. त्यामुळे लोकसभेची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली. त्यामुळे त्या पाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com