Mumbai Riot: मुंबई दंगलः बाळासाहेबांचीच फाइल कशी विसरली? हा प्रश्न राज ठाकरे विचारणार का?

Shiv Sena chief Balasaheb Thackeray: 1995 मध्ये युतीचे सरकार असताना मुंबई दंगल प्रकरणात शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यांच्या सर्व फायली निकाली काढण्यात आल्या होत्या, मग बाळासाहेबांचीच फाइल निकाली काढायची कशी राहून गेली, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारायला हवा.
Shiv Sena chief Balasaheb Thackeray
Shiv Sena chief Balasaheb ThackeraySarkarnama

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात, असा प्रश्न उपस्थित करीत राज ठाकरे यांनी एका प्रचारसभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी राज यांना त्याचे उत्तर दिले आहे.

बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर बाळासाहेबांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे मुंबईत दंगल (Mumbai riot case)भडकली, असा ठपका श्रीकृष्ण आयोगाने ठेवला होता. 1999 आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी ती फाइल उघडली होती. तत्पूर्वी, 1995 मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर मुंबई दंगल प्रकरणी शिवसैनिकांवर दाखल सर्व गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला होता. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray) फाइल मात्र तशीच राहून गेली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार मैदानात नाही, मात्र राज ठाकरे हे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत.

या सभांमधून त्यांनी त्यांचे चुलतबंधू, शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. हे करताना त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यांनीही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे आणि छगन भुजबळ हे दोघेही सध्या महायुतीत आहेत. त्यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीत सर्वकाही आलबेल आहे का, अशीही शंका निर्माण होत आहे.

Shiv Sena chief Balasaheb Thackeray
Mumbai News: मनसेच्या होम पिचवर 'मोदी-राज'; आजच्या सभेसाठी मनसैनिक-भाजप नेते 'हम साथ साथ है...'

मुंबईत, महाराष्ट्रात निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर ठाकरे हे नाव आपल्यासोबत असणे गरजेचे आहे, याची जाणीव भाजपला आहे. शिवसेना-भाजपची 25 वर्षांची युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुटली. त्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेणे भाजपसाठी अपरिहार्य होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारच्या विरोधात विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेले राज ठाकरे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शांत झाले होते. राज ठाकरे भाजपसोबत जाणार हे त्यावेळीच लोकांच्या लक्षात आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात राज्यभरात आक्रमक सभा घेणारे राज ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभांमधून आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला काही वाटले नाही का, अशी टीका राज यांनी उद्धव यांच्यावर नुकतीच केली आहे.

महायुतीचा घटक असलेल्या नेत्याकडून आपल्यावर टीका होत असल्याने छगन भुजबळ यांचे पित्त खवळले. त्यांनी राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागेल, अशा शब्दांत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेता आणि छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसता, असा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारायला हवा होता, असा टोला भुजबळ यांनी लगावला आहे. माझ्याबद्दल ही सर्व मंडळी बोलतात, मात्र मी तर एक शिवसैनिक आहे. फार कट्टर नाही असे समजा, मात्र तुम्ही तर बाळासाहेबांच्या रक्तातील आहात, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश काढले होते. बाबरी मशीदीच्या पतनानंतर मुंबईत दंगल झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दंगल भडकली, असा ठपका श्रीकृष्ण आयोगाने ठेवला होता.

1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. गृहखाते मुंडे यांच्याकडेच होते. या सरकारने मुंबई दंगलप्रकरणी शिवेसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची सर्व प्रकरणे निकाली काढली. फक्त बाळासाहेब ठाकरे यांची फाइल त्यातून सुटली होती. असे का झाले होते, याबाबत वादविवाद होत असतात. पुढे 1995 मध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी मग ती फाइल उघडली होती.

शिवसैनिकांवरील गुन्ह्यांच्या फायलींचा निपटारा करण्यात आला, मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची फाइल मागे कशी राहिली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी खरेतर भाजपला विचारायला हवा. कारण ती फाइल निकाली निघाली असती तर पुढचा सर्व घटनाक्रम टळला असता.

अटकेच्या प्रकरणानंतर छगन भुजबळ यांनी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. ते प्रकरण तेथेच संपले होते, असे भुजबळ यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे. तरीही राजकारण म्हणून हा मुद्दा उचलला जातो. पण बाळासाहेबांचीच फाइल मागे कशी राहिली, आता मुख्यमंत्री शिंदेही भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात, असे प्रश्न राज ठाकरे यांना पडत नसतील का? असा प्रश्न उपस्थित होतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com