Mumbai News: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघ काही तास उरले आहेत. त्यानंतर २३ तारखेला निकाल लागल्यानंतर राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असली तरी यामध्ये अनेक ‘फॅक्टर’ किंगमेकर ठरू शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये तब्बल 76 जागांवर होणारी थेट लढत, हाही महत्वाचा मुद्दा आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा सपडा साफ केला. युतीसाठी हा अनपेक्षित पराभव होता. या पराभवातून धडा घेत युतीने आघाडीवर फेक नॅरेटिव्ह, व्होट जिहाद आदी आरोप केले. विधानसभेच्या प्रचारातही हा मुद्दा आघाडीवर होता. त्याचप्रमाणे लाडकी बहीणसारख्या योजनांचीही युतीने जोरकसपणे जाहिरातबाजी केली. त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडला, हे 23 तारखेला स्पष्ट होईल. पण इतर काही मुद्द्यांकडेही कानाडोळा करून चालणार नाही.
राज्यात आघाडीत काँग्रेस 105 जागांवर लढत आहे. त्यापैकी 76 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. त्यापैकी 50 जागा मिळतील, अशी खात्री भाजपला आहे. तर काँग्रेसला प्रामुख्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेतही यश मिळेल, अशी आशा आहे.
काँग्रेसने इथे कच खाल्ली तर मात्र महाविकास आघाडीसाठी राज्यात सत्ता काबीज करणे कठीण जाऊ शकते. जेवढ्या जास्त जागा काँग्रेस भाजपविरोधात जिंकेल तेवढी जास्त संधी आघाडीला सत्तेत पोहचण्याची आहे. कारण युतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढत असून भाजपवरच महायुतीचे सत्तेचं गणित अवलंबून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पश्चिम महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरतोय, यावरही बरेच अवलंबून आहे. पण पवारांनी निवडलेले मतदारसंघ, तिथे दिलेले उमेदवार, त्यांनी केलेला प्रचार, गद्दारांना पाडा, असे केलेले आवाहन यांमुळे सध्यातरी अनेक मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षापेक्षा पवारांचेच पारडे जड असल्याचे दिसते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची धास्ती महायुतीला आहे, असे म्हणायला हरकत नाही. लोकसभेत सर्वाधिक स्ट्राईक रेट याच पक्षाचा होता.
जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे पक्षामध्ये बराच वाद झाला होता. काही मतदारसंघात उमेदवारांची अदलाबदली, उमेदवार देण्यात चुकलेले निर्णय, त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये या दोन पक्षांची कामगिरी महायुतीच्या सत्तेची चावी असल्याचीही चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीणसह अनेक योजना आणल्या. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण असल्याचा दावा युतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे बेरोजदारांना अनुदान व इतर मुद्दे युतीच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे. या लोकप्रिय योजनांचा मतांमध्ये परिवर्तन होणार का, हा युतीसाठी कळीचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली एक है तो सेफ है ची घोषणा बहुजन वर्गाला युतीच्या बाजूने किती झुकवणार, हेही महत्वाचे आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत असून इतर अनेक घटकही निवडणुकीत प्रभावशाली ठरणार आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण, मनसेसह वंचित, परिवर्तन महाशक्ती, अपक्षांचा किती प्रभाव पडतो, हे पाहणेही महत्वाचे असेल. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव किती मतदारसंघात पडणार, यालाही महत्व प्राप्त झाले आहे. त्यांचे समर्थक कुणाला पाडणार आणि कुणाला निवडून आणणार हे 23 तारखेला स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांमुळे महाविकास आघाडीला विजय मिळाल्याचा आरोप महायुतीने केला होता. विधानसभेतही व्होट जिहादचा प्रकार सुरू असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यावर भाजपने धर्मयुध्दाचा नारा देत हिंदू मतदारांना साद घातली आहे. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे नारे भाजपने दिले आहेत. त्यामुळे हा फॅक्टरही निवडणुकीत महत्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.