Lok Sabha Election 2024 Results : मोदीसाहब, ये महाराष्ट्र है... मतदारांनी वाचाळवीरांना धडा शिकवलाच...!

Maharashtra Lok Sabha Results : जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्या स्वार्थाची काळजी केली गेली, आपल्याला ज्यांनी मोठे केले त्यांच्यावर मर्यादा सोडून टीका करण्यात आली. पाच वर्षे हा प्रकार सहन केलेल्या महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांनी असे वाचाळ नेते आणि त्यांच्या पक्षांच्या उमेदवारांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक ठरले आहेत. महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांनी महायुतीची दाणादाण उडवून टाकली आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राने वाचाळवीरांची निरर्थक बडबड सहन केली होती. आता ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपला मतदान यंत्रांतून मिळाला आहे. राज्याला राजकारणाच्या सुसंस्कृतपणाची एक चौकट आहे. ती उद्धवस्त करणे भाजपला महागात पडले आहे.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या जनतेने खूप काही सहन केले आहे. राजकीय आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झालेला खेळ मन सुन्न करून टाकणारा होता. राजकीय नेते आणि त्यांची वक्तव्ये इतक्या खालच्या पातळीवर कधीच गेली नव्हती, असे जाणकार लोक बोलू लागले होते. राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने आदी शिवसेना फोडली. शिवसेना फुटल्यानंतर सूरत आणि गुवाहाटीमध्ये घडलेले नाट्य लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. ज्या पक्षाच्या, नेत्याच्या जिवावर आपण मोठे झालो, त्याचीही तमा बाळगण्यात आली नाही. शिवसेना फुटल्यानंतर राज्यात एके ठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती. त्या सभेत ग्रामीण भागातील एक साधा माणूस पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा रूमालाने पुसत आहे, असा व्हिडीओ व्ह्ययरल झाला होता. शिवसेना फोडण्यात आली, हे राज्यातील लोकांना आवडले नाही, हे दर्शवणारे ते बोलके दृश्य होते.

इतके करूनही फुटीर शांत झाले नाहीत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी जणू एक फळीच तयार करण्यात आली होती. ठाकरे यांच्या बाजूने संजय राऊत यांनी एकट्याने किल्ला लढवला. राऊत नसते तर फुटिरांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था आणखी बिकट करून टाकली असती. राजकीय टीकाटिपण्णी एखादेवेळेस समजून घेता येईल, मात्र ठाकरे कुटुंबियांवर वैयक्तिक हल्लेही चढवण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत आघाडी करून हिंदुत्व सोडले, असे म्हणणारे मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत युती केलेल्या भाजपसोबत सुखेनैव नांदायला लागले होते. महाराष्ट्रातील जनतेला हे कळणार नाही किंवा त्यांच्या लक्षात येणार नाही, असे समजण्याची चूक शिंदे गटाच्या नेत्यांनी केली. मात्र महाराष्ट्र संधीची वाट पाहात होता, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले आहे. शिवसेना फोडून भागले नसावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्यात आला. येथेही पुन्हा तसेच. फुटिरांनी शरद पवार यांच्यावर मर्यादा सोडून टीका सुरू केली. शरद पवार यांच्या वयाचा मुद्दाही पुन्हा पुन्हा समोर आणण्यात आला. त्याच शरद पवारांनी स्वतःला तरुण समजणाऱ्या त्यांच्या एकेकाळच्या शिलेदारांना आस्मान दाखवले आहे.

हे सर्व सुरू असताना महाराष्ट्रात काय परिस्थिती होती?  महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. बेरोजगारीचे चटके बसत होते. गावोगावी बेरोजगारांचे तांडे विविध व्यसनांच्या आहारी गेले होते. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेतमालाला भाव नाही पण खते, कीटकनाशाकांचे भाव प्रचंड वाढले होते. वाचाळवीरांच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला होता. निवडणुका लागल्या आणि सामान्यांचे, शेतकऱ्यांचे हे प्रश्न प्रचारात येतील असे वाटत असताना घडले मात्र भलतेच. महायुतीच्या आश्रयाला गेलेल्या राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी थेट हिंदू-मुस्लिम करायला सुरवात केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक ध्रुवीकरण होईल, अशी वक्तव्ये महाराष्ट्रात येऊन केली. पंतप्रधान आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नांची चर्चा करतील, अशी आशा लावून बसलेल्या नागरिकांचा त्यामुळे भ्रमनिरास झाला.

महाराष्ट्रात वाचाळवीरांना आवरण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर हे काम करतील, अशी अपेक्षा होताी, मात्र तीही फोल ठरली. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून आपली मंत्रिपदे, आपला स्वार्थ यांचीच सतत चर्चा करणाऱ्या वाचाळवीरांच्या पक्षांना महाराष्ट्राच्या सूज्ञ मतदारांनी अद्दल घडवली आहे. राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर लोकांच्या हितासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचे असते, याचा विसर या नेत्यांना पडला होता. यातून या वाचाळवीरांनी काहीही बोध घेतला नाही तर तोंडावर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, याची खूनगाठ त्यांनी मनाशी बांधून घेतली पाहिजे.

Narendra Modi, Amit Shah
Bhaskar Bhagare News : भास्कर भगरेंच्या मताधिक्यावर घाला घालणारे  "बंडुराव" कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com