MNS Politics : 13 वरून 1 आमदार; 'मनसे'चं इंजिन यंदा किती डबे जोडणार?

Raj Thackeray News: राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा 18 वर्षांची झाली. या काळात पक्ष वाढण्याऐवजी तो उताराला का लागला? असं काय घडलं की, एकेक करत निष्ठावान मनसैनिक राज ठाकरेंना सोडून गेला?
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Politics : अगदी सुरुवातीला स्वबळावर लढून पाहिलं, दखल घेण्याजोगं यशही मिळालं पण मग युतीसोबत आणि त्यानंतर आघाडीसोबत जाऊन पाहिलं; पण पदरी अपयश आलं... आता मात्र 'मनसे'चं इंजिन पुन्हा एकदा विधानसभेच्या रूळावरून स्वबळावर धावायला यार्डात सज्ज आहे.

2009 मध्ये 13 आमदार निवडून आणलेल्या मनसेला आपल्या इंजिनाला 2014 आणि 2019 मध्ये प्रत्येकी एकच डबा जोडता आला होता. यंदा काय होणार?, असा प्रश्न पडतो आहे.

दोघांचं निधन, आठ सोडून गेले

2005 साली शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' आणि पुढल्याच वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना. 2006 ते 2009 या तीन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत 'संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया' अशी साद राज ठाकरेंनी जनतेला घातली आणि 2009 मध्ये पक्षानं लढवलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 शिलेदार आमदार बनले.

नंतर मात्र पक्ष उताराला लागला आणि आमदारांची संख्या 13 वरून 01 वर आली. 'त्या' 13 आमदारांपैकी 02 जणांचं निधन झालं, तर 08 जणांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. आता उरले 03 जण, जे आजही राज ठाकरेंसोबत आहेत.

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा 18 वर्षांची झाली. 2009 ते 2014 या 18 वर्षांच्या काळात पक्ष वाढण्याऐवजी तो उताराला का लागला? असं काय घडलं की, एकेक करत निष्ठावान मनसैनिक राज ठाकरेंना सोडून गेला?

Raj Thackeray
Jitendra Awhad : 'सुपारी ठाकरे' उल्लेख करत आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचले, म्हणाले, 'क्लिपमधील तो आवाज...'

'त्या' 13 आमदारांचं पुढं काय झालं?

2009 मध्ये मनसेचे 13 उमेदवार आमदार बनले. रमेश पाटील (कल्याण ग्रामीण), नितीन सरदेसाई (माहीम), वसंत गीते (नाशिक मध्य), बाळा नांदगावकर (शिवडी), मंगेश सांगळे (विक्रोळी), प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम), प्रवीण दरेकर (मागाठणे), शिशिर शिंदे (भांडुप पश्चिम), नितीन भोसले (नाशिक पश्चिम), रमेश वांजळे (खडकवासला), उत्तमराव ढिकले (नाशिक पूर्व), राम कदम (घाटकोपर पश्चिम) आणि हर्षवर्धन जाधव (कन्नड).

निवडून आलेल्या या 13 आमदारांपैकी 02 जणांचं म्हणजे खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे आणि नाशिक पूर्वचे आमदार उत्तमराव ढिकले यांचं निधन झालं. उरलेल्या 11 जणांपैकी घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव या दोघांनी पक्ष सोडला. आता उरले 09 जण; त्या 09 जणांचं पुढं काय झालं?

'ते' 09 उमेदवार आमदार बनले नाहीत!

राज ठाकरेंनी आपल्यासोबत राहिलेल्या 'त्या' सर्व 09 जणांना पुन्हा एकदा तिकीट देऊन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उतरवलं. मात्र, या 09 पैकी एकही आमदार निवडून आला नाही. रमेश पाटील (कल्याण ग्रामीण), नितीन सरदेसाई (माहीम), वसंत गीते (नाशिक मध्य), बाळा नांदगावकर (शिवडी) आणि मंगेश सांगळे (विक्रोळी) हे 05 जण दुसऱ्या क्रमांकावर तर प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम), प्रवीण दरेकर (मागाठणे), शिशिर शिंदे (भांडुप पश्चिम) हे 03 जण तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

नाशिक पश्चिममधून पुन्हा उभे राहिलेले नितीन भोसले तर थेट सहाव्या क्रमांकावर जाऊन पडले. या निवडणुकीत मात्र जुन्नरमधून शरद सोनवणे हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले ही त्यातल्या त्यात जमेची बाजू!

02 उमेदवार पण पदरी पुन्हा हार!

2014 च्या निवडणुकीनंतर रमेश पाटील, वसंत गीते, मंगेश सांगळे, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. आता राज ठाकरेंसोबत 'त्या' 09 जणांपैकी 04 शिलेदार उरले. त्यातले बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी निवडणूक लढवली नाही.

आता उरलेल्या दोघांना म्हणजे प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम) आणि नितीन भोसले (नाशिक मध्य) यांना मनसेनं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उतरवलं.

मात्र, हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. प्रकाश भोईर आणि नितीन भोसले हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत मात्र कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले ही या निवडणुकीतली मनसेची जमेची बाजू!

Raj Thackeray
MVA Meeting : 'मविआ'च्या बैठकीत चर्चा; मुंबईतील 16 जागांवर तीन पक्षांत तिढा

3 जण आजही राज ठाकरेंच्या सोबत

सलग तीन वेळा मनसेकडून निवडणूक लढलेले नाशिकचे नितीन भोसले यांनी 2023 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळं 'त्या' एकूण 13 जणांपैकी केवळ 03 जण आजही राज ठाकरेंसोबत आहेत. बाळा नांदगावकर, प्रकाश भोईर आणि आणि नितीन सरदेसाई.

का घसरला मतांचा टक्का?

राज ठाकरे यांनी आजवर आपल्या वाक्चातुर्याच्या जोरावर अनेक सभा गाजवल्या. 2009 च्या निवडणुकीत सभांच्या जोरावर आपल्या पक्षाचे 13 उमेदवारही निवडून आणले. 2009 मध्ये मनसेने 143 उमेदवार उभे करून 25 लाख 85 हजार 597 इतकी मतं मिळवली.

त्यावेळी पक्षाच्या मतांची टक्केवारी होती 5.7% त्यानंतर 2014 मध्ये 219 उमेदवार उभे केले पण या निवडणुकीत मतंही कमी झाली आणि मतांची टक्केवारीसुद्धा! 2014 मध्ये मनसेनं 16 लाख 65 हजार 033 इतकी मतं मिळवली, तर पक्षाच्या मतांची टक्केवारी होती 3.2% त्यानंतर 2019 मध्ये 101 उमेदवार उभे केले पण या निवडणुकीत 2014 च्या तुलनेत मतांची एकूण संख्या आणखी कमी होत मतांची टक्केवारी देखील घसरली.

2019 मध्ये मनसेनं 12 लाख 42 हजार 135 इतकी मतं मिळवली, तर पक्षाच्या मतांची टक्केवारी होती 2.3% अगदी अलिकडं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी इतर पक्षीय उमेदवारांसाठी सभा घेऊन त्यांना जिंकून आणण्यात मोलाचा वाटा उचलला पण आता नुसत्या सभा, भाषणांच्या जोरावर मतं मिळवता येत नाहीत हे कळून चुकलेल्या राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर आपले दौरे सुरू केले आहेत.

2024 च्या निवडणुकीत मनसे ना युती ना आघाडी; तर स्वबळावर 225 ते 250 जागा लढवणार, अशी घोषणा करत राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. मराठवाडा दौरा आटोपून ते आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

एकूणच काय तर 'मनसे'चं इंजिन पुन्हा एकदा विधानसभेच्या रूळावरून स्वबळावर धावायला यार्डात सज्ज आहे. 2009 मध्ये 13 आमदार निवडून आणलेल्या मनसेला आपल्या इंजिनाला 2014 आणि 2019 मध्ये प्रत्येकी एकच डबा जोडता आला होता. यंदा काय होणार? 'मनसे'च्या इंजिनाला किती डबे लागणार? महाराष्ट्रात मनसे 'राज' येणार?

(Edited By Roshan More)

Raj Thackeray
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी काँग्रेस अन् नॅशनल कॉन्फरन्सचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com