Congress Vs BJP : "काँग्रेसला फोडा..." : बावनकुळेंच्या डोक्यात 'भाजप वाढवायचा' की 'लोकशाही संपवायचा' प्लॅन?

Congress Vs BJP : राज्यात प्रचंड बहुमताचे सरकार असतानाही काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, असे आवाहन खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे करत आहेत.
Chandrashekhar Bawankule 2
Chandrashekhar Bawankule 2Sarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना गावोगावी वणवण फिरून पक्षाचा विस्तार करणारा, सत्ता कधी येणार, याची शाश्वती नसतानाही पक्ष न सोडणारा भाजपचा एखादा कार्यकर्ता तुम्हाला भेटला आहे का? भेटलाच तर नक्की मन मोकळे करील आणि त्यातून त्याची हतबलता समोर येईल. भाजपचा वारू चौफेर उधळू लागला आणि असे बहुतांश जुने, निष्ठावंत कार्यकर्ते, नेते बाजूला पडू लागले. अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे, पक्ष फोडण्याचे पक्षश्रेष्ठींचे निर्णय असे कार्यकर्ते सहजासहजी स्वीकारत नाहीत, त्या निर्णयांना योग्य ठरवत नाहीत.

भाजप हा 'केडर बेस' असलेला पक्ष समजला जातो. घरावर तुळशीपत्र ठेवून पक्षाचा विस्तार केलेले कार्यकर्ते गावोगावी आहेत. असे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना खूप मानसन्मान मिळतो. मात्र आता हा भूतकाळ झाल्याचे दिसत आहे. भाजपला अशा कार्यकर्त्यांची गरज आजही आहे, असे कार्यकर्ते पक्षाचा मूळ आधार आहेत, मात्र पक्षाला आता त्यांची चिंता राहिल्याचे दिसत नाही, कारण गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे. विरोधकही सोबत आले आहेत. त्यामुळे आहेत ते विरोधक अत्यंत कमकुवत झाले आहेत. परिणामी, भाजप नेत्यांच्या भाषेला अहंकाराचा दर्प चढला आहे. राज्यात प्रचंड बहुमताचे सरकार असतानाही काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, असे आवाहन खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे करत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना हे आवाहन केले आहे. भाजपला लोकशाही मान्य नाही, त्यामुळे त्यांना देशात विरोधक नको आहेत, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. बावनकुळे यांचे ताजे वक्तव्य विरोधकांचा हा आरोप खरा ठरवणारे आहेत. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. एकटा भाजप बहुमताच्या जवळ गेला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपच्या सोबत आहे. त्यामुळे सरकारच्या किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे. हे सर्व करण्यासाठी भाजपने काय काय केले, हे लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. असे असतानाही महायुतीला बहुमत मिळाले, लोकांची पसंती मिळाली. त्यामुळे विरोधी पक्ष सोबत घेण्यासाठी भाजपने काय काय केले, हा विषय मागे पडला.

Chandrashekhar Bawankule 2
Congress Vs BJP : सुरेशभाऊंचा गौप्यस्फोट... खुलासा देता-देता मिरज काँग्रेस शहराध्यक्षांच्या नाकीनऊ

विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहता फोडाफोडीला लोकांची मान्यता मिळाली, असा भाजप नेत्यांचा समज होणे साहजिक होते. त्यामुळे ते त्यातून बाहेर पडलेच नाहीत. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची सत्तेत आल्यानंतर पूर्तता करायची असते. लोकांचे जीवनमान उंचावेल, यासाठी प्रयत्न करायचे असतात. शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व वर्गांचे प्रश्न सोडवायचे असतात, याचा विसरच जणू भाजपला आणि मित्रपक्षांना पडला आहे. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा लेखाजोखा जाहीर करून महायुतीने स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. ती किती निरर्थक आहे, हे बावनकुळेंच्या विधानाने दाखवून दिले आहे.

भाजपकडून काँग्रेसवर सातत्याने टीका केली जाते. त्यासाठी अनेक मुद्द्यांचा वापर केला जातो. काँग्रेसने भ्रष्टाचार केला, हा सर्वात मोठा मुद्दा. काँग्रेसने एका विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन केले, हा दुसरा सर्वात मोठा मुद्दा. भाजपच्या लेखी काँग्रेस वाईट असेल तर त्या पक्षाचे नेते चांगले कसे, असा प्रश्न निर्माण होतो, मात्र भाजप नेते अशा प्रश्नांची तमा बाळगत नाहीत. भाजपच्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे ते व्यथित होतात. मात्र या कार्यकर्त्यांचे सध्या कुणीही ऐकून घेत नाही, अशी परिस्थिती आहे.

Chandrashekhar Bawankule 2
Jalgaon ex MLA Joins BJP: जळगाव जिल्ह्यातील 'या' माजी आमदाराला जायचंय भाजपात, त्यासाठी अजित पवारांकडेही जाणं टाळलं

कोणताही पक्ष संपत नसतो की विचारधाराही संपत नसते. चढ-उतार येऊ शकतात. पक्ष संपवण्याची भाषा सत्तेच्या उन्मत्तपणातून येत असते. लोकांनी सत्ता विकासकामांसाठी दिली आहे, लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी दिली आहे, याचा विसर पडावा इतका अहंकार बावनकुळे यांच्या अंगी भिनलेला दिसत आहे. विरोधकच अस्तित्वात नाही राहिले तर लोकशाही कशी टिकणार, लोकांचे प्रश्न कोण मांडणार, असा प्रश्न समाजाला पडू नये याची तरतूदही भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून केली जात आहे. फोडाफोडीला पूर्णविराम मिळेल, अशी शक्यता होती, मात्र भाजप तसे होऊ देणार नाही, याचे संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत. भाजपला खरेच लोकशाही मान्य नाही का? याचे उत्तरही त्यांनी एकदाचे देऊन टाकायला हवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com