
Congress Party Strengthening: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील (दोघांचेही टोपण नाव बंटी) यांनी सद्भावना पदयात्रा काढली अन् शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केले.
या आंदोलनामुळे महाराष्ट्रात काँग्रेस शिल्लक असल्याचा संदेश जनमानसात गेला. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जनमानसात काँग्रेस रुजत असताना नाना पटोलेंना ‘शॉर्टकट’ने सत्ता मिळविण्याचा मोह होत आहे.
राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार सत्तेवर आल्यापासून मस्साजोगचे (ता. केज, जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण सातत्याने गाजत आहे. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हे खलनायक होते, तर भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर विरोधकांनी भूमिका बजावून हिरो झाले. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस मात्र कुठेच दिसली नाही. त्यामुळे या प्रकरणात ना काँग्रेसची चर्चा झाली, ना काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील बीडचा हा केंद्रबिंदू ओळखून प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मस्साजोग येथून काँग्रेसची (Congress) सद्भावना पदयात्रा काढली. या पदयात्रेमुळे काँग्रेसमधील मूळ विचारांचे आणि सेवादलाचे महत्त्व प्रखरतेने दिसले. बीडच्या समाजकारणात आणि राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भगवानगड व नारायणगड या दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भेट दिल्याने बीडच्या राजकारणात सामाजिक सलोख्याचा नवा विचार त्यांनी मांडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा चर्चेत आला आहे. नागपूर ते रत्नागिरी महामार्ग ओस पडलेला असताना ‘शक्तिपीठ’चा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. ‘शक्तिपीठ’च्या विरोधाचा ‘कोल्हापूर फॉर्म्युला’ इतर बाधित १२ जिल्ह्यांसाठी लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या एकीला बळ मिळत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी सतेज पाटील यांच्या पुढाकारातून मुंबईतील आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्यात आला. ‘शक्तिपीठ’च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या जनमानसात पुन्हा एकदा रुजण्याचा महामार्गच काँग्रेस, महाविकास आघाडी तयार करताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मित्रपक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या आक्षेपामुळे या चर्चेत बाळासाहेब थोरात यांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्षेपामुळे त्यावेळी काँग्रेसला आणि नाना पटोले यांना दोन पावले मागे घ्यावी लागली होती. आता प्रदेशाध्यक्षांच्या व मित्रपक्षांच्या परवानगीशिवाय नाना पटोलेंनी राज्यातील सत्तेच्या ‘फॉर्म्युल्या’चा नवा प्रस्ताव दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव देऊन पुन्हा एकदा नाना पटोले हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नजरेत नक्कीच आले असतील.
प्रदेशाध्यक्षपदी सपकाळ यांना संधी देऊन दिल्ली काँग्रेसने महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना जोरदार झटका दिला. या झटक्याची तीव्रता कमी होण्यापूर्वीच विधानसभेत उपनेतेपदी अमिन पटेल, मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख, सचिवपदी विश्वजित कदम, प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांना संधी मिळाली.
विधानपरिषदेत गटनेतेपदी सतेज पाटील, मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी व प्रतोदपदी राजेश राठोड यांना संधी मिळाली. महाराष्ट्रात नवनिर्माण करताना काँग्रेसने जुन्यांना विश्रांती अन् नव्यांना संधी दिल्याचे दिसत आहे. आगामी काळात जिल्हाध्यक्ष निवडीतही हा संदेश अधिक प्रभावीपणे दिला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमधील दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचल्याचे दिसते. ज्यांच्याकडे ना पैसा आहे ना ‘ग्लॅमर’ आहे, असे सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाले. सत्ता नसताना पक्षासाठी पदरमोड करायची कोणी? आणि कशासाठी? हा मोठा प्रश्न आता डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज दांडी मारताना दिसत आहेत.
त्याचा प्रत्यय सद् भावना पदयात्रा, ‘शक्तिपीठ’च्या विरोधातील आंदोलनात दिसला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वरिष्ठांच्या दौऱ्यात दिसणारे नेते आंदोलनात का दिसत नाहीत?, असा प्रश्न आंदोलने आणि त्यानंतरच्या राहुल गांधींच्या दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.