Municipal Results : राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तब्बल 29 महापालिकांपैकी 24 महापालिकांवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तेथे भाजपने विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेने सोबत ते सत्ता स्थापन करणार आहेत.
विधानसभेच्या निकालानंतर महापालिका निवडणूक होत असल्याने सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होईल, असा अंदाज होता. ते खरा ठरला. मुंबईतील निकालाने सर्वांनाच चकीत केले. त्यामुळे या संपूर्ण निकालाचे पाच सोपे अर्थ समजून घेऊयात.
मुंबई म्हणजे ठाकरे हे कधीकाळी समीकरण होते. यंदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले मात्र त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. भाजप-शिंदेंची शिवसेना यांनी बाजी मारली. मुंबई हातून गेल्यानंतर ठाकरे ब्रँड संपले अशी चर्चा होती. मात्र, या निकालामध्ये उद्धव ठाकरेंना 65 जागा मिळाल्या आहेत तर, राज ठाकरेंना सहा जागा मिळाल्या आहेत. या निकालातून मुंबईतील मराठी माणूस हा ठाकरेंच्या मागे ठाम उभा राहिले असे चित्र दिसते. त्यामुळे या निकालाने ठाकरे ब्रँड संपला असे म्हणणे खूप घाईचे ठरेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाही या निवडणुकीचे निकाल ही धोक्याची घंटा ठरली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका या कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जात होते. तेथे फूटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढल्या मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये देखील राष्ट्रवादीची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे अहिल्यानगरमधील भाजपसोबतची सत्ता सोडली तर राष्ट्रवादीला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे महापालिकांचे निकाल हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरले आहेत.
महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या कामगिरीने अनेकांना चकीत केले आहे. कोणत्याही महापालिकेत त्यांची सत्ता आली नाही. मात्र, राज्यभर त्यांचे 125 पेक्षा अधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 पेक्षा अधिक जागा मिळवत ते भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच नागपूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये त्यांचे नगरसेवक विजयी झाले आहेत. मालेगाव महापालिकेमध्ये 20 नगरसेवक विजयी झाले आहेत. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने खाते उघडले आहे.
एकनाथ शिंदे मुंबई, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांमध्ये भाजपसोबत युती करून लढत होते. मात्र, इतर सर्व महापालिकांमध्ये भाजप त्यांचा प्रमुख विरोधक होता. निवडणुकीच्या प्रचारात ज्या प्रकारे गणेश नाईकांनी त्यांना टार्गेट केले. मीरा भाईंदरमध्ये त्यांच्या शिवसेनेला अवघ्या तीन जागा मिळाल्या तसेच कल्याण डोंबिवलीत युती असून देखील भाजपने ज्या प्रकारे त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला ते पाहात भविष्यात एकनाथ शिंदेंना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण शिंदेंची आवश्यकता भाजपला केवळ मुंबई महापालिकेसाठी होती अशी चर्चा होती. त्यामुळे शिंदें विरोधात भाजपचे नेते दंड थोपटणार हे निश्चित.
महापालिका निवडणुकीचा खरा अर्थ येवढाच आहे की आता भाजपच महापालिकांमधील मुख्य कारभारी राहणार आहे. 29 पैकी 20 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजपचे एकहाती वर्चस्व स्थापन झाले आहे. तर, काही महापालिकांमध्ये मित्रपक्षांसोबत भाजप सत्तेत येऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण केंद्रस्थानी भाजपच राहणार आहे. देशाच आर्थिक राजधानी आणि तब्बल 74 हजार कोटीचे बजेट असलेली मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याने त्यांची आर्थिक ताकद किती तरी अधिक पटीने वाढणार आहे. मुख्य म्हणजे या निकालामुळे भाजपचे विरोधकांची ताकद कमालीची घटल्याचे समोर आले आहे. सत्तेतील मित्र पक्ष देखील त्यांच्यासमोर आव्हान उभे करू शकत नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.