Ravindra Waikar : वायकरांना '500 कोटींची क्लीन चिट', महायुतीच्या तोंडाला फेस आणणार

Mumbai police close case against Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार गैरसमजुतीतून देण्यात आली होती, अशी क्लीन चिट त्यांना देण्यात आली आहे.
ravindra waikar eknath shinde ajit pawar devendra fadnavis.jpg
ravindra waikar eknath shinde ajit pawar devendra fadnavis.jpgsarkarnama

लोकसभा निवडणुकीत महायुतीला ज्या कारणांमुळे फटका बसला, त्या कारणांची मालिका पुढेही सुरूच असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, कालांतराने संबंधित नेता भाजप किंवा महायुतीत आला तर चौकशी बंद करायची किंवा क्लीन चिट तरी देऊन टाकायची.

ताज्या घटनाक्रमात खासदार रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांना अशी क्लीन चिट मिळाली आहे. वायकर यांनी जोगेश्वरी येथे 500 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आता वायकर यांच्या विरोधातील ती तक्रार गैरसमजातून दाखल झाली होती, असे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे.

रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील पंचतारांकित हॉटेलसंदर्भात सोमय्या यांनी ही तक्रार केली होती. मुंबई महापालिकेच्या आरक्षित असलेल्या जोगेश्वरी भागातील भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलची उभारणी केली आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती. हा घोटाळा 500 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी केला होता. याबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. वायकर हे त्यावेळी आमदार होते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. ईडीनेही त्यांना समन्स बजावले होते.

तपास यंत्रणांनी वायकर यांची मोठी कोंडी केली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे ( Eknath Shinde ) गटात प्रवेश केला आणि त्यांच्यावरील आरोपांचे, त्यांच्याविरोधातील तक्रारीचे गांभीर्य कमी झाले. पुढे शिंदे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवत वायकर यांनी निसटता विजय मिळवला. माझ्यासमोर दोन मार्ग होते, एक शिंदे गटात जाण्याचा आणि दुसरा कारागृहात जाण्याचा, असे रवींद्र वायकर काही दिवसांपूर्वी जाहीरपणे म्हणाले होते. कारागृहात जाणे टाळण्यासाठीच आपण शिंदे गटात गेलो, असे वायकर यांना म्हणायचे होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. वायकरांवर झालेला आरोप छोटा किंवा साधासुधा नव्हता, 500 कोटी रुपयांचा होता. या आरोपानुसार त्यांनी मुंबई महापालिकेची जागा बळकावली होती.

ravindra waikar eknath shinde ajit pawar devendra fadnavis.jpg
Ladki Bahin Yojana : लाचखोरांनो खबरदार! लाडक्या बहिणींसाठी सरकार झाले कठोर, दिला सज्जड इशारा

रवींद्र वायकर त्यावेळी ठाकरे गटात होते आणि आमदार होते. त्यांच्याविरोधात चौकशीचा फास आवळण्यात आला होता. वायकर प्रचंड हतबल झाले होते. वायकर यांच्यासह महाविकास आघातील तिन्ही पक्षांतील नेत्यांना किरीट सोमय्या यांनी तपासयंत्रणांना हाताशी धरून जेरीस आणले होते. जेरीस आलेले अनेक नेते महायुतीत सामील झाले. अशा नेत्यांवरील कारवाई थंडावली किंवा त्यांना क्लीन चिट तरी मिळाली. महायुतीत सामील न झालेल्या नेत्यांना तपास यंत्रणांनी छळ छळ छळले. काही जणांवर कारवाई झाली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत कारागृहात जाऊन आले. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वासाठी किंवा विकासासाठी नव्हे, तर चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी शिवसेनेतून 40 आमदारांसह बाहेर पडले, असा आरोप महाविकास आघाडी, शिवसेनेच्या नेत्यांकडून सतत करण्यात आला. वायकर यांना मिळालेली क्लीन चिटसारख्या घटना पाहिले की या आरोपांना बळ मिळते.

त्यानंतर आजितदादा पवार यांच्याबाबतही असेच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्याच्या काही दिवसांनंतरच ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. काँग्रेस सरकारच्या काळातील कथित घोटाळ्यांची यादीच भाजपने संसदेत सादर केली होती. त्यात मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याचा उल्लेख होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर या घोटाळ्याचे आरोप झाले होते. संसदेत यादी सादर होताच तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने लागलीच राज्यसभेवर घेतले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पीछेहाट झाली. भाजपने केलेली पक्षांची फोडाफोडी लोकांना आवडली नव्हती. चौकशीचा ससेमिरा मागे लावून अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये, महायुतीत घेण्याची भाजपची रणनीतीही लोकांना आवडली नव्हती. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनेक नेते आज महायुतीत आहेत आणि ते सुखाने झोप घेत आहेत. अशा नेत्यांबद्दल किरीट सोमय्या 'ब्र' ही उच्चारत नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि मी अशा नेत्यांची यादी करायचो आणि आणि त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) यांच्या परवानगीनंतर मी अन्य पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचो, असे सोमय्या यांनी एका दूरचित्रवाहिनीस बोलताना सांगून टाकले होते. त्यामुळे भाजपचा सगळा खेळ लोकांच्या लक्षात आला होता.

ravindra waikar eknath shinde ajit pawar devendra fadnavis.jpg
Ladki Bahin Yojana : लाचखोरांनो खबरदार! लाडक्या बहिणींसाठी सरकार झाले कठोर, दिला सज्जड इशारा

रवींद्र वायकर ठाकरे गटात होते, तोपर्यंत तपासयंत्रणा त्यांना श्वास घ्यायचीही उसंत देत नव्हत्या. चौकशीचा फास घट्ट आवळला जात होता. मग अचानक तपास यंत्रणांना असे कसे वाटले की वायकर यांच्या विरोधातील ती तक्रार गैरसमजुतीतून दाखल करण्यात आली होती? तपासयंत्रणा इतक्या आंधळेपणाने काम करत असतात का? विशेष म्हणजे, या प्रकरणात ईडीने रवींद्र वायकर यांच्या घरावर छापाही मारला होता. ईडीने वायकर यांची अनेक तास चौकशी केली होती. इतके सारे घडूनही वायकर यांच्या विरोधातील ती तक्रार गैरसमजुतीतून दाखल झाली होती, असे कसे म्हणता येईल? आता वायकर यांच्या विरोधातील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. आरोप करणारे किरीट सोमय्या यांचे काय? त्यांनी तपासयंत्रणांची फसवणूक केली, की किरीट सोमय्या आणि भाजपने मिळून लोकांची फसवणूक केली?, असा प्रश्न आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या कारणांमुळे महायुतीची पीछेहाट झाली, तेच कारण आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीसमोर आव्हान म्हणून उभे ठाकणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com