Dharashiv News : सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांत शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत. भूम-परंडा हाही असाच एक मतदारसंघ. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल 81 हजारांचे मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघात सावंत अडचणीत आले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांकडे, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघांकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या भूम-परंडा मतदारसंघाचाही यात समावेश आहे. या मतदारसंघातून 2019 पूर्वी सलग तीनवेळा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांचा सावंत यांनी पराभव केला होता.
शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले आरोग्यमंत्री सावंत हे वादग्रस्त, बेधडक विधानांसाठी ओळखले जातात, हेही त्यांच्या मतदारसंघाकडे लोकांचे लक्ष लागण्याचे आणखी एक कारण आहे. लोकसभा निवडणुकीत सावंत यांना त्यांच्या मतदारांनी जबर दणका दिला. प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर सावंत यांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. राजेनिंबाळकर यांच्या वडिलांवरही सावंत यांनी टीका केली होती. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना फटका बसला आणि भूम -परंडा मतदारसंघातून राजेनिंबाळकर यांना तब्बल 81 हजार मतांची आघाडी मिळाली.
या मताधिक्यामुळे सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे किंवा नाही, याबाबत शंकाच आहे, कारण त्यानंतरही त्यांनी वादग्रस्त विधाने केलीच आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की नाही, यापेक्षा मताधिक्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला मोठा उत्साह सावंत यांना निवडणुकीत नक्कीच जड जाणार, अशी चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांनी वादग्रस्त विधाने केली असली तरी आपल्या विधानसभा मतदारसंघातून राजेनिंबाळकर यांना मिळालेल्या 81 हजार मतांच्या आघाडीचा त्यांनी धसका घेतला आहे, हे नाकारता येत नाही. शिवसेना फुटली त्यावेळी सावंत हे शिंदे गटात गेले.
पालकमंत्री सावंत हे आता मतदारसंघात जास्त वेळ घालवू लागले आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे की शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. राहुल मोटे हे या मतदारसंघातून 2004, 2009 आणि 2014 असे सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यापूर्वी 1995 आणि 1999 असे सलग दोनवेळा ज्ञानेश्वर पाटील विजयी झाले होते. राहुल मोटे यांचे वडील दिवंगत महारुद्र मोटे हे 1985 आणि 1990 असे दोनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले होते. शिवसेनेने ज्या काही सामान्य तरुणांना आमदार केले, त्यात ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश आहे. आमदार होण्यापूर्वी ते जीपचालक होते. उरनिर्वाहासाठी परंडा-ते बार्शी अशी आपल्या जीपमधून ते प्रवासी वाहतूक करायचे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांना विदर्भातून विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. ते उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे समजले जायचे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे सावंत हे ठाकरे यांच्यावर नाराज झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, असे सांगितले जाते.
सावंत यांना 2019 च्या निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेची उमेदवारी दिली होती, मात्र सावंतांच्या विरोधात शरद पवार यांचे निकटवर्तीय राहुल मोटे उभे होते. सोडून गेलेल्या आमदारांना पर्याय शोधण्याचे काम शरद पवार यांनी आधीच सुरू केले आहे. उद्धव ठाकरे याबाबतीत अद्यापही शांतच आहेत. राहुले मोटे हे शरद पवार यांचे नातेवाईक असल्यामुळे या मतदारसंघाबाबत ठाकरे कदाचित शांत असतील.
राहुल मोटे यांना राजकीय वारसा आहे. ते पवार कुंटुंबियांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे त्यांचे मामा आहेत. शांत, संयमी, मृदूभाषी तरुण नेता अशी त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यभरात यात्रा काढण्यात आली होती. धाराशिव जिल्ह्यात ती यात्रा तुळजापूर आणि भूम-परंडा या दोन मतदारसंघांतून गेली. त्यामुळे भूम-परंडा मतदारसंघातून राहुल मोटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, सावंत यांनी मतदारसंघातील विविध पक्षांच्या नेत्यांना आपल्याकडे खेचले आहे. आपापल्या भागात प्रभावशाली असलेल्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातून सावंत यांना जबर धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत सावंत यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली होती. निवडणुकीनंतरही त्यांनी काही वादग्रस्त विधाने केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसून बाहेर आल्यानंतर उलटी होते, असे ते म्हणाले होते. प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याची त्यांनी औकात काढली होती. राहुल मोटे हे अजितदादांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत, हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.
सावंत यांनी 2019 च्या निवडणुकीत राहुल मोटे यांचा 32 हजार 902 मतांनी पराभव केला होता. त्याच्या पाच वर्षांनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावंत यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या विरोधी उमेदवाराला 81 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. तरीही वादग्रस्त वक्तव्यांची त्यांची मालिका बंद झालेली नाही. त्यांनी मतदारांना गृहीत धरलेले आहे, असे चित्र दिसत आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांसह त्यांनी मित्रपक्षांतील नेत्यांनाही आपल्या वक्तव्यांद्वारे नाराज केले आहे.
सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार, हे ठरले की चित्र आणखी स्पष्ट होईल. मतदारसंघाचा मूड काय आहे, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. तो मूड विधानसभेपर्यंत कायम राहील का, हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी मोटे किंवा पाटील या दोघांपैकी एकालाच मिळेल, हे निश्चित मानले जात आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या सावंत यांना शरद पवार गटाचे शांत, मृदूभाषी राहुल मोटे की शिवसेनेच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले ज्ञानेश्वर पाटील भिडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.