Mumbai News: राजकीय नेत्यांना काही वेळेस राणा भीमदेवी थाटात घोषणा कराव्या लागतात. पुढे त्या घोषणांचे काय होते, या शोधाचा विषय आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी नेते अशा घोषणा करतात.
अशीच एक घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्या घोषणेची राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. हे सर्वजण सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. आपल्या पाठीमागे महाशक्ती आहे, असे शिंदे यांनी गुवाहाटीतील हॉटेलात आमदारांना आश्वस्त केले होते. ही महाशक्ती म्हणजे अर्थातच भाजप असल्याचा उलगडा लोकांना लगेच झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्यात आला, बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाचे मुख्यमंत्रिपद घालवण्यात आले, असा संदेश समाजात गेला आणि त्यामुळे फुटीर आमदारांबाबत मोठी नाराजी पसरली.
त्याच काळात '50 खोके एकदम ओके' ही घोषणा प्रचंड गाजली होती. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले, असा त्या घोषणेचा अर्थ होता. राज्यातील घराघरांत ही घोषणा पोहोचली होती. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अडचणी वाढत होत्या. लोकांमध्ये नाराजी वाढतच होती. ही नाराजी कायम राहावी, यासाठी महाविकास आघाडीकडून, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रयत्न केले जात होते. तसे प्रयत्न आजही सुरू आहेत.
या सर्व बाबींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा आत्मविश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण झाला होता. तो धोका मुख्यमंत्री शिंदे यांनी ओळखला आणि एका जाहीर सभेत त्यांनी राणा भीमदेवी थाटात घोषणा करून टाकली. ''माझ्यासोबत आलेला एकही आमदार पडणार नाही. ते निवडून येतील याची जबाबदारी मी घेतली आहे.
यापैकी एखादाही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोड़ून निघून जाईन,'' अशी ती घोषणा होती. उत्साहाच्या भरात आपण ही घोषणा करून टाकली, याचा प्रत्यय मुख्यमंत्री शिंदे यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आला असेल.
शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 पैकी एकही आमदार पुढच्या निवडणुकीत विजयी होणार नाही, असा प्रचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षांकडून सुरू करण्यात आला. त्यामुळे संबंधित आमदारांचे धाबे दणाणले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बोलावे लागले होते. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदान व्हायच्या आधीच मुख्यमंत्र्यांच्या त्या घोषणेची आठवण लोकांना होऊ लागली आहे, ती आमदार श्रीनिवास वनगा यांच्यामुळे.
आमदार श्रीनिवास वनगा यांना 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पालघर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या 40 आमदारांमध्ये वनगा यांचा समावेश आहे. आता त्यांचा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे आमदार वनगा हे अक्षरशः ढसाढसा रडले आहेत.
उद्धव ठाकरे देव माणूस होते, शिंदे यांनी घात केला, असा साक्षात्कार त्यांना अडीच वर्षांनंतर झाला आहे. कालपासून ते गायब झालेले आहेत. त्यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगितले जात आहे.
वनगा यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेतील हवा निघून गेली आहे. मतदारसंघ भाजपला सुटल्यामुळे वनगा यांची अडचण झाली आहे. सोबत आलेल्या आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेणारे शिंदे एका आमदाराला उमेदवारी देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांची घोषणा पोकळ ठरली आहे.
शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्वच आमदार निवडून येणार की काही जणांना पराभवाचे तोंड पाहावे लागणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. अशा घोषणा राजकारणाचा भाग असतात. त्यामुळे आमदार पडले तर शिंदे राजकारण सोडून निघून वगैरे जातील, असे होत नसते.
राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो, तसा तो स्वार्थाचाही खेळ असतो. पदरात पडेपर्यंत काहीही खरे नसते. उद्धव ठाकरे देव आहेत, हे आमदार वनगा यांना आपला मतदारसंघ भाजपला गेल्यानंतरच कळले. आपल्या पदरात काय पडते आणि काय पडत नाही, यावरच आमदार, नेत्यांना आपले भूतकाळातील निर्णय बरोबर होते की चुकीचे होते, याची प्रचिती येते. आमदार वनगा यांचेही तसेच झाले आहे. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या कोणत्याही नेत्यासाठी अशा बाबी किरकोळ असतात.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घात केला, असे म्हणणे म्हणजे आमदार वनगा यांची पश्चातबुद्धी म्हणावी लागेल. आपल्यासोबत आलेल्या आमदारांचा मतदारसंघ वाचवण्यात मुख्यमंत्री शिंदे अपयशी ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिंदे हतबल तर झालेले नाहीत ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.