

नवी दिल्ली : जातीवर आधारित जनगणनेच्या (Caste Census) मुदद्यावर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यासह आज 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची फिरकी घेतली. यावर नितीशकुमारांनी मोदींनाच गुगली टाकल्याने हास्यकल्लोळ उडाला.
नितीशकुमार यांच्यासोबत 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने आज मोदींची भेट घेतली. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भाजपचे जनकराम, काँग्रेस नेते अजित शर्मा, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी आणि डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या शिष्टमंडळाच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे. आता बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
या वेळी मांझी यांनी मास्क घातला होता. यावर मोदींनी त्यांची फिरकी घेतली. तुम्ही मास्क घातल्याने तुमचा हसतमुख चेहरा आम्ही कसा पाहायचा, असा मिष्किल सवाल मोदींनी केला. लगेचच या संवादात भाग घेत नितीशकुमारांनी मोदींना गुगली टाकली. तुम्हीच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास सांगितले आहे, अशी आठवण नितीशकुमारांनी मोदींना करुन दिली. यानंतर एकच हास्यकल्लोळ उडाला.
जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर नितीश यांनी मोदींना पत्र लिहिले होते. या पत्राला अनेक दिवस मोदींनी उत्तर दिले नव्हते. यामुळे नितीश यांनी नुकतीच उघड नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मी लिहिलेल्या पत्रावर अद्याप त्यांचे उत्तर मिळालेले नाही. आम्हाला जातीवर आधारित जनगणना हवी आहे. ही आमची जुनीच मागणी आहे. अशा जनगणनेमुळे सर्व जातींची नेमकी लोकसंख्या समोर येईल. यानुसार मग सरकारला धोरणे आखता येतील. हे मी देशाच्या भल्यासाठीच सांगत आहे.
पेगॅसस प्रकरणाची चौकशी आणि जातीवर आधारित जनगणना या दोन मागण्यांच्या आडून नितीशकुमार हे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची चिन्हे समोर येऊ लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आता मात्र ते नितीशकुमार यांच्या जवळ येऊ लागले आहेत. याचबरोबर तेजस्वी यादवही नितीशकुमारांच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.