Kalayan News : कल्याण इथं झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून राजकारणातले अनेक कंगोरे समोर येत आहेत. ही केवळ गोळीबाराची, जागेच्या वादातून घडलेल्या वादाची घटना नाही. या घटनांचा राजकीय कुरघोड्या करण्याचा सत्तेतच एकत्र असलेल्या दिग्गजांचा हेतू समोर येतोय. आगामी काळात लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पटलावर कुणाचा वरचष्मा असायला हवा, याचा सरावच अशा घटनांच्या माध्यमातून केला जातोय. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा सुप्त संघर्ष या पुढे कमी होणार की वाढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कल्याण येथील गोळीबाराच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांना महायुती काही पचनी पडलेली दिसत नाही. उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेने या वादाचा शेवट रक्तरंजित संघर्षात झाला आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत अटक करायला लावून बाजी मारली असली तरी त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी हुकमी एक्का काढत महेश गायकवाड यांच्या विरोधात त्याच दिवशी गुन्हा दाखल केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता या घटनेच्या माध्यमातून भाजप व शिवसेना शिंदे गटातील छुपा संघर्ष समोर आल्याचे दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटीलवर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले. गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गायकवाड यांच्यासह तिन्ही आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
या घटनेनंतर लगेचच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दडपशाहीला कंटाळून हा गोळीबार केल्याचा आरोप कोर्टात केला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन गटातील संघर्ष आणखी तीव्र होणार असे दिसत आहे. सुरुवातीला आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरचढ असल्याचे दाखवले होते. मात्र, या प्रकरणात त्याच दिवशी कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारीख यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर ७० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्यावर आमदार गायकवाड यांच्याकडून आरोप केले जात असल्याने सोमवारीच मंत्रिमंडळाच्या बैठकीपुर्वी शिंदे गटाच्या ७ मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी आमदार गायकवाड यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा गुंडासोबतचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वादाविरोधात यापूर्वी देखील अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या होत्या. हे वास्तव आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कारण दोन्ही पक्षांत समन्वय नाही. कोर्टाबाहेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. जर समर्थनार्थ येणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणार असतील तर कोणतेही कार्यकर्ते येताना घाबरतील. गोळीबारच्या घटनेचे समर्थन करत नाही, पण कार्यकर्त्यावर अन्याय नको, अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतली आहे.
दुसरीकडे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते संधीची वाट पाहात आहेत. शिंदे गट आणि पवार गट यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिसळू शकत नसल्याचे म्हटले जात आहे. दबक्या आवाजात भाजपचे सामान्य कार्यकर्ते आता या युतीबद्दल बोलू लागले आहेत. मंत्री आणि नेत्यांपुढे ते बोलत नसले तरी ही अंतर्गत धुसफूस भाजपला आगामी काळात भारी पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजित पवार यांच्या खासदार, आमदारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोकणातही शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपचा संघर्ष सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. तटकरे यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट देण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे समजते.
(Edited by Sachin Waghmare)