

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. गेहलोत यांच्या समर्थक आमदाराने पायलट यांना उपरे ठरवले आहे. यातून राज्यात स्थानिक विरुद्ध बाहेरील असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.
गेहलोत यांचे समर्थक असलेले अपक्ष आमदार राकेश मीना यांनी काही दिवसांपूर्वी पायलट यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला होता. आता त्यांनी पायलट यांना राज्याबाहेरील ठरवले आहे. ते म्हणाले की, पायलट हे राज्यातील नाहीत. ते बाहेरुन आलेले आहेत. जातीय संघर्ष निर्माण करुन राज्यातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना भाजपनेच फूस लावली आहे.
पायलट यांच्या पाठिंब्यावरच गुज्जरांनी 2006 मध्ये पंचना धरणाचे पाणी रोखले होते. यामुळे मीना समाजाला पाणी मिळत नव्हते. आपले स्थानिक नेते मेले आहेत की काय म्हणून तुम्हाला पायलट यांच्यासारखा बाहेरचा मुख्यमंत्री हवा आहे. काँग्रेसच्या हाय कमांडला गुज्जर मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असेल तर त्या समाजातील नेत्यांची राजस्थानमध्ये कमतरता नाही. जितेंद्र सिंह, अशोक चांदना आणि शकुंतला रावत हे काँग्रेसचे बडे नेते गुज्जर समाजातीलच आहेत. पायलट हे राजस्थानमध्ये थांबून काँग्रेसचे नुकसान करीत आहेत.
राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षी पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य न केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.