Eknath Shinde : दोन वर्षे पूर्ण केली, हे कर्तृत्व कसे? प्रचारकी मु्द्द्यांवरच शिंदे यांचा जोर

Maharashtra Assembly Election Shiv Sena Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दोन वर्षांच्या काळात कोणती विकासकामे केली, लोकांच्या जीवनात त्यामुळे काय फरक पडला, यावर बोलणे अपेक्षित होते.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. शिवसेनेचे आता दोन दसरा मेळावे होऊ लागले आहेत, एक उद्धव ठाकरे आणि दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. दोन्ही मेळाव्यांतून एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप केले जातात. यंदाच्या वर्षीही असेच चित्र दिसून आले. मला हलक्यात घेऊ नका, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

'सामोपचाराचा मार्ग गांडूंनी सांगावा...' प्रबोधनकार ठाकरे यांचे पहिलेच वाक्य होते शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील. तुडुंब भरलेल्या शिवाजी पार्कवर त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला होता. मराठी माणसाच्या हितासाठी, एकजुटीसाठी तो दसरा मेळावा सुरू झाला होता. शिवसेनेत फूट पडली आणि दोन दसरा मेळावे सुरू झाले. मूळ उद्देश बाजूलाच राहून गेला आणि आपलीच बाजू कशी उजवी, हे दाखवण्यासाठी या मेळाव्यांचा वापर सुरू झाला.

Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरेंना डिवचत एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

शिवसेनेत फूट पडल्यामुळे दसरा मेळाव्यांना असे स्वरूप मिळणे अपरिहार्य झाले आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे शिंदे यांना अशी भूमिका प्रखरपणे घ्यावी लागते, असे दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरही महत्वाची जबाबदारी होती. बहुतांश मुख्यंमंत्र्यांनी नगरविकास खाते आपल्याकडेच ठेवले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी हे खाते शिंदे यांच्याकडे सोपवले होते. यावरून शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात महत्व काय होते, हे लक्षात येईल.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली, असा आरोप करत शिंदे 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बाहेर पडले आणि भाजपसोबत गेले. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. विरोधकांनी या सरकारवर टीकेची झोड उठवली. शिंदेंसोबतच्या आमदारांनी प्रत्येकी 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला. हे सरकार आता पडणार, मग पडणार अशा तारखा ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील पक्षांकडून देण्यात आल्या.

Eknath Shinde
Uddhav Thackeray: लढण्याचा निर्धार पक्का, उद्धव ठाकरेंचा विरोधक, मित्रांनाही इशारा

मुख्यमंत्री शिंदे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा त्याचा समाचार घेतला. घासून पुसून नाही, तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली, असे ठाकरे आणि विरोधकांना डिवचणारे विधान शिंदे यांनी केले. आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. विधानसभेची मुदत संपत आली तरी या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. निकाल लागला असता आणि आमदार अपात्र ठरले असते तर शिंदे यांनी दोन वर्षे पूर्ण केली असती का, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित व्हावा, याची सोय शिंदे यांनीच लावून ठेवली आहे.

एकनाथ शिंदे हे उत्कृष्ट संघटक मानले जातात. या दोन वर्षांत त्यांनी संघटन कौशल्याची चुणूक दाखवली आहे. आपल्यासोबत आलेला एकही आमदार, खासदार नाराज होणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असताना आणि सोडून गेलेल्यांबद्दल लोकांमध्ये रोष असतानाही एकही आमदार अजून तरी परत आलेला नाही. शिंदे यांनी दोन वर्षे पूर्ण केली, त्यामागचे हे सर्वात मोठे कारण आहे, मात्र ते कर्तृत्व आहे का, यावर मतमतांतरे होऊ शकतात. 

Eknath Shinde
Maharashtra Politics : पटेलांच्या जाळ्यात अलगद अडकले नानाभाऊ, महाविकास आघाडीतील धुसफूस वाढणार

काही लोकांना, म्हणजे उद्धव ठाकरे यांना आता हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटते, उठाव केला नसता तर शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता, अशा प्रचारकी थाटाच्या मुद्द्यांवरही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जोर दिला. माझे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे, माझे हिंदुत्व कोणाचाही द्वेष करायला शिकवत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप, संघाचा कोणताही सहभाग नव्हता, असेही ठाकरे म्हणत असतात. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या शिंदे यांची गोची होते आणि त्यांना अशा प्रचारकी थाटात बोलावे लागते.

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या संकटामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचे हाल झाले, मात्र भाजपशासित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती अनेक पटींनी चांगली होती, हेही नाकारता येत नाही. कोरोनाच्या काळात लोक मरत होते आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, अशी अनाकलनीय टीका शिंदे यांनी केली.

कोरोना काळात मुख्यमंत्री घरी बसून होते, फेसबुक लाइव्ह करत होते, अशीही टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे लाइव्ह येऊन संवाद साधायला लागले की लोकांना दिलासा मिळत असे, हे मुख्यमंत्री शिंदे कसे नाकारू शकतात? कोरोनाच्या काळात बाहेर फिरणे योग्य नव्हतेच. शिवाय आजारपणामुळेही ठाकरे बाहेर पडले नव्हते. हा मुद्दा उचलल्यास त्याचा फायदा ठाकरे यांनाच होणार आहे, याचाही शिंदे यांना विसर पडला आहे.

शिंदे यांची कारकीर्द यशस्वी ठरली आहे, त्यांनी विविध योजना राबवल्या आहेत, असे त्यांचे स्वतःचे म्हणणे असते. दसरा मेळाव्यातही त्यांनी यावर जोर दिला. उद्धव ठाकरे घरात बसून होते, कोरोनाकाळात पैसे मोजत होते, शिवसैनिकांचा अपमान सुरूच राहिला असता... असे शिंदे म्हणतात. मग लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची इतकी घसरण का झाली असेल, याचा ते विचार करत नाहीत.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाचे मुख्यमंत्रिपद घालवले, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यााचा फटका महायुतीला बसला. याची जाणीव असूनही शिंदे पुन्हा त्याच मुद्द्यांवर बोलतात.

Eknath Shinde
Rahul Gandhi : ....म्हणून राहुल गांधींच्या नव्या राजकारणाची मोदींसह मित्रपक्षांनाही भीती वाटत असेल?

शिंदे यांच्या दाढीवरून महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ‘मला हलक्यात घेऊ नका, मी महाविकास आघाडी उद्ध्वस्त केली.’ या उद्ध्वस्त महाविकास आघाडीनेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला धूळ चारली, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी शिंदे आक्रमक भाषण करतात. त्यांच्या भाषणात आवेश असतो, मात्र मुद्दे न चालणारेच असतात. या भाषणातही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा गवगवा केला, मात्र ही योजना लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतरच का लागू केली, मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच का लागू केली नाही, असा प्रश्नही उपस्थित होतो.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लक्षणीय यश मिळाले नसते तर ही योजना लागू झाली असती का? याचे उत्तर नाही असेच आहे. ही योजना लागू केली आणि तिकडे खाद्यतेलांसह अन्य वस्तूंची ऐन सणासुदीत भाववाढ झाली, हेही लक्षात घेतले पाहिजे. विरोधकांना लक्ष्य करण्याऐवजी आपल्या सरकारची उपलब्धी काय आहे, आपले सरकार आल्यामुळे लोकांच्या जीवनात काय फरक पडला आहे, यावर सत्ताधाऱ्यांनी भर देणे अपेक्षित असते.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1967 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला होता, इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीलाही पाठिंबा दिला होता, याचा शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना विसर पडतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचा सर्वात मोठा सहभाग होता, हे लोकांना माहित आहे, ते शिंदे यांनाही माहित असणे अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com