Mahapalika Nivadnuk: गडकरी-फडणवीसांच्या15 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरुंग लावणार का?

Nagpur Municipal Election 2025: तब्बल पंधरा वर्षांपासून महानगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनेही वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सखोल व्यूहरचना आखली आहे
nagpur corporation.jpg
nagpur corporation.jpgsarkarnama
Published on
Updated on

डॉ. राजेश रामपूरकर, तुषार पिल्लेवान

Nagpur mahapalika 2026: मुंबई महापालिकेनंतर सर्वांत जास्त चुरस असलेली महापालिका निवडणूक अशी नागपूरची ओळख सांगितली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १५ वर्षांपासून या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. यंदा त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसनेही यंदा कंबर कसली असून सत्ताधारी भाजपविरूद्ध लोकांत असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. भाजप केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर विकास व बळकट अशा पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या जीवावर ही महापालिका राखते की काँग्रेस त्यांना धोबीपछाड देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विकासाचा चेहरा पुढे करून लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपने १२० तर १०० काँग्रेसने उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. त्यादृष्टीने युद्धपातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे.

भाजपने प्रचारासाठी ४२ आघाड्यांवर जबाबदारी दिली आहे. काँग्रेसनेही त्यांना आव्हान देण्यासाठी नियोजन केले आहे. भाजपच्या बंडखोरी ही डोकेदुखी ठरू लागली आहे. असे असले तरी शहरातील अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसचे प्रमुख दिग्गज उमेदवार आणि काही अपक्ष नेते एकमेकांपुढे उभे ठाकल्याने चुरस वाढली आहे.

पक्षांतर्गत संघर्ष, व्यक्तिकेंद्रित निवडणूक

तब्बल पंधरा वर्षांपासून महानगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनेही वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सखोल व्यूहरचना आखली आहे. विकासकामांचा मुद्दा, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मजबूत संघटन याच्या जोरावर सत्ता टिकवून ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शहरातील ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून येणार आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी तब्बल २४ लाख ८३ हजार ११२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराचा खरा रणसंग्राम सुरू झाला आहे.

परिणामी राजकीय वातावरण तापले आहे. राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या निवडणुकीत वैयक्तिक टीका, जुने वाद आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीही उफाळून आली आहे. काही प्रभागांत बंडखोरीमुळे पक्षांतर्गत संघर्ष उघड झाला आहे. त्याचा थेट परिणाम प्रचारावर दिसत आहे. परिणामी, ही निवडणूक केवळ पक्षीय न राहता अनेक ठिकाणी व्यक्तिकेंद्रित लढत ठरत असल्याचे दिसते. केवळ आश्वासनांपेक्षा ठोस कामगिरी, विश्वासार्हता आणि प्रभागाच्या प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका यावरच मतदारांचा कल ठरणार आहे.

nagpur corporation.jpg
Mahapalika Nivadnuk 2026: कोणाचे पतंग उंच जाणार, कोणाचे कापले जाणार?

भाजपच्या रणनीतीला काँग्रेसचे उत्तर

भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात महानगर पालिकेत विकास कामांवर भर दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अनेक नगरसेवक या काळात आपल्या प्रभागात फिरकले नसल्याने नागरिकांची नाराजी होती. त्यामुळे ७५ टक्के नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास अपयश मिळेल असे सर्वेक्षणातून उघड झाले होतो. परंतु, आरक्षणाच्या कचाट्यात निवडणुका अडकल्याने तब्बल पावणे चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्यात विकासकामे करताना स्थानिक नेत्यांना विचारात न घेता करण्यात आलेली आहे. तसेच या काळात अनेक नगर सेवकांनी नागरिकांसोबतचा जनसंपर्क संपुष्टात आणला होता. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी कठीण जाणार असल्याचे बोलले जात आहे. हे लक्षात येताच भाजपाने रणनिती बदलली आणि अनेक प्रभागामध्ये नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.

काँग्रेसनेही नवीन रणनिती तयार केली आहे. १०० उमेदवार निवडणूक आणण्याचा चंग बांधला आहे. भाजपच्या विकासाच्या मुद्द्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेसने विकासामुळे शहरात वाढलेले प्रदूषण, बेरोजगारी, वाढलेले मालमत्ता कर, विजेचे दर यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांचे हे होमग्राऊंड असल्याने या निवडणुकीकडे मुंबई महापालिकेनंतर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. १३ जानेवारीला प्रचार थांबेल, मात्र मतदानाच्या दिवशी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे १६ जानेवारीलाच कळणार आहे.

बंडखोरांचे आव्हान

भाजपच्या दिग्गज चेहऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत विरोधकांपेक्षा पक्षातीलच बंडखोरांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. माजी नगरसेविका प्रगती पाटील तसेच माजी नगरसेवक बंडू राऊत आणि प्रमोद चिखले यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नाराज नेत्यांकडून कडवे आव्हान मिळत आहे. तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण आणि विनायक डेहनकर यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले असून त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना स्वकीयांशीच दोन हात करावे लागणार आहेत.

मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपच्या प्रगती पाटील विजयी झाल्या होत्या, तर निवडणुकीनंतर सुनील अग्रवाल यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली होती. यंदा आरक्षण बदलामुळे सर्वसाधारण जागा सुटल्याने पाटील आणि अग्रवाल या दोघांनीही उमेदवारीसाठी दावा केला. अखेर भाजपने प्रगती पाटील यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सुनील अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पक्षाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाले; मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने अग्रवाल निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले.

या प्रभागात काँग्रेसने शहर प्रवक्ते अभिजित झा यांना उमेदवारी दिली आहे. अग्रवाल यांनी भाजपची मते मोठ्या प्रमाणात विभागली तर प्रगती पाटील यांचे नुकसान होऊ शकते. मात्र पाटील यांच्या सामाजिक कार्यामुळे बंडखोरीचा फारसा फटका बसणार नाही, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

माजी महापौराच्या पतीची बंडखोरी

प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपने माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या बंडखोरीची शहरभर जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे ही भूमिका अर्चना डेहनकर यांना मान्य नसल्याने त्या निवडणूक काळात भावाकडे मुक्कामी गेल्या आहेत.

प्रचाराच्या केंद्रस्थानी अनेक प्रश्‍न

शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. काही प्रभागांत तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढतीही रंगतील, असे चित्र आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधक काँग्रेस व इतर पक्ष यांच्यातील संघर्ष अधिक धारदार होत असून, प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा, अपूर्ण प्रकल्प, नागरी सुविधांचा बोजवारा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांचे प्रश्न केंद्रस्थानी आले आहेत.

महानगर पालिकांच्या शाळांची दुरावस्था, शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील पार्किंगची सोय नसणे, गजबजलेल्या भागात अग्निशमन केंद्रांचा वानवा, नागपुरात नव्याने समाविष्ट झालेल्या अविकसित वस्त्या, चोवीस तास पाण्याची उपलब्धता नसणे, पावसाळ्यात सिमेंटच्या रस्त्यामुळे घरात पाणी घुसण्याची समस्या डोकेदुखी ठरलेली आहे. नागपूर सुधार प्रन्यासअंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमध्ये रखडलेले नियमितीकरण व त्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांची होणारी पिळवणूक, नागपूर शहरात एनआयटी आणि महानगर पालिकांकडून आकारण्यात येणारी कर पद्धती, उद्यानांची दुरावस्था, हे प्रश्नही चर्चेत आहेत.

राजकीय पक्षांची रणनीती

प्रचारासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी नागपूर शहर व्यतिरिक्त नागपूर ग्रामीणमधील लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी व संघटनेत काम करणाऱ्या ६१ जणांना प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आलेली आहे. शहराच्या विकासासाठी जनतेकडून थेट सूचना संकलित करण्यासही सांगण्यात आले आहे. भाजपच्या नियोजनानुसार व्यापारी आघाडीने व्यावसायिकांशी, सी.ए. आघाडीने त्यांच्या ग्राहकांसोबत संपर्क साधावा, फार्मासिस्ट आघाडीने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचावे आणि दिव्यांग आघाडीने दिव्यांग लोकांसाठी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती जनतेला द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

काँग्रेसने जनतेतून सूचना मागवून जाहीरनामा तयार करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी नागरिकांकडून अडचणी आणि समस्या मागविण्यात येत आहेत. शहरातील प्रचाराची धुरा आमदार विकास ठाकरे आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांवर दिली आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना निमंत्रण पाठविण्यात आलेली आहेत. घराघरात पोहोचण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करण्यावर सर्वच पक्षांचा जोर राहणार आहे. शिवसेना शिंदे आणि उद्धव सेनेच्या प्रचारासाठी वैयक्तिक पातळीवर तयारी केली जात आहे. प्रचारासाठी कोण येणार हे मात्र, गुलदस्त्यात आहे. हीच स्थिती राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आहे.

रंगतदार लढती

  •  प्रभाग २३ (ड)ः बाल्या बोरकर (भाजप) वि.दुनेश्वर पेठे राष्ट्रवादी (एसपी)

  •  प्रभाग एक ः विक्की कुकरेजा (भाजप) वि. सुरेश जग्यासी (काँग्रेस)

  •  प्रभाग आठः श्रेयस कुंभारे (भाजप) वि. खान वासिम अब्दुल नईम (काँग्रेस)

  •  प्रभाग १ः संदीप जाधव (भाजप) वि.मंजुषा गणेश चाचरवार (काँग्रेस)

  •  प्रभाग १२ः माया इवनाते (भाजप) वि. ओमप्रकाश वाडवे (काँग्रेस)

  •  प्रभाग १५ः संदेश सिंगलकर (काँग्रेस) वि.सुनील हिरणवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com