Solapur, 16 July : सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवारांपासून सोलापुरातील सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्यापर्यंत नेत्यांच्या गाठीभेटी घेत ‘शहर मध्य’ची तटबंदी मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह विविध समाज घटकांशी कनेक्ट होत विधानसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी मास्तरांची धडपड सुरू आहे. त्यात त्यांना किती यश येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी (Solapur City Central Constituency ) काँग्रेससह (Congress) मित्रपक्षांकडून इच्छुकांची भलीमोठी रांग लागली आहे. काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, बाबा करगुळे आदी प्रमुख पदाधिकारी इच्छूक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तौफिक शेख यांनीही सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Maste) यांनी तर लोकसभा निवडणुकीपासूनच शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची तयारी चालवली आहे. हा मतदारसंघ माकपला सुटावा, यासाठी काही दिवसांपूर्वी आडम मास्तर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडेही शहर मध्य माकपला सोडण्याची विनंती केली.
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सकारात्मक मेसेज आल्याचा दावा करून आडम मास्तर हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार करताना त्यांनी स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटीही घ्यायला सुरुवात केली आहे. नरसय्या आडम यांनी 10 जुलै रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन सोलापूर शहर मध्य ही जागा माकपला सोडण्याची विनंती केली.
माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीत 2004 मधील पुनरावृत्ती टाळण्याचे दोन्ही बाजूंकडून ठरवण्यात आले. इंडिया आघाडीत ‘सोलापूर शहर मध्य’ची जागा देण्यासंबंधी काँग्रेसच्या अंतर्गत समितीत चर्चा करण्यात येईल आणि 2004 मध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचा निर्धार या वेळी आडम आणि शिंदे यांनी बोलून दाखवला.
सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर आडम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट देऊन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी तौफिक शेख यांनीही ‘आपण शहर मध्य’ मधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मास्तरांना सांगितले. माजी महापौर महेश कोठे यांनी मात्र मतदारसंघाचा निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील. वरिष्ठांनी दिलेल्या आदेश पाळून सर्वांनी एकदिलाने काम करायचे, असा शब्द कोठे यांनी आडम मास्तर यांना दिला.
सोलापुरातील प्रमुख नेते धर्मराज काडादी यांचीही नरसय्या आडम यांनी भेट घेतली. या भेटीत धर्मराज कडादी यांनी आडम मास्तर यांना विधानसभा निवडणुकीत सर्वतोपरी काम मदत करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्राच्या राजकारणातील आझाद शत्रू, पक्षनिष्ठा आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता, अशी ओळख असणारे नरसय्या आडम यांच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीच्या वेळी खंबीरपणे उभे राहू, असेही काडादी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.