Sharad Pawar : 'वस्ताद'च ते ! वय 84; 64 दिवसांत 43 कार्यक्रम, 13 पत्रकार परिषदा अन् राज्यात 60 जाहीर सभा..!

Maharashtra politics Sharad Pawar Dominance: राजकारणातील वस्ताद अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भल्याभल्यांना घाम फोडला आहे. वयाच्या 84 व्या वर्षात असलेल्या या वस्तादाने 64 दिवसांत 60 जाहीर सभा, 13 पत्रकार परिषदा घेत 43 विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

त्यांच्यासाठी वय ही आडकाठी नाही, हे त्यांनी विधानसभा निवडणुकीतही दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागला आणि अगदी काही दिवसांतच ते घराबाहेर पडले. विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचा झंझावात कायम राहिला.

15 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान त्यांनी शंभरपेक्षा अधिक कार्यक्रम, जाहीर सभांना उपस्थिती लावली. 13 पत्रकार परिषदा घेतल्या.

होय, शरद पवारच! ते पुढील महिन्यात वयाची 84 वर्षे पूर्ण करून 85 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. सर्वकाही संपलेले असताना नव्याने सुरुवात करून यश कसे मिळवायचे, याचे अनोखे उदाहरण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीत तरुणांच्या समोर ठेवले.

विधानसभा निवडणुकीतही ते पायाला भिंगरी लावून फिरले. केवळ आपल्याच पक्षाच्या नव्हे, तर मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही त्यांनी वेळ दिला. अख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. निवडणुकीचा निकाल लागायचा तो लागेल, मात्र या वयात शरद पवार यांनी दाखवलेला उत्साह राजकारणातील तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे.

शरद पवार यांनी आपल्या सभा आणि कार्यक्रमांमध्ये कोणावरही पातळी सोडून टीका केली नाही. ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला नाही की कोण्या एका विशिष्ट जाती-धर्मावर टीका केली नाही. सत्ताधाऱ्यांवर, सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर त्यांनी टीका केली, तीही सौम्य भाषेत.

आपल्याला सोडून गेलेल्या सहकाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला, तोही आक्रस्ताळेपणा न करता. त्यांची संयत भाषेतील टीका त्यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांची झोप उडवणारी ठरली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी त्यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. त्याचा महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शरद पवारांच्या वाटेला गेले नाहीत, त्यांच्यावर टीका केली नाही.

Sharad Pawar
Maharashtra Highest Voting : मतदारांनी सगळी गणितं चुकवली! 30 वर्षांनी पहिल्यांदाच मतांचा विक्रमी टक्का

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची मोहीम सप्टेंबर महिन्यातच सुरू केली. मुख्यमंत्री कोण होणार, यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी शरद पवार हे विविध मतदारसंघांत फिरत होते.

आपल्याला सोडून गेलेल्यांच्या विरोधात तगडा पर्याय शोधत होते. नको त्या गोष्टींमध्ये पवार फारसे अडकून पडले नाहीत. उमेदवारांची निवड करण्यासाठी त्यांनी जास्त वेळ खर्ची घातला. आपल्याला जेथे जाणे शक्य नाही, तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवले.

सिंदखेडा (जि.धुळे) येथे 15 सप्टेंबर रोजी आयोजित शेतकऱ्यांच्या मेळाव्याने शरद पवार यांच्या झंझावाताला सुरुवात झाली. 31 ऑक्टोरपर्यंत त्यांनी अशा विविध 43 कार्यकर्मांना हजेरी लावली आणि 10 पत्रकार परिषदाही घेतल्या.

1 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान त्यांनी राज्यातील विविध भागांत 60 पेक्षा अधिक जाहीर सभा घेतल्या. तीन पत्रकार परिषदाही घेतल्या. याशिवाय दिवाळीनिमित्त विविध गावांत जाऊन कार्यकर्ते, लोकांच्या भेटी घेतल्या. पक्षप्रवेश सोहळ्यांनाही हजेरी लावली. या वयातही त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी तब्बल 6 जाहीर सभा घेतल्या.

Sharad Pawar
Gautam Adani Companies in India : अदानी 36 वर्षांत कसे झाले अब्जाधीश; 'या' कंपन्यांची बक्कळ कमाई

शरद पवार यांचा दिनक्रम थक्क करून टाकणार असतो. ते दररोज सकाळी 6 वाजता कार्यालयात जाण्यासाठी तयार असतात. मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी 6 ते 7 या वेळेत ते विविध वृत्तपत्रांचे वाचन करतात. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते. त्यासाठी पूर्वपरवानगीची गरज नसते.

सकाळी सातनंतर ते लोकांच्या भेटी घेतात. आलेल्या सर्वांना भेटण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. लोकांच्या भेटीगाठी झाल्या की ते वाय. बी. चव्हाण सेंटरमधील कार्यालयाकडे रवाना होतात. प्रवासात ते विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करतात. नुसते वाचनच करत नाहीत तर महत्त्वाच्या संदर्भांना 'मार्किंग' करून ठेवतात.

शरद पवार यांचे वर्षातील 365 दिवस असे 'पॅक' असतात. संसदेचे अधिवेशन, रतय शिक्षण संस्थेची सभा, कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती, यासह अन्य कार्यक्रम, पक्षाचे कार्यक्रम हे आधीच निश्चित झालेले असतात. वर्षांतून 110 दिवस त्यांचे मोकळे असतात. या दिवसांत ते लोकांना दररोज न चुकता भेटतात.

दिवाळीला ते हमखास बारामतीला येतात. दिवाळीतही ते लोकांना भेटतात. त्यांचा आहार लिक्विड असतो. विविध भाज्या, फळांचा ज्यूस ते घेतात. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणातही ते विविध फळे आणि भाज्यांचा ज्यूस घेतात.

Sharad Pawar
Gautam Adani : अमेरिकेत खटला दाखल होताच अदानींनी घेतला मोठा निर्णय; शेअर बाजारात भूकंप  

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार हे निराश होऊन घरी बसले नाहीत. या वयातही ते नव्या दमाने कामाला लागले. पक्ष सोडून जाणाऱ्यांचा निर्णय चुकीचा होता, हे त्यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांचा असाच प्रयत्न दिसून आला आहे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.

तगड्या उमेदवारांचा शोध घेतला. दबावाला बळी न पडता तपासयंत्रणेलाच घाम फोडण्याची किमया शरद पवार यांनी करून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या मेहनतीला किती यश मिळते, हे 23 नोव्हेंबर रोजी कळणार आहे. निकाल काहीही लागला तरी शरद पवार यांनी दाखवलेली जिद्द ही दिशादर्शक आहे, निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आशेचा किरण दाखवणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com