नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. यातच आता विधानसभा अध्यक्ष निवडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आले आहे. या पदासाठी संग्राम थोपटे (Sangram Thopte), सुरेश वरपुडकर (Suresh Warpudkar) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या नावांवर काँग्रेस हाय कमांडकडून विचार सुरू आहे. यातील एका नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीची कारवाई म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे. राज्यातील तापलेल्या वातावरणात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष निवड करण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रदेश प्रभारी एच. के.पाटील हे दिल्लीत दाखल झाले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचे समजते. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत महाराष्ट्रातील नेत्यांची या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे कळते.
विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर ही नावे काँग्रेस अध्यक्षांकडे पाठविण्यात आली आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत ठाण मांडून असल्याचे समजते. पुणे जिल्ह्यात काँग्रेसकडे एकही प्रभावी पद नसल्याने संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यास पुणे जिल्ह्यात सकारात्मक संदेश जाईल, असा काँग्रेसमधील एका गटाचा युक्तिवाद आहे. तर, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांचा गट सुरेश वरपुडकर यांच्या नावासाठी आग्रही आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाणांच्या मार्गात 'जी-23'चा अडसर
ज्येष्ठत्व आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभव या बाजू लक्षात घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांना संधी द्यावी, असे काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. मात्र, काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या जी-२३ गटामध्ये चव्हाण यांचे नाव होते. हीच बाब नेमकी त्यांच्या मार्गात अडसर ठरत आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.