
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा सत्ताधारी आमदार, अशी प्रतिमा सुरेश धस यांची निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजपचे आमदार धस यांनी मस्साजोगचे (ता. केज. जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात रान पेटवले आहे. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रकरणही आमदार धस यांनी उचलले, मात्र कारवाई कोणावर करावी, याबाबत ते स्पष्ट बोलत नव्हते. आता तर त्या प्रकरणात पोलिसांना माफ करा, अशी विनवणी धस यांनी केल्याचा गंभीर आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. धस उघडे पडले आहेत का, असा प्रश्न आहे.
परभणीत 10 डिसेंबर 2024 रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली होती. राज्यभरात त्याचा निषेध करण्यात आला. परभणीतही निदर्शने करण्यात आली. वाहनांची जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. रोज एक प्रकरण बाहेर काढत त्यांनी मुंडे यांची कोंडी केली. संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीने खून करण्यात आला, ते पाहता आमदार धस यांची भूमिका अत्यंत योग्य होती. त्याला राज्यभरातून पाठिंबा मिळाला. सत्ताधारी आमदार असूनही घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक झाले. संतोष देशमुख यांच्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळावा, अशी भूमिका धस यांनी घेतली, मात्र या दोन्ही भूमिकांमध्ये कमालीचा फरक आहे.
न्यायालयीन कोठडीतील मृत्यूसाठी थेट सरकारला, गृहमंत्र्यांना जबाबदार धरले जाते. आमदार धस यांनी याबाबत ब्र ही काढला नाही. सोमनाथ यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका ते मांडत राहिले. संतोष देशमुख यांच्याबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे इतके कौतुक झाले की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात ते कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहेत, हे अनेक लोकांच्या लक्षात आलेच नाही. आता मात्र ते स्वतःच उघडे पडले आहेत.
धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होत आहे, असे धस यांचे म्हणणे आहे. ते खरेही आहे, असे मान्य केले तर मग सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी कोणाचा राजीनामा घ्यायचा, कोणाची बदनामी होत आहे, याबाबत आमदार धस काहीही बोलत नाहीत. सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धस हे रात्री अडीचच्या सुमारास आमच्या घरी आले. मन मोठे करून पोलिसांना माफ करा, असे ते म्हणाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तसे पाहिले तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदा सभागृहात मांडले. या प्रकरणातील संशयितांची नावे त्यांनी पहिल्यांदा घेतली. मात्र सुरेश धस यांचे कौतुक अधिक झाले. सत्ताधारी भाजपचे आमदार असूनही त्यांनी घेतलेली भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरली. सोमनाथ यांच्या कुटुंबीयांच्या आरोपानंतर आव्हाड यांनी धस यांच्यावर जहाल टीका केली आहे. धस यांनी संन्यास घ्यावा, वाल्मिक कराड यालाही माफ करावे, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.
आव्हाड यांच्या या जिव्हारी लागणाऱ्या टीकेला उत्तर देताना धस यांनी गडबड केली. अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या आव्हाडांनी मला शिकवू नये, असे ते म्हणाले. बदलापूर येथील एका शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलिसांना एन्काऊंटर केला आहे. संस्थाचालकांना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर करण्यात आला, असा आरोप आव्हाड आणि अन्य विरोधक करत आहेत. या सर्वांनी अक्षय शिंदे याची बाजू कधीही घेतलेली नाही. संबंधित शाळेचे पदाधिकारी भाजपशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला, असा विरोधकांचा आरोप आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केलेला आरोप पाहता, आमदार धस यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोमनाथ यांच्या कोठडीतील मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा तर त्यांचा प्रयत्न नाही ना?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण, याबाबतही ते बोललेले नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना निष्प्रभ करण्यासाठी तर आमदार धस मैदानात उतरले नाहीत ना?, असा प्रश्न आधीही उपस्थित झाला होता, आता त्याची तीव्रता वाढली आहे.
संतोष देशमुख यांच्या अमानुष खुनाबद्दल आमदार धस यांनी जसा आवाज उठवला तसा आवाज त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल उठवला नाही. कारणे स्पष्ट आहेत. देशमुख हत्याप्रकरणात आवाज उठवल्याने आमदार धस यांच्या पक्षाचे म्हणजे भाजपचे काहीही नुकसान होणार नव्हते. सोमनाथ यांच्या प्रकरणाची झळ मात्र भाजपला बसणार आहे. त्यामुळेच सोमनाथ यांचे कुटुंबीय दावा करतात, त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पोलिसांना माफ करण्याची विनवणी केली असणार. आमदार धस एक्स्पोज झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना योग्यवेळी ट्रॅपमध्ये अडकवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.