Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ सध्या वेगळ्याच कारणाने गाजत आहे. राजकीय पक्ष किती दुटप्पी भूमिका घेत असतात, याची अनुभूती घ्यायची असेल, तर या मतदारसंघावरून सुरू असलेल्या घडामोडींकडे पाहायला हवे.
देशभक्तीच्या नावाखाली राजकारणाचा, सत्तेचा खेळ सुरू झालेला आहे. निमित्त ठरले आहेत या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक. दाऊदच्या निकटवर्तीयांशी व्यवहार केल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांना कारागृहात जावे लागले होते. त्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते.
युती तुटल्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्ज बाळगल्याच्या संशयावरून एनसीबीने अटक केली होती. ही अटक कशी खोटी आहे, याचे पदर नवाब मलिक दररोज माध्यमांसोर उलगडून दाखवत होते. त्यात भाजपचा सहभाग असल्याचे पुरावेही ते देत होते. त्यामुळे भाजपची देशभरात पुरती नाचक्की झाली होती.
त्यातूनच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेक वर्षांपूर्वी दाऊदच्या निकटवर्तीयांशी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. नवाब मलिक कारागृहातून जामिनावर बाहेर येईपर्यंत मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. शिवसेना फुटली होती, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली होती. मलिकांसोर आता पेच निर्माण झाला होता, तो शरद पवार यांच्यासोबत जायचे की अजितदादा पवार यांच्यासोबत जायचे.
अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे मलिक त्यांच्यासोबत गेले. नागपूर अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना लांबलचक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या नवाब मलिकांनी सत्ताधारी बाकांवर बसू नये, असे फडणवीस यांचे म्हणणे होते. ते पत्र चांगलेच व्हायरल करण्यात आले होते.
आता याच मुद्यावरून मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आहे. असे असतानाही भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या मतदारसंघातून महायुतीतील शिवसेनेनही उमेदवार दिला आहे. शेजारच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे.
सना मलिक यांचा प्रचार करण्यासाठी मात्र आपल्याला काहीही अडचण नाही, असे भाजपने जाहीर केले आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मुस्लिम समाज सध्या भाजपवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचीही तशी धारणा झालेली आहे. मुस्लिम समाज भाजपवर (BJP) नाराज असण्याचे मुख्य कारण आहे आमदार नितेश राणे यांची प्रक्षोभक वक्तव्ये.
भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार केला तर मुस्लिम नाराज होतील आणि मलिकांना मते देणार नाहीत. त्यामुळे भाजपने मलिक यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. मात्र कारण समोर केले आहे ते त्यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या कथित संबंधांचे. मलिकांना उमेदवारी देणारा पक्ष भाजपला महायुतीत चालतो, मग मलिक का चालत नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
नवाब मलिक निवडून आले, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले तर भाजप काय करणार आहे? नवाब मलिक यांचा पाठिंबा घेणार आहे की नाही, काठावरचे बहुमत मिळाले आणि मलिक यांच्या मतामुळे सत्तास्थापनेची संधी मिळाली तर भाजप ती संधी सोडणार आहे का, असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत.
भाजपची ही दुटप्पी भूमिका ठळकपणे दिसून येणारी आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याने अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिल्या. त्यात आता मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या नौटंकीची भर पडली आहे. जामिनावर बाहेर आल्यापासून मलिक यांनी मौन बाळगले होते. आता त्यांनी मौन सोडले आहे.
बोलण्यावर बंदी होती म्हणून मी शांत होतो. मात्र, आता शांत बसणार नाही, असे ते म्हणाले आहेत. माझा उल्लेख कुणी देशद्रोही असा केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार, मानहानीचा दावा दाखल करणार, अशा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.