
थोडक्यात बातमी काय आहे?
मोहन भागवत यांच्या "75 वर्षांनंतर निवृत्ती" या विधानाने खळबळ उडाली असून ते नरेंद्र मोदी यांच्याकडे अंगुली निर्देशन करत असल्याचा अंदाज व्यक्त होतो.
संघाने वयोमर्यादेचे तत्त्व पाळले असले तरी भाजपमध्ये असा कोणताही अधिकृत नियम नाही, आणि अनेक ज्येष्ठ नेते अपवाद म्हणून कार्यरत राहिले आहेत.
नरेंद्र मोदी यांची सध्याची राजकीय ताकद पाहता त्यांच्याविरुद्ध नेतृत्व बदलाची शक्यता कमी असून 2029 मध्येही तेच उमेदवार असतील, असा अंदाज आहे.
"जे नेते 75 वर्षांचे झाले आहेत, त्यांनी निवृत्तीचा विचार करावा आणि तरुण सहकाऱ्यांना जबाबदारी सोपवावी," राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हे विधान खळबळजनक होते का? तर नक्कीच होते. बर, हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून होते का? तर हो म्हणता येऊ शकते. कारण येत्या 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. अशात भागवत यांनी मराठीतून सुरू असलेले भाषण थांबवून हे विधान हिंदीत केले. त्यामुळे देशभरात हे वक्तव्य पोहोचावे या उद्देशानेच त्यांनी ते केले होते.
2005 मध्ये ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांची मुलाखत घेतली होती. दोन भागांत प्रसारित झालेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी, अटल बिहारी वाजपेयी (वय 80) आणि लालकृष्ण अडवानी (वय 77) यांनी बाजूला व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे सांगितले होते. त्यांनी वाजपेयींचे जावई आणि निकटवर्तीय ब्रजेश मिश्र यांच्यावरही ताशेरे ओढले होते. जेव्हा त्यांना वाजपेयींच्याच 'ना थकणार ना थांबणार' या विधानाची आठवण करून दिली, तेव्हा त्यांनी अधिक तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली.
त्यावेळीपर्यंत तरी वाजपेयी आणि अडवानी भाजपमध्ये प्रभावी आणि आदरणीय होते. शिवाय त्यांच्या जागी कोणी तत्काळ पर्याय नव्हता. त्यामुळे सुदर्शन यांच्या वक्तव्यावर टीका झाली, पण फक्त कुजबूज स्वरूपात. काहींनी सुदर्शनजींच्या वयामुळे त्यांच्या विचारशक्तीवर परिणाम होऊन त्यांनी असे विधान केल्याची शक्यता मांडली. पण वस्तुस्थिती वेगळी होती. भाजप-संघाच्या दृष्टिकोनातून सुदर्शन यांची चूक होती, तर ती केवळ वेळेच्या बाबतीत होती. पक्ष नुकताच निवडणुकीत पराभूत झाला होता आणि अशा वेळी नेतृत्वाबाबतचा संघर्ष अनावश्यक ठरला असता. पण त्यांनी जे विचार मांडले, ते कालांतराने खरे ठरले.
सुदर्शन यांच्या त्या वक्तव्यामुळे भाजपमध्ये पुढील नेतृत्वाचा पाया रचला गेला. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी हे चेहरे राष्ट्रीय पातळीवर पुढे आले. वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान, रमण सिंह असे तरुण मुख्यमंत्री नेमले गेले. 2002 मध्ये वेंकय्या नायडू 53 व्या वर्षी अध्यक्ष झाले. 2005 मध्ये राजनाथ सिंह 54 व्या वर्षी, नंतर 2009 मध्ये नितीन गडकरी 48 व्या वर्षी अध्यक्ष झाले. 2014 नंतर अमित शहा 49 व्या वर्षी, जे. पी. नड्डा 59 व्या वर्षी अध्यक्ष झाले.
योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत, पुष्कर सिंह धामी, भजनलाल शर्मा, मोहन यादव, विष्णुदेव साय, हिमंता बिस्व सरमा, रेखा गुप्ता हे तरुण चेहरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या मुख्यमंत्र्यांचे शपथविधीवेळी 51 हे सरासरी वय होते.
भाजपचा वैचारिक मार्गदर्शक असलेल्या संघानेही स्वतःच्या तत्त्वांचे प्रामाणिकपणे पालन केले आहे. आजवर कोणताही सरसंघचालक 78 वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहिलेला नाही. बाळासाहेब देवरस (1994), राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भैय्या (2000), सुदर्शन (2009) या सर्वांनी वयाच्या 78 च्या आतच पद सोडले. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि मा. स. गोळवलकर यांचे निधन अनुक्रमे 51 व 67 व्या वर्षी झाले. त्यामुळे सरसंघचालक पदावर लवकर विराजमान होऊन दीर्घकालीन कार्यकाळ देण्याची परंपरा आहे आणि सध्याचे नेतृत्व त्याच परंपरेतले आहे.
पण भाजपमध्ये '75 वर्षे वयानंतर निवृत्ती' असा कोणताही औपचारिक आणि लिखित नियम नाही. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळात पाठवताना मात्र त्यांच्या वयाचे कारण देण्यात आले. त्याच वेळी काही मंत्री जसे की, कलराज मिश्र, नजमा हेपतुल्ला हे ज्येष्ठ मात्र त्यांच्या पदावर कायम होते. नंतर त्यांना राज्यपाल पदावर नियुक्त करण्यात आले. नुकत्याच निवडणुकीत मथुरेतून 75 वर्षे पार केलेली हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे '75 वर्षांचा नियम' अस्तित्वात नाही, हेच अधोरेखित झाले.
केवळ "माझं वय 75 झालं आहे", असं म्हणत आनंदीबेन पटेल यांनी 2016 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यासाठी वय हा अपवाद ठरण्याची शक्यता आहे.
आता 11 सप्टेंबरकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच दिवशी मोहन भागवत 75 वर्षांचे होतील. त्यांनी जर स्वतःच्या सल्ल्यानुसार निवृत्ती पत्करली, तर भाजपमध्ये मोदींबाबत काही प्रमाणात चर्चा नक्कीच सुरू होईल. पण, मोदी यांनाआव्हान दिले जाईल का? तर हे जवळपास अशक्य आहे. आज मोदी हे प्रबळ स्थितीत आहेत. त्यामुळे 2009 नंतर ज्याप्रमाणे नेतृत्वासाठी पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण झाली होती तशी प्रक्रिया होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीत ते पुन्हा उमेदवार असतील असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
प्रश्न: मोहन भागवत यांचे '75 वर्षांनंतर निवृत्ती' विधान कोणावर लागू होऊ शकते?
उत्तर: ते विधान अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडले जात आहे.
प्रश्न: भाजपमध्ये 75 वर्षांनंतर निवृत्तीचा अधिकृत नियम आहे का?
उत्तर: नाही, भाजपमध्ये असा कोणताही औपचारिक नियम अस्तित्वात नाही.
प्रश्न: संघाने वयोमर्यादा कशी पाळली आहे?
उत्तर: आजवर कोणताही सरसंघचालक 78 वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहिलेला नाही.
प्रश्न: 2029 मध्ये नरेंद्र मोदी निवडणुकीचे नेतृत्व करणार का?
उत्तर: सध्याच्या स्थितीत त्यांची उमेदवारी अपेक्षित आहे, कारण पक्षात पर्यायी स्पर्धा दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.