Maharashtra Politics : पटेलांच्या जाळ्यात अलगद अडकले नानाभाऊ, महाविकास आघाडीतील धुसफूस वाढणार

Mahavikas Aghadi News : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी डिवचले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्या जाळ्यात अडकले. हायकमांडने ठरवले तर मुख्यमंत्री मीच होणार, असे नाना बोलून गेले. या मुद्यावरून महाविकास आघाडीत आधीच सुरू असलेली धुसफूस त्यामुळे आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nana Patole, Praful Patel
Nana Patole, Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024 : राजकारणातील विरोधक एकमेकांना चिमटे काढतात, टीका करतात, कधीकधी खिल्लीही उडवत असतात. मुरब्बी नेते याकडे दुर्लक्ष करतात. किंबहुना, कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचे आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचे, हे त्यांना चांगलेच माहिती असते.

काही नेते मात्र गरज नसताना टीकेला उत्तर देऊन जाळ्यात अडकतात आणि टीका करणाऱ्यांचा उद्देश सफल होतो. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे असेच जाळ्यात अडकले आहेत. ज्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे, त्याच वादाला पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या जाळ्यात अडकून फोडणी दिली आहे.

निवडणूक जाहीर झालेली नाही, जागावाटप पूर्ण झालेले नाही, तरीही मुख्यमंत्री कोण, यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांनी हा विषय लावून धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी नाना पटोले यांना डिवचले. 'ते भावीच राहणार, त्यांच्या नावापुढे काहीच लागणार नाही, ते आयुष्यभर भावी राहतील,' अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले (Nana Patole) यांना डिवचले होते.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) धुसफूस आणखी वाढावी, असा पटेल यांना वाटत असावे. खरेतर, नाना पटोले यांनी त्याकडे दुर्लक्ष करायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. नाना यांनी पटेल यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 'माझ्या नशीबात असेल तर मी मुख्यमंत्री होईन, आमच्या हायकमांडने निर्णय घेतल्यास मी मुख्यमंत्री होईन,' असे नाना बोलून गेले. प्रफुल्ल पटेल यांना हेच हवे होते.

हरियाणात काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील हा वाद शांत होईल, काँग्रेस माघार घेईल, अशी शक्यता निर्माण झाली होती आणि ते सत्ताधाऱ्यांना नकोच होते. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेली धुसफूस कायम राहावी, असे महायुतीच्या नेत्यांना वाटत असणार.

Nana Patole, Praful Patel
Rahul Gandhi : ....म्हणून राहुल गांधींच्या नव्या राजकारणाची मोदींसह मित्रपक्षांनाही भीती वाटत असेल?

पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये वादविवाद, धुसफूस सुरू आहे. राजकारणातील असे चित्र महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहिले असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी जाहीर मागणी होऊ लागली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून काही जणांचे बॅनर, पोस्टरही लागले आहेत.

हरियाणात काँग्रेस निवडणूक जिंकणार, असा अंदाज होता, मात्र तसे झाले नाही. याला कारण ठरले पक्षांतर्गत मतभेद आणि आम आदमी पक्षासोबत न झालेली आघाडी. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सूचनांचे हरियाणाच्या स्थानिक नेत्यांनी पालन केले नाही, हेही समोर आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी एकजूट न दाखवता सवतेसुभे निर्माण केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

हरियाणापासून धडा घेऊन महाविकास आघाडीतील नेते, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुधारणा होईल, असे वाटत होते, मात्र परिस्थिती वेगळीच दिसत आहे. सत्ताधाऱ्यांना पराभूत करायचे असेल तर विरोधकांना लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करावा लागतो. मित्रपक्षांची एकजूट भक्कम आहे, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाईल, याची काळजी घ्यावी लागते.

Nana Patole, Praful Patel
Uddhav Thackeray : आपले 40 आमदार सांभाळू न शकलेल्या ठाकरे, राऊतांना हवे काँग्रेसवर नियंत्रण!

एकजूट नाही दिसली तर कार्यकर्ते सैरभैर होतात. असे झाले तर सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा पराभव करणे अवघड होऊन जाते. काँग्रेसमध्ये तरुण नेत्यांची फळी आहे. हे नेते आपापल्या टापूंमध्ये प्रभाव कायम राखून आहेत. त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांची असते.

पक्षाची बांधणी, नेत्यांना एकजूट करणे, कार्यकर्त्यांना बळ देणे आदी कामांवर प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना भर द्यावा लागेल. निवडणूक जवळ आली आहे, त्यातच हरियाणात काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील नेत्यांनी कामाला लागले पाहिजे.

अशा कामांपासून परावृत्त करण्यासाठी, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते एकमेकांचा डिवचत असतात. नाना त्यालाच बळी पडले. प्रफुल्ल पटेल डिवचले, हा भाग असला तरी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेली धुसफूस तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे विरोधक एकजूट नसल्याचा संदेश लोकांमध्ये जात आहे.

महायुतीत जसे वाचाळ नेते आहेत, तसेच वाचाळ नेते महाविकास आघाडीतही आहेत. शरद पवार यांनी कान टोचूनही शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांचा कलगीतुरा सुरूच आहे. यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस आणखी वाढण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com