
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिका आहेत. अंबरनाथ, बदलापूर या दोन नगरपालिका आहेत. पालघर जिल्ह्यात वसई-विरार महापालिका,. रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका येते. त्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील संभाव्य राजकीय स्थितीचा आढावा...
ठाणे जिल्ह्यात महायुतीतील संबंध कमालीचे ताणले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरोधात उतरण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका २०२० पासून रखडल्या आहेत. या निवडणुका महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्यावर विरोध दिसत आहे.
शिंदेंची शिवसेना आणि भाजपने शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व काँग्रेस, मनसेतील मंडळींना गळाला लावण्याची चढाओढ सुरू केली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसते. शिंदेंना त्यांच्याच घरच्या मैदानावर घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्याची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईकांवर सोपविल्याची चर्चा होती. त्यामुळे ‘भाई’ विरुद्ध ‘दादा’ असा कलगीतुराही रंगला.
नाईक यांच्या जनता दरबाराने शिंदे गटाची झोप उडवली. त्याला प्रतिउत्तराचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला, पण फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पक्षप्रवेशांचा धडका लावत शिंदे गटाने आपली ताकदवाढीस सुरुवात केली आहे. पण भाजपनेही शांततेत आपले ‘ऑपरेशन’ सुरू केल्याची चर्चा आहे. त्यासाठी संघाची मोठी फळी कामालाही लागली आहे. सध्या तीन-चार माजी नगरसेवक सोडले, तर सर्वजण शिंदे गटासोबत गेले. आमच्याकडे ७८ माजी नगरसेवकांची कुमक असल्याचा दावा शिंदे गट करीत आहे. त्यातही ‘मिशन कळवा’ फत्ते झाल्याने अधिक बळ मिळाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची अखेरची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. शिवसेना-भाजप युती तुटून जेमतेम वर्ष झाले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत सर्वप्रथम शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत रंगली. सत्तेच्या जोरावर कामे होत नसल्याचा आरोप करीत त्यावेळी प्रथमच मंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंनी भर सभेत तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत १२२ पैकी शिवसेनेचे सर्वाधिक ५३ नगरसेवक निवडून आले, पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना भाजपशी युती करावी लागली. वास्तविक कल्याण-डोंबिवलीच्या काही भागामध्ये भाजपची ताकद आहे. रवींद्र चव्हाण यांचा कल्याण-डोंबिवलीत दबदबा असला, तरी त्यांनी शिवसेनेसोबत आपले सूर जुळवून ठेवले होते. पण डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार झाल्यानंतर परिस्थिती बिघडली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्यातील तणाव दिसला. त्याची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाने पोकळ केले आहे. मनसे झगडत आहे. ‘राष्ट्रवादी’चे दोन्ही गट आणि काँग्रेस कोमात आहेत.
पालघर जिल्ह्यात वसई-विरार महापालिकेवर महायुतीचे वर्चस्व निर्माण होत असल्याचे दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभेवेळी महायुतीने बाजी मारली. वसईत स्नेहा दुबे-पंडित, नालासोपाऱ्यात राजन नाईक आणि बोईसरमध्ये विलास तरे विजयी झाले.भाईंदरमध्ये भाजपचे नरेंद्र मेहता व शिंदे गटाचे प्रताप सरनाईकांनी बाजी मारल्याने येथेही सत्तेत असलेल्या सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत.
विकासकामे करण्यासाठी राज्य अन् केंद्रातून योजना, प्रकल्प येऊ लागले आहेत. त्यामुळे महायुतीच्या भाजप आणि शिंदे गटाची ताकद वाढत आहे. वसई-विरार शहर महापालिका व मीरा भाईंदर महापालिकेसाठी पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यात गणेश नाईक, तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजप अन् शिंदे गटात वर्चस्वाची लढाई होणार आहे.
अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषदेचे रुपांतरण पालिकेत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आहे. त्याला आव्हान देत भाजपने आपले बळ वाढवले आहे. पण या दोन्ही पक्षांत येथे विस्तव जात नसल्याचे दिसते. शिवसेना ठाकरे गट, ‘राष्ट्रवादी’चे दोन्ही गट काही अंशी सक्रिय आहेत. पण मतांचे परिवर्तन ते कसे करतात हे लक्षवेधी असणार आहे.
पनवेल महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वात भाजपची विजयी झाला. २०२२ पासून पनवेल पालिकेवर प्रशासकराज आहे. सध्या भाजप मजबूत स्थितीत आहे.
त्यातच जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र व माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपमध्ये येणार असल्याने महायुतीचे पारडे जड आहे. याउलट शेतकरी कामगार पक्षाची प्रचंड पीछेहाट झाली आहे. शिवसेना ठाकरे गट, ‘राष्ट्रवादी’ (शरदचंद्र पवार) काँग्रेसची ताकद नगण्य आहे.
उल्हासनगरचे राजकारण नेहमीच बेभरवशाचे राहिले आहे. सिंधी समाजाचे वर्चस्व असलेल्या या शहरात कधीच एका पक्षाची सलग सत्ता आली नाही. कलानी कुटुंबाभोवती येथील राजकारण फिरत राहिले. शिवसेना- भाजपने येथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला, पण येथील स्थानिक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळवणे कठीण आहे.
२०१७ च्या निवडणुकीत ७८ जागांपैकी सर्वाधिक ३२ नगरसेवक भाजपचे निवडून आलेे. शिवसेनेचे २५, तर साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. साई पक्षासह भाजपने प्रथमच उल्हासनगर पालिकेवर सत्ता मिळवत त्यांच्या पहिल्या महापौर मीना आयलानी झाल्या. पण पुढे साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी वगळून सर्व नगरसेवक भाजपमध्ये गेले. आता शिवसेना अन् राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्यांचाही प्रभाव उरला नाही.
काँग्रेसकडे २०१९ च्या भिवंडी- निजामपूर महापौर निवडणुकीत सर्वाधिक ४७ जागा असूनही केवळ गटबाजीमुळे भिवंडी- निजामपूर महापालिकेवर भाजप पुरस्कृत अपक्ष महापौर विराजमान झाला होता. भिवंडीत काँग्रेसचे वर्चस्व बऱ्यापैकी आहे. मात्र, दिशा नसल्याने सातत्याने पीछेहाट होत आहे. याचा सर्वाधिक फायदा शिंदेंची शिवसेना- भाजपलाच होत आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ९० पैकी ४७ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचे १२, भाजपचे २०, ‘कोणार्क विकास आघाडीचे ४ नगरसेवक निवडून आले होते.
काँग्रेसने शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. भाजप आणि ‘कोणार्क’ सत्तेपासून दूर राहिला. याचा वचपा २०१९ मध्ये महापौर निवडीच्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आला.
भाजपने काँग्रेसमध्ये फूट पाडत आणि अपक्षांच्या मदतीने २०१९ मध्ये सत्ता मिळवली. काँग्रेसच्या फुटीर गटाने अधिकृत उमेदवाराला कौल न देता भाजप पुरस्कृत अपक्ष महापौराला निवडून दिले. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने नंतर ‘१८ बंडखोरांचे सदस्यत्वच नगरविकास विभागामार्फत रद्द ठरवलेे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आशेचा किरण दिसत आहे. तरीही नगरसेवक कोणत्याही पक्षाचे सर्वाधिक निवडून आले तरी घोडेबाजारात कोण जिंकतो यावरच येथील सत्तेचे गणित साकारेल.
नवी मुंबई महापालिकेची यंदा तब्बल दहा वर्षानंतर निवडणूक होईल. वनमंत्री गणेश नाईक ‘राष्ट्रवादी’त असताना २०१५ ते २० दरम्यान नवी मुंबई महापालिकेवर काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ची सत्ता होती, तर शिवसेना हा विरोधी पक्ष होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाच्या तुलनेत शिंदेंची शिवसेना मजबूत आहे. महायुती न झाल्यास नवी मुंबई पालिकेत खरी लढत ही भाजप अन् शिंदेंच्या शिवसेनेत होणार आहे. गणेश नाईक यांना महापालिकेवर सत्ता अबाधित ठेवायची आहे, तर शिंदेंना ठाणे जिल्ह्यात त्यांच्या वर्चस्वासाठी नवी मुंबई महत्त्वाची आहे पण महायुती झाल्यास पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल.
लढाई कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्तेतच असलेल्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वर्चस्वाची लढाई होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेचे ५० गट आठ पंचायत समित्यांचे १०० गण आणि सावंतवाडी, वेंगुर्लेसह मालवण अशा तीन नगर पालिकांसाठी येत्या चार महिन्यात निवडणुका होणार आहेत.
रत्नागिरीतही जिल्हा परिषदेच्या ५५, नऊ पंचायत समित्यांच्या ११० जागांसह चार पालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी लढत होणार आहे. मध्यंतरी कोकणचे सत्ताकारणच बदललल्याने त्याचा प्रभाव दिसेल. महायुतीतील शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी आगामी विधानसभा निवडणुका भाजपतर्फे स्वबळावर लढवल्या जाण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थातील वर्चस्व महत्त्वाचे ठरेल. साहजिकच जास्तीत जास्त जागा मिळवण्याची चढाओढ या दोन पक्षांत असेल. खचलेली ठाकरे शिवसेना यावेळी अस्तित्वाची लढाई लढणार आहे.
(हेमलता वाडकर, वसंत जाधव, शरद वागदरे, प्रसाद जोशी, शिवप्रसाद देसाई)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.